Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE : परप्रांतियांना प्रेमाने मराठी शिकवा, आमदार अबू आसिम आझमी यांची प्रतिक्रिया
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास दोन दशकांनंतर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
इंग्लंडला तिसरा धक्का, जो रूट बाद
भारताने विजयासाठी दिलेल्या ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसरा धक्का बसला आहे. जो रूट ७ धावा करून बाद झाला. त्याला आकाश दीपने त्रिफळाचीत केलं.
-
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 2 विकेट गमावल्या, क्रॉलीनंतर डकेट देखील बाद
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात जॅक क्रॉली (0) ची विकेट गेली. क्रॉलीला मोहम्मद सिराजने बदली खेळाडू साई सुदर्शनच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर बेन डकेटला आकाश दीपने धावबाद केले.
-
-
नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अमेरिकेत अटक
नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. तो पीएनबी बँक फसवणूक प्रकरणात आरोपी होता. भारतातून नेहल मोदीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
-
निवडणूक आयोगाने मुख्तार अन्सारीच्या पक्षाला नोटीस बजावली
माफिया मुख्तार अन्सारी यांनी बनविलेल्या कौमी एकता दलची ओळख धोक्यात आहे. पक्षाची मान्यता का रद्द केली जाऊ नये, असे विचारून निवडणूक आयोगाने पक्षाला “शो कॉज नोटीस” जारी केले आहे. मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी यांनाही मोठा राजकीय धक्का बसला आहे. जर उत्तर समाधानकारक नसेल तर, कौमी एक्ता दलची राजकीय मान्यता लवकरच रद्द केली जाऊ शकते.
-
पंतप्रधान मोदींनी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांची भेट घेतली
अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी राजधानी ब्यूनस आयर्समध्ये पंतप्रधानांचे स्वागत केले तेव्हा अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना मिठी मारली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी ब्यूनस आयर्समधील सॅन मार्टिन स्मारकावर पुष्पांजली वाहिली.
-
-
परप्रांतियांना प्रेमाने मराठी शिकवा, आमदार अबू आसिम आझमी यांची प्रतिक्रिया
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी यांनी मराठी भाषेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान आहे. मात्र गुंडगिरी खपवून घेणार नाही, असं आझमी म्हणाले. तसेच परप्रांतियांना प्रेमाने मराठी शिकवा, असं आवाहन आझमी यांनी केलं आहे.
-
मंगळवेढा-पंढरपूर रोडवर रिक्षाची वारकऱ्याला धडक, 2 आमदार मदतीसाठी सरसावले
सोलापूरातून मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवेढा-पंढरपूर रोडवर रिक्षाने वारकऱ्याला धडक दिली. या धडकेनंतर भाजपचे 2 आमदार अपघातग्रस्त वारकऱ्याच्या मदतीसाठी सरसावले. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्याला आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांनी स्वत:ची गाडी देत मदत केली. जखमी वारकऱ्यावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी आमदारांनी स्वतःची बीएमडब्लू गाडी दिली आणि दवाखान्यात पोहोचवलं. अपघातानंतर काहीच मिनिटांत वाहन उपलब्ध झाल्याने जखमी वारकऱ्याला वेळेत उपचार मिळाले. त्यामुळे पुढील संभाव्य धोका टळला.
अपघातग्रस्त वारकरी सांगोला तालुक्यातील जुनोनी गावातील असल्याची माहिती आहे. हे वारकरी मंगळवेढाहून पंढरपूरला पायी निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. मात्र आमदारदारांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य धोका टळला.
-
-
सांगली जिल्ह्यातील कडेगावात मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांची उभारणी
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले सांगली जिल्ह्यातील कडेगाव मोहरम गगनचुंबी ताबुतांची उभारणी सुरू आहे. उद्या ताबुतांचा भेटी सोहळा संपन्न होणार आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातील पर्यावरण दिंडीत सहभागी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक पंढरपुरातील पर्यावरण दिंडीत सहभागी झाले आहेत,पर्यावरण दिंडीत त्यांनी टाळ मृदूंग वाजवला आहे.
-
मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरे यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे- आकाश फुंडकर
मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरे यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे अशी टीका मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे.
-
फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले – एकनाथ शिंदे
फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षांपूर्वी अजून त्यातून सावरले नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
-
दोन भाऊ एकत्र आले याचा आनंद आहे, मात्र याचा महायुतीला जास्त फायदा – आठवले
20 वर्षांनी दोन भाऊ एकत्र आले याचा आनंद आहे, मात्र याचा महायुतीला जास्त फायदा होईल असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर भाष्य केले आहे.
