Sunil Tatkare: राष्ट्रसंतावरील आरोप चुकीचे; या महान व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे, सुनील तटकरेंचे महेंद्र दळवींना शालीतून जोडे
Sunil Tatkare on Mahendra Dalvi: काल सकाळी सकाळी उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ कॉल त्यांनी शेअर केला. दानवेंच्या या कॅश कांडमुळे एकच खळबळ उडाली. त्यावर आज सुनील तटकरे यांनी तोंडसूख घेतले.

Ambadas Danve Cash Video: काल सकाळी उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब टाकला. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ कॉल त्यांनी शेअर केला. त्यात नोटांची बंडलं आणि अजून एक लाल टी शर्ट घातलेली अस्पष्ट व्यक्ती दिसत होती. काल हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. शिंदे सेना आणि उद्धव सेनेतील नेत्यांनी त्यावरून एकमेकांची उणीदुणी काढली. तर महेंद्र दळवी आणि शिंदे सेनेतील नेत्यांनी ही व्हिडिओ क्लिप मॉर्फ असून ती अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच दानवेंना पाठवल्याचा आरोप केला. त्यावरून एकच शिमगा सुरू झाला. आज सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांचे फुटपट्टी लावत समाचार घेतला.
व्हिडिओ मार्फ आहे की नाही ते तपासा
महेंद्र दळवी यांच्यासह शिंदे सेनेतील आमदारांनी हा मार्फ केलेला व्हिडिओ असल्याचा आरोप केला होता. त्यावर सुनील तटकरे यांनी व्हिडिओ जर मार्फ असेल तर त्याचा तपास करावा असं टायमिंग साधलं. जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, मधू दंडवते या थोर मालिकेत महेंद्र दळवी हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावरील आरोप हे देशावरील आरोप आहेत. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्यावरील आरोपांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी खोचक टीका सुनील तटकरे यांनी केली.
सुनील तटकरेंचे शालीतून जोडे
रायगडमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत विस्तवही जात नाही. त्यातच कालच्या आरोपानंतर सुनील तटकरे यांनी महेंद्र दळवी यांना शालीतून जोडे लगावले. इतक्या थोरभक्तीच्या व्यक्तीमत्वाबदल माझ्या मनात कमालीचा आदर आहे. मी या सर्व गोष्टींची ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि याचा तपशील हिवाळी अधिवेशनाच्या पटलावर ठेवावी असा खोचक टोला लगावला. एवढ्या महान व्यक्तीवरील आरोपांची लागलीच चौकशी झाली पाहिजे. राष्ट्र संतावरील आरोप चुकीचे आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे एकामागून एक चिमटे आणि टोले सुनील तटकरे हे लगावत गेले. त्यातून त्यांनी महेंद्र दळवी यांच्यावर उपरोधीक टीका केली.
महेंद्र दळवी प्रकरणात आता केंद्र आणि राज्यांच्या यंत्रणांनी तपास करावा. NIA ने चौकशी करावी. त्यांच्यावर आरोप झाले आहेत. माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. त्यामुळे महेंद्र दळवी यांनी कोर्टात जावं असं आवाहन त्यांनी केलं. तर मला कोर्टात जाण्याची गरज नाही असे तटकरे म्हणाले. महेंद्र दळवी यांच्यावरील आरोप हा देशाच्या एकात्मतेवरील हल्ला असल्याचा खोचक टोलाही तटकरे यांनी लगावला. अंबादास दानवे यांनी एका सतशील व्यक्तीवर गंभीर आरोप केल्याने, सरकारने त्याची गंभीर दखल घ्यावी असा उपरोधिक टोलाही तटकरे यांनी लगावला.
