नवाब मलिकांचं नाव घेत राऊतांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, ते पत्र आताच मागे घ्या…
Sanjay Raut on Devendra Fadnavis : आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिलं आहे. नबाव मलिक यांचं नाव घेत संजंय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदेंवरही टीका केली आहे. वाचा सविस्तर...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून कारवाई झाली होती. ते अटकेतही होते. मात्र जामीन मिळाल्यावर विधिमंडळ अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर बसले होते. यावरून गोंधळ झाला होता. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित मलिकांना महायुतीत घेणं योग्य नसल्याचं सुचवलं होतं. त्यानंतर नवाब मलिक शांत होते. मात्र आता राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत नवाब मलिक अजित पवारांसोबत स्टेजवर होते. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. विरोधकांना देवेंद्र फडणवीसांना घेरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
आमच्यावर जशी सुडाने कारवाई केली होती, तसंच नवाब मलिक यांच्यावरही सूडानेच केली होती. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांबाबत पुराव्यासोबत आरोप केले होते. त्याचमुळे फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर सीबीआय, एनआयए, ईडीला कारवाई करायला भाग पाडलं, असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांना चॅलेंज
माझा देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल आहे की, नवाब मलिक विधानसभेत सरकारच्या बाजूच्या बाकावर बसले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नितिमत्तेचा पुळका आणत एक पत्र लिहिलं होतं. नवाब मलिकांनी सरकारी बाकावर बसणं कसं योग्य नाही. त्यांच्यावर केसेस आहेत, हे सगळं पत्रात लिहिलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं. नाहीतर फडणवीसांनी हे मान्य करावं की नवाब मलिकांवरील सगळे आरोप खोटे आहेत. त्यांच्यावर आम्ही सूड बुद्धीने कारवाई केली हे मान्य करावं, असं आव्हान संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
नवाब मलिक यांना अटक करण्यासाठी आम्ही तपास यंत्रणेवर दबाव आणला होता. हे त्यांनी मान्य करावं. नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे यांच्या दाढीला आग लावली आहे. लाडकी बहीण नाही तर लाडके नवाब मलिक झालेले आहेत. तुम्ही मांडीवरच घेऊन बसला आहे त्यांना का कशावर घेऊन बसला आहात. हे तर ढोंगी राष्ट्रभक्त आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.