-
” आजच्या मेळाव्यातून फक्त जळजळ आणि मळमळ दिसून आली.”,एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या घटनेवर आणि आजत्या मेळाव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ‘उद्धव ठाकरे सुरवातीला माफी मागतील असं वाटलं होतं. हिंदी अनिवार्य करण्याचं का ठाकरेंच्याच काळात झालेलं. आजच्या मेळाव्यातून फक्त जळजळ आणि मळमळ दिसून आली.” असं म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
पंढरपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रमाचं आयोजन
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये दाखल
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. ते आज पंढरपूरमध्ये विविध समारंभाला उपस्थित राहणार आहेत व उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पुजा संपन्न होणार आहे.
-
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी…; शिवसेनेचं ट्विट चर्चेत
‘एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक… एक उजवा, दुसरा डावा… एक धाकला असून थोरला.. दुसरा थोरला असून धाकला.. एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी… एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड! एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता… एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा… एकाचा मराठीचा वसा, दुसऱा भरतोय खिसा.. एकाचा स्वतंत्र सवतासुभा दुसरा नुसताच आयतोबा,’ असं ट्विट शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.
-
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील- राज ठाकरे
विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट केलंय. ‘हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं. त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार,’ असं त्यांनी लिहिलंय.
-
धाराशिवमध्ये ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष
धाराशिवच्या कळंब शहरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. आज मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत त्रिभाषा सूत्र रद्द केल्याबद्दल विजयी मेळावा घेतला. याच संदर्भात शिवसेना ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला.
-
ठाकरे बंधू एकत्र येताच अंधेरीत फटाके फोडून जल्लोष
ठाकरे बंधू एकत्र येताच अंधेरीत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. अंधेरी पश्चिमेला मनसे पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
-
विजयी मेळाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
“निवडणुकीबद्दल दोघं भाऊ ठरवतील. ते जे ठरवतील, त्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिली.
-
आजचा दिवस हा निवडणुकांसोबत जोडू नका- बाळा नांदगावकर
“आजचा दिवस हा निवडणुकांसोबत जोडू नका. आजचा दिवस अवर्णनीय, आनंदाचा आणि जल्लोषाचा आहे. सगळंच राजकारणात मोडू नका,” अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.
-
भाजप मुंबई मिळवू शकणार नाही- राऊत
“भाजप मुंबई मिळवू शकणार नाही. भाजप, अदानी, लोढा, शाह हे कितीही एकत्र आले तरी त्यांना मुंबई गिळता येणार नाही. आजचं चित्र ज्याने पाहिलंय, ठाकरे पॉवर.. त्यामुळे त्यांनी हा नाद सोडावा. काँग्रेसचे नेते आले नसले तरी त्यांच्याशी संपर्क होता. त्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू आहे,” असं राऊत म्हणाले.
-
दोन राजकीय नेते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात- संजय राऊत
“दोन राजकीय नेते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात. दोघांनी मिळून सांगितलंय की, महाराष्ट्रातील सत्ता आम्ही उधळून लावू. तुम्ही विधानसभेत आहात, तर आम्ही रस्त्यावर आहोत. हे राजकीय स्टेटमेंट आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
-
मेळाव्यानंतर ठाकरे कुटुंबीयांचं एकत्र फोटोसेशन
विजयी मेळावाच्या समाप्तीनंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोसेशन केलं. यावेळी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही मंचावर आले. अमित आणि आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरेंचा हात धरून राज ठाकरेंच्या जवळ नेलं.
-
आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही, पण मारुती स्तोत्र का विसरायला लावता? – उद्धव ठाकरे
“आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही. पण मारूती स्त्रोतं का विसरायला लावता. जय श्रीरामला विरोध नाही. पण भेटल्यावर राम राम म्हणणारे आम्हीच मराठी. तुम्ही आता जय श्रीराम म्हणता. पण जय जय रघुवीर समर्थ म्हणणारे आमचे रामदास होते,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
तुटू नका, फुटू नका.. मराठी ठसा पुसू नका- उद्धव ठाकरे
तुटू नका, फुटू नका.. मराठी ठसा पुसू नका… असं आवाहन करत उद्धव ठाकरेंनी भाषणाचा शेवट केला.
