सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
Sanjay Raut on Shinde Government : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. काल झालेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये गाईला ‘राज्यमाता-गोमाता’ दर्जा देण्यात आला आहे. संजय राऊतांनी यावरून सरकारला घेरलं आहे. वाचा सविस्तर बातमी...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. गायींना राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने काल घेतला आहे. यावर आज संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. गाईंची पूजा आम्ही सर्व करतो. त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नाही. आज जर स्वातंत्र्यवीर सावरकर आता असते तर त्यांनी यांच्या कानाखाली लगावली असती, असं संजय राऊत म्हणालेत. सध्याचे सरकार जे आहे ते बैल पुत्र आहेत, त्यांचा बाप बैल आहे, या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
तुम्ही सावरकरांना मानता ना, तुमचे जे कोणी हिंदुत्वाचे गब्बर आहेत. त्यांनी सावरकरांचं गाई विषयी जे म्हणणं आहे. ते एक हिंदू म्हणून ते आधी समजून घ्या. जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही. वीर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत जी भूमिका स्पष्ट केलीये. ती जे मान्य असली तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं. सावरकर जर आता असते तर त्यांनी यांच्या कानाखाली लगावली असती, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दुसरं काही काम नाही. आम्ही गोमातेला मानतो. आम्हाला सांगायची काही गरज नाही. पण गोमातेच्या कत्तली ज्या भाजप शासित राज्यात होत आहेत त्याबद्दल जरा सांगा… गाईला राज्य माता करून तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार? खरं तर गाईच्या दुधाला भावा द्या, शेतकऱ्यांचा दुधाच्या भावासाठी जो संघर्ष चालला आहे. त्यावर चर्चा करा. त्यावर बोला. पण ज्यांचा बापाच बैल आहे आणि ज्यांची बुद्धीच बैलाची आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? निवडणुकीसाठी असे फंडे करत असतात.दिल्लीतून काही बैल येत असतात. काही केंद्रातून फिरत असतात. महाराष्ट्राचा त्यांनी बैल बाजार केलेला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखा शाखांना भेटी देत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत. हे यातून दिसत आहे, असं संजय राऊतांनी अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका केलीय.