OBC Meeting : बैठकीवरून ओबीसी नेत्यांची तोंडे चार दिशेला, उत्सुकतेपेक्षा अनुत्सुकताच अधिक; काय घडतंय? कोण गैरहजर राहणार?
OBC Meeting with Devendra Fadnavis : ओबीसी नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. पण या बैठकीपूर्वीच ओबीसी नेत्यांमधील विसंवाद दिसून आला.

मराठा आरक्षणाविषयी 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने एक जीआर काढला. हा जीआर ओबीसी आरक्षणावर घाला असल्याचा दावा ओबीसी नेते करत आहेत. त्याविरोधात ओबीसी नेत्यांनी नागपूरसह इतर ठिकाणी बैठक घेतली. त्यात या जीआरला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच ओबीसी नेत्यांची चार दिशेला चार तोंड असल्याचे दिसून आले. या नेत्यांमधील विसंवाद दिसून आला. त्यामुळे आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
विजय वडेट्टीवार यांची हजेरी
ओबीसी नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या 2 सप्टेंबर रोजीच्या जीआरला जोरदार विरोध केला आहे. हा जीआर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर जे ओबीसी नेते या जीआरचे समर्थन करत आहे, त्यांना बैठकीतून वगळण्याचा निर्णय झाल्याचे कळते असे ते म्हणाले. तर लक्ष्मण हाके यांना बैठकीला हजर राहण्याविषयी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती त्यांनी दिली.
बबनराव तायवाडे हजर राहणार नाहीत
ओबीसींच्या हितासाठी लढा दिला. गेल्या वेळेस सरकारने लेखी दिलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आम्ही ओबीसींच्या हितासाठी अनेक शासन निर्णय काढून घेतले. आताही जरांगे पाटील यांच्या मागणीचा विरोध करत आंदोलन केलं. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही मागणी केली होती. २ तारखेचा जीआर सरकारने काढला. त्यात जरांगे पाटील यांचं समाधान झालं. आमचं आंदोलन मागे घेण्यासाठी ओबीसी मंत्री सावे आले. आमच्या मागण्या मान्य केल्या. 2 सप्टेंबरच्या जीआरचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यातून ओबीसीचं नुकसान होत नाही असं लक्षात आलं, असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
या जीआर मध्ये सरसकट प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही. पित्रुसत्ताक वंशावळीनुसारंच पात्र व्यक्तीला कुणबी प्रामाणपत्र देण्याची तरतूद आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागला नाही. यात काही शंका आहे, नाही असं नाही. याबाबत आम्ही सरकारला काही स्पष्टीकरण मागीतलं आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर मी आजही ठाम आहे. नातेवाईकांकडे जातीचं प्रमाणपत्र असल्याशिवाय ओबीसी प्रमाणपत्र मिळणार नाही. आजच्या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण होतं. आम्ही जाणार होतो. पण काल दिवसभर नाट्य झालं, की बबनराव तायवाडे येणार असेल तर आम्ही येणार नाही. चर्चेची गरज त्यांना आहे. आमचं समाधान झालं आहे. ज्यांचं समाधान झालं नाही. त्यांना बैठकीत बोलावा असं मी मुख्यमंत्र्याना सांगितलं. गरज असेल तर मुख्यमंत्री मला पुन्हा बैठकीला बोलावतील बैठक घेतील, अशी भूमिका बबनराव तायवाडे यांनी मांडली.
काहींना नेतेगिरी करायचीये
बबनराव तायवाडे यांनी नाव न घेता विजय वडेट्टीवार यांना चांगलाच टोला लगावला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनेचं नाव मोठं होतं होतं म्हणून काही राजकीय लोकांनी विरोध केला. मी आतापर्यंत ५८ जीआर काढले, हे दाव्याने सांगतो. हे समाजाचे मोठे नेते समजतात, मग त्यांनी सांगावं की त्यांनी किती जीआर काढले, असा सवाल तायवाडे यांनी विचारला. राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही राजकीय पक्षाच्या खुट्याला बांधला नाही. सोयी आणि सवलतीसाठी आम्ही संघर्ष करत असतो. आजच्या बैठकीला आमच्या शुभेच्छा आहे, असे तायवाडे म्हणाले.
2 तारखेच्या जीआर मुळे ओबीसींचं नुकसान होत नाही. त्यामुळे हा जीआर रद्द करो किंवा नाही, यात आम्हाला रस नाही. जीआर रद्द करावा असा मी म्हणार नाही. गेल्या १० वर्षांपासून आमच्या कामात सातत्य, आज एक मागणी केली आणि घरी जाऊन झोपले असं आमचं काम नाही. कुठल्याही प्रकारचा समाजाला न्याय मिळून न देता नेतेगिरी करायचं आहे, त्यामुळे ७० वर्षांत समाजाचं नुकसान. आम्ही पुढाकार घेतला ५८ जीआर ओबीसी समाजासाठी आम्ही काढले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मिळालेले यश काही राजकीय लोकांच्या डोळ्यात खुपते, म्हणून आमचा विरोध करत आहेत. मरेपर्यंत ओबीसी समाजासाठी लढत राहणार, विरोध कितीही होओ, माझ्यासाठी ओबीसी समाजाचं हित महत्वाचे आहे. आमदार होण्यासाठी, जिल्हापरिषद लढण्यासाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी माझा विरोध करत आहे. मला आमदार व्हायचं नाही, माझा राजकीय स्वार्थ नाही. आजच्या बैठकीत मला बोलावलं होतं, पण काहींच्या विरोधामुळे मी न जाण्याचा निर्णय घेतला, असे तायवाडे म्हणाले.
लक्ष्मण हाकेंनी फिरवली पाठ
या बैठकीविषयी लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. मला बैठकीच अधिकृत निमंत्रण नाही. शासनाच्या प्रोटोकॉल मध्ये आम्ही बसत नाही. जर निमंत्रणच नाही तर जायचं कशाला मी बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. मला फक्त विजय वेडेटीवार यांच्या पीएचा कॉल आला होता आपण बैठकीला यावं म्हणून. बैठक कोणी बोलावली कशासाठी बोलवली माहिती नाही. ओबीसी आज एकटा पडला आहे ना सत्ताधारी ना विरोधक कोणी आमच्यासोबत नाही.ओबीसींनो रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले. तर ओबीसी नेते छगन भुजबळ हे या बैठकीला हजर राहतील की नाही याविषयीची माहिती समोर आलेली नाही.