-
कुणाच्याही लग्नात भाजपला बोलवू नका- उद्धव ठाकरे
“सक्तीचा प्रयत्न केला तर आमची शक्ती अशी दाखवू की पुन्हा डोकं वर काढणार नाही. आज आपण एकत्र आलो. पुन्हा काड्या घालण्याचे प्रयत्न होतील. त्यांचा धंदाच तो आहे. कुणाच्याही लग्नात भाजपला बोलवू नका. श्रीखंड, बासुंदी, पोळ्या खातील आणि नवरा बायकोमध्ये भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जातील. नाही तर पोरीलाच पळवून नेतील,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
-
लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद केलं, आता बसा बोंबलत- उद्धव ठाकरे
“लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद केलं. आता नव्याने नोंदणी होणार नाही. बसा बोंबलत. देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र थांबणार नाही. कर्ज काढतच राहणार,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
तिकडे मोदी जगभर फिरतायत, इथे शेतकऱ्याला बैल मिळत नाही- उद्धव ठाकरे
“मोदी जगभर फिरत आहेत. स्टार ऑफ घाणा, असा मोठा पट्टा घातला. इकडे घाण आणि तिकडे घाणा. एकीकडे मोदींचा फोटो आणि दुसरीकडे शेतकऱ्याला बैल मिळत नाही. तो अंगावर नांगराचं जोखड घेतो. तिकडे मोदी स्टार ऑफ घाणा. लाज वाटली पाहिजे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
-
महाराष्ट्रही काबीज करू- उद्धव ठाकरे
“तुम्ही गद्दारी केली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे बसलेत. त्यांचे बुट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात. आपल्या डोळ्यांदेखत लचके तोडले जात आहे. किती काळ सहन करायचं? प्रत्येकवेळी काय झालं की भांडाभांडी करणार. आम्ही एकत्र आल्यावर सत्ताप्राप्ती. काही म्हणतात यांचा म मराठीचा नाही. म महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्रही काबीज करू,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
आजपर्यंत वापर करून घेतला, आता आम्ही वापर करून फेकणार आहोत- उद्धव ठाकरे
“राज आणि मी अनुभव घेतला आहे, या नतद्रष्टांचा. वापरायचं आणि फेकायचं. आजपर्यंत वापर करून घेतला. आता आम्ही दोघं वापर करून फेकणार आहोत. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं महाराष्ट्रात? कोणत्या भाषेत बोलत होता? राज तू सर्वांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सर्वच उच्चशिक्षित आहे. भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. मधल्या काळात सुरू केलं. की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे कडवट हिंदुत्ववादी आहोत. तुम्ही काय हिंदुत्व शिकवता,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
-
आमच्या दोघांमधील अंतरपाट होता, तो अनाजी पंतांनी दूर केला- उद्धव ठाकरे
“आमच्या दोघांमधील अंतरपाट होता, तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे. अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील, त्या सर्वांना सांगतोय.. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे ठाकलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
सन्माननीय राज ठाकरे आणि..; उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात
“बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचायत अशी आहे की, त्याने मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललंय. साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलंय. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करतात, सन्माननीय राज ठाकरे.. आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू भगिनींनो आणि मातांनो.. अप्रतिम मांडणी राजने केली. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला वाटतं की आज आमच्या भाषणापेक्षा, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
कानाखाली मारली तर त्याचे व्हिडीओ काढू नका, पण उठसूट कुणाला मारू नका- राज ठाकरे
“उठसूट मारायची गरज नाही. पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगणारा नसतो. मार खाणारा सांगतो. मला मारलं. त्यांना सांगू देत. पण उठसूट कुणाला मारू नका,” असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले.
-
बाळासाहेब ठाकरे इंग्रजी मीडियामध्ये शिकले, त्यांच्या मराठीबाबत शंका घेऊ शकता का?- राज ठाकरे
आम्ही मराठी मीडियात शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा? बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?, असा सवाल राज ठाकरेंना केला.
-
कुणाची माय व्याली त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा- राज ठाकरे
“या हिंद प्रांतात सव्वाशे वर्ष आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश अटोकपर्यंत आम्ही पोहोचलो. आम्ही लादली? हिंदी भाषा २०० वर्षापूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
महाराष्ट्र ज्यावेळी पेटून उठतं, त्यावेळी काय घडतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल- राज ठाकरे
“महाराष्ट्र ज्यावेळी पेटून उठतं, त्यावेळी काय घडतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. हिंदीभाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, हिंदी न बोलणारी राज्ये आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत.. आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना राज्यांचा विकास करता आला नाही. कोणसाठी हिंदी शिकायचं? पाचवीनंतर पोरगा हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार का”, असं राज म्हणाले.
