हे दोघे दिसता कामा नये, उमेदवारीही देऊ नका! मातोश्रीतून कापला मनसेच्या या दोन नेत्यांचा पत्ता; संतोष धुरी यांच्या बॉम्बने मोठी खळबळ
उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या शिलेदारांना दूर करण्याचं काम केलं. आता मनसेचा ताबा घेऊन मनसेच्या शिलेदारांना राज ठाकरेंपासून दूर करण्याचं काम सुरू केलं आहे. राज ठाकरेंनी बंधू प्रेमासाठी पक्षाचा बळी दिला आहे, असा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे.

विद्यार्थी सेनेपासूनच राज ठाकरे यांच्यासोबत असलेले अत्यंत जुने सहकारी संतोष धुरी यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीत मनसेच्या वाट्याला पडणाऱ्या जागा आल्या. तसेच निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवल्याने संतोष धुरी नाराज होते. त्यामुळेच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. संतोष धुरी यांच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. त्याही पेक्षा संतोष धुरी यांनी जे आरोप केले त्यामुळे तर आणखीनच खळबळ उडाली आहे. मातोश्रीतून आम्हा दोन नेत्यांचे पत्ते कापले गेले. आम्हाला उमेदवारीही मातोश्रीतूनच नाकारली गेली. मनसेवर आता उद्धव ठाकरे यांचा ताबा आला आहे, असे एकापाठोपाठ एक बॉम्ब टाकून संतोष धुरी यांनी खळबळ उडवली आहे.
संतोष धुरी यांनी आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मनातील खदखद बोलून दाखवली. तसेच मनसे कशी मातोश्रीची बटिक झालीय यावरही भाष्य केलं आहे. मला निवडणुकीच्या चर्चेत घेतलं नाही, त्याचा राग नाही. मला सीट नाही दिली, त्याचाही राग नाही. साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. पण आमचे नेते संदीप देशपांडे यांना कोणत्याही चर्चेत घेतलं नाही. त्यांना सहभागी करून घेतलं नाही. चौकशी केल्यावर दोन ठाकरे बंधूंमध्ये एक तह झाल्याचं कळलं. तो म्हणजे साहेबांनी दोन किल्ले ठाकरे गटाकडे सरेंडर केले. ते दोन किल्ले म्हणजे संतोष धुरी आणि संदीप देशपांडे, असा दावा संतोष धुरी यांनी केला.
देशपांडे, धुरी दिसता कामा नये
वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की, हे दोघेजण कुठेही दिसले दिसता कामा नये. कोणत्याही चर्चेत दिसू नये. किंवा उमेदवार म्हणून दिसू नये. संदीप देशपांडे निवडणुकीला उभे राहणारच नव्हते. पण संतोष धुरीही दिसले नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. हे जेव्हा मला कळालं, तेव्हा मी संदीप देशपांडेंना सांगितलं. म्हटलं असं होत असेल तर यांच्यासोबत राहण्यात काय अर्थ आहे? एक तर काँग्रेस सोबत जाऊन या लोकांनी स्वत:चं रक्त हिरवं केलं आहे. परत इकडे येऊन आपलंही रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला कुठेही स्थान राहणार नाही. त्यामुळे मी माझा विचार करतो, असं धुरी म्हणाले.
नितेश राणे माझ्यासाठी आले…
संदीपजींचं मन खूप मोठं आहे. त्यांनी सांगितलं तुझा तू विचार कर. मी काही येत नाही. त्यामुळे मी बाहेर पडलो. काल मी फडणवीसांना भेटलो. नितेश राणेंनी मला बोलावून घेतलं. माझ्याशी चर्चा केली. मला भरून आलं. नितेश राणे हे सिंधुदुर्गावरून माझ्यासाठी आले. माझी भेट घेतली आणि परत ते सिंधुदुर्गाला गेले. परत काल आले आणि फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले. माझी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं अमित साटम यांच्याकडे जा आणि प्रवेश घ्या, अशी माहिती त्यांनी दिली.
संदीप देशपांडे त्यांचा निर्णय घेतील
संदीप देशपांडे पक्ष सोडणार का? या प्रश्नावर बोलताना धुरी म्हणाले, त्याचं मन मोठं आहे. खूप मोठं आहे. तो त्याचा निर्णय घेईल. पण माझं मन तेवढं मोठं नाही. त्यामुळे मी माझा निर्णय घेतला. खरं दु:खं आहे की आम्हाला निवडणूक प्रक्रियेत सामील करून घेतलं नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आघाडी सरकारने आम्हाला पळवलं. एक ते दीड महिने आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो. हे सुद्धा विसरलो आम्ही. या लोकांनी आमचे सहा नगरसेवक पळवले. आमच्या अविनाश जाधवांनाही त्रास दिला. तरीही सर्व विसरून साहेबांनी त्यांच्याशी युती केली. उद्धव साहेब हे कोत्या मनाचे आहेत. ते त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी सांगितलं हे दोघे कुठेही दिसले नाही पाहिजे. अनिता माजगावकर, राहुल चव्हाणचंही तिकीट कापलं. आमच्या लोकांना डावललं. केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे, असा आरोप त्यांनी केला.