-
तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती.. रस्त्यावर- राज ठाकरे
“खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं ते कळलं नाही. हिंदी. कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कुणाला विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही. आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे. ती रस्त्यावर,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी- राज ठाकरे
“आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय,. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
जे बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं- राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं.. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं राज ठाकरे म्हणाले.
-
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
“खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. पण नुसतं मोर्चाच्या चर्चेनंत माघार घ्यावी लागली. आजचा हा मेळावा शीवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. मी बाहेर उभं असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकाच मंचावर
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. ठाकरे बंधूंनी मंचावर एकत्र एण्ट्री केली. 18 वर्षांनंतर दोघं एकत्र आले.
-
विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंमध्ये चर्चा
उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या व्हिआयपी रुममध्ये गेले आहेत. याठिकाणी दोघांनी संवाद साधला आहे. विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली आहे.
-
महाराष्ट्राच्या राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
-
राज ठाकरेसुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले
राज ठाकरे वरळी डोममध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी अमित ठाकरे आणि मितालीसुद्धा तिथे पोहोचले होते. उद्धव ठाकरेसुद्धा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
-
उद्धव ठाकरे वरळी डोममध्ये दाखल
उद्धव ठाकरे हे वरळी डोममध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेसुद्धा आहेत. तर दुसरीकडे अमित ठाकरे हेसुद्धा वरळी डोममध्ये याआधी दाखल झाले होते.
-
मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही, केडियावर भुजबळांची प्रतिक्रिया
“मराठी माणूस ज्या राज्यात गेले, त्याठिकाणी ते त्या-त्या राज्याची भाषा बोलतात. मराठी बोलणारच नाही हे काही बरोबर नाही. जे मंडळी मराठी बोलणार नाहीत असे सांगतात, ते परदेशी गेल्यावर इंग्रजी बोलतात,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी सुशील केडिया यांच्या प्रकरणावर दिली.
-
मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली, आज त्याच मुद्द्यावर ठाकरे बंधु एकत्र- भुजबळ
“हे स्वाभाविक आहे. मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली. याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. – या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भावांनी एकत्र यावं अशी लोकांची इच्छा आहे,” असं छगन भुजबळ म्हणाले.
-
मराठी माणूस रस्त्यावरून चालत येतोय, अनेक वर्षांनंतर हे दृश्य दिसलं- जितेंद्र आव्हाड
“हे दोघं एकत्र येणं स्वाभाविक होतं आणि ते आता एकत्र येताना दिसतायत. मला आनंद होतोय की मराठी माणूस रस्त्यावर चालत येताना दिसतोय. अनेक वर्षांनंतर हे दृश्य पहायला मिळतंय. या ऐतिहासिक दिवसाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा मला आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हांनी दिली.
-
सुषमा अंधारेंचा नितेश राणेंना उपरोधिक टोला
इतक्या मोठ्या आनंदाच्या क्षणी आपण छोट्या पोरांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं, वाईट वाटून घ्यायचं नसतं. ती लहान पोरं आहेत. नितेश बेटा आनंद घेत राहा, असा उपरोधिक टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे. ठाकरे बंधुंचा मेळावा म्हणजे जिहादी सभा आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली होती.
-
मराठी मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद, तुफान गर्दी
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. वरळी डोम परिसरात तुफान गर्दी झाली आहे. कार्यकर्त्यांना अखेर गेटच्या आत सोडण्यात आलं आहे. सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर प्रचंड गर्दी झाल्याचं पहायला मिळत आहे.
-
वरळी डोम परिसरात पोलिसांची अधिक कुमक
वरळी डोम परिसरात पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे. पोलिसांची एक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे. बाळा नांदगावकर यांनीसुद्धा कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. वरळी डोम पूर्णपणे भरल्याने आत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे गेटबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
-
वरळी डोमबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
वरळी डोम परिसरात कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. वरळी डोममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
-
वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांची तुंबड गर्दी
वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे. वरळीतलं सभागृह पूर्णपणे भरलंय आणि आत प्रवेश मिळवण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
-
गणेश वंदनेनं विजयी मेळाव्याची सुरुवात
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याची सुरुवात गणेश वंदनेनं झाली. वरळी डोम हे खचाखच भरलंय. मराठी कलाकारांनीही या मेळाव्याला हजेरी लावली आहे. यात तेजस्विनी पंडित, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा समावेश आहे.
-
नितेश राणे हे काल-परवा हिंदू झालेत, अविनाश जाधव यांचा टोला
“आज संपूर्ण महाराष्ट्र हा एकतर इथे आणि दुसरं टेलिव्हिजनसमोर असेल. आम्हाला एकत्र येऊ द्या. असंही एवढ्या वर्षांपासून आम्ही त्यांना धडा शिकवतोच आहे. आता धडा शिकवताना आमच्या बाजूने मजबूत खांदे असतील,” असं मनसेचे अविनाश जाधव म्हणाले. नितेश राणेंनी या विजयी मेळाव्याला ‘जिहादी सभा’ असल्याचं म्हटलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव म्हणाले, “नितेश राणे हे काल-परवा हिंदू झालेल आहेत. यांच्यावर विश्वास ठेवू नका.”
-
इथे व्यवसाय करता तर मराठी बोलायची लाज कसली तुम्हाला? भरत जाधवचा सवाल
“इथे व्यवसाय करता तर मराठी बोलायची लाज कसली तुम्हाला? मी ३० वर्षांपासून इथे राहातो, हे अभिमानाने कशाला सांगता?” असं भरत जाधव सुशील केडियाच्या विषयावर म्हणाले. “मला असं वाटत की, मराठी माणसाने जागं व्हायला हवं. मराठीपणा जपायला हवा. मी असं म्हणत नाही की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. हिंदीपण चांगलं आहे. पण हिंदी सक्तीची नसावी या गोष्टीवर आपण होतो” असं भरत जाधव म्हणाले.
-
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यात डाव्या पक्षांचाही सहभाग
मराठी प्रश्नावरून मुंबईतील विजयी मेळाव्यात डावे पक्षही सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात डाव्या पक्षांचे भाई जयंत पाटील (शेकाप), डॉ. अजित नवले (माकप), प्रकाश रेड्डी (भाकप), उदय भट (भाकप, मा.ले. लिब्रेशन) हे प्रतिनिधित्व करतील.
-
इतर वेळी मदतीसाठी ‘शिवतीर्थ’चा दरवाजा ठोठावतात, मराठीच्या प्रश्नासाठी समोर का येत नाही? तेजस्विनीचा इतर कलाकारांना सवाल
“मी माझ्यापुरतं बोलू शकते, मलासुद्धा प्रश्न पडला आहे की असं का होत नाही? इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो. जेव्हा मराठीचा प्रश्न येतो, तेव्हा समोर का येत नाही? हे दुर्दैवी आहे. एक कलावंत म्हणून मलाही हा प्रश्न आहे. ज्या राज्यात आपण राहतो, तिथे मराठी बोलली गेली पाहिजे, ही अपेक्षा असणं चुकीचं नाही,” असं तेजस्विनी पंडित म्हणाली.
-
या दृश्यासाठी अवघा महाराष्ट्र आसुसलेला होता- तेजस्विनी पंडित
“आम्ही इथे मराठीसाठी आलो आहोत. मराठीचा विजय साजरा करण्यासाठी आलो आहोत. मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे, हे माहीत नाही. मी माझ्यापुरतं वैयक्तिक बोलू शकते. या दृश्यासाठी अवघा महाराष्ट्र आसुसलेला होता,” अशी प्रतिक्रिया तेजस्विनी पंडितने दिली.
-
मराठी माणसांवर राज्य करताय, त्यांनाच लांब करत असाल तर चुकीचं- भरत जाधव
“तुम्ही मराठी माणसांवर राज्य करताय, तर त्यांनाच लांब करत असाल तर चुकीचं आहे. मी निषेध व्यक्त करतो. दोन्ही ठाकरे बंधुंनी असंच एकत्र राहिले तर चांगली गोष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया अभिनेते भरत जाधव यांनी दिली.
-
मराठी बोलणार नाही, हा अट्टहास का? किमान शिकण्याचा तरी प्रयत्न करा- तेजस्विनी पंडित
“अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत. अजून मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत. सर्वांत आधी महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे, महाराष्ट्रातला मराठी एकत्र यायला पाहिजे. आता लोकांनी हे जे वातावरण बिघडवलं आहे, यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं. कारण आम्ही हिंदीविरोधात नाही. आम्ही सक्तीविरोधात होतो. मराठी बोलणार नाही, हा अट्टहास का? किमान शिकण्याचा तरी प्रयत्न करा,” अशी प्रतिक्रिया अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिली.
-
शेठजींच्या पैशांतून मुंबई निर्माण झाली नाही, हे शिंदेंनी समजावं- राऊत
“गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकासकामं केली, मग पैशे, संपत्ती कमावली नाही का? मुंबईच्या उभारणीत सर्वांत जास्त योगदान पारशी समाजाचं आहे. तुम्ही असं बोलून मराठीचा अपमान करताय, मिस्टर शिंदे. ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमिकांच्या, गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माण झाली आहे. या शेठजींच्या पैशांतून निर्माण झाली नाही. एकनाथ शिंदेंनी आधी माफी मागितली पाहिजे,” असं राऊत म्हणाले.
-
खरंतर फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत- संजय राऊत
“गुजरातवर गायकवाड, भोसलेंचंच राज्य होतं. म्हणून अमित शाह किंवा मोदी हे बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर, ग्वाल्हेर ही मराठी राज्ये आहेत. पेशवे पण तिकडेच गेले होते. त्यांच्यापेक्षा जास्त इतिहास मलाही माहीत आहे. उगाचच सारवासारव करू नका. खरंतर फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत. उत्तेजन देतायत की तुम्ही वारंवार अशी भूमिका घ्या”, अशी टीका राऊतांनी केली.
-
शिवसेनेच्या संघर्षाचा अभ्यास फडणवीसांनी करावा- राऊत
“देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता, तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संघर्षातून शिवसेना उभी केली, त्याचा अभ्यास फडणवीसांनी करणं गजरेचं आहे. आज ते मान ताठ करून बोलतायत, त्याच्यामागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहे. मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानाने जगता यावं, यासाठी आम्ही केलेल्या विधायक गुंडगिरीमुळे तुम्ही खुर्चीवर बसला आहात”, असं राऊत म्हणाले.
-
आजचा रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवेल- संजय राऊत
“एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवेल, यात शंका नाही. आजचा दिवस आमच्या जीवनात यावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. हा आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
-
दोन्ही बंधुंनी मराठी माणसांना संबोधित करावं, असं नियोजन- संजय राऊत
“हा ठरवून केलेला कार्यक्रम नाही. आम्ही संघर्ष केला, सरकारने माघार घेतली आणि त्या विराट मोर्चाचं रुपांतर विजयी मेळाव्यात झाला. या कार्यक्रमाची रुपरेषा अत्यंत स्पष्ट आहे. 11.30 वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल. सुरुवातीला महाराष्ट्राचं राज्यगीत वाजवलं जाईल, त्यानंतर कोळी बांधवांच्या बँडकडून तिने मराठी संस्कृतीचं दर्शन होईल असं सादरीकरण होईल. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहेत. सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्रित महाराष्ट्राला संबोधित करावं, अशा प्रकारचं नियोजन आहे,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
-
“हा जर मोर्चा निघाला असला तर “न भूतो न भविष्यति” असा झाला असता, त्यानंतर सरकार पडलं असतं”
“या सगळ्यांचं श्रेय राज ठाकरेंचं आहे. कारण एप्रिलपासून त्यांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यात एण्ट्री केली आणि त्यांनीसुद्धा त्याच प्रखरतेने भूमिका मांडली. दोन्ही बंधुंनी मिळून हा विषय पुढे नेला. हा जर मोर्चा निघाला असला तर “न भूतो न भविष्यति” असा मोर्चा झाला असता. या मोर्चानंतर यांचं सरकारदेखील पडलं असतं. त्याच भीतीने त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला,” असं मनसेचे अविनाश जाधव म्हणाले.
-
भाजपाने पेरलेली लोकंच बोलतात की, हम मराठी नहीं बोलेगा- अविनाश जाधव
“भाजपाने पेरलेली लोकंच बोलतात की, हम मराठी नहीं बोलेगा, हिंदी में बोलेगा. असेच लोक आमचा मार खातात. खरंतर मी कावळ्याला विचारणार आहे. तुला जर ठाण्यात बोलावलं तर तू येशील का आणि या लोकांची शाळा घेशील का? आता आम्ही शिकवण्याच्या पलीकडे गेलोय. यांना कावळ्यांनी शिकवलं पाहिजे”, अशी उपरोधिक टीका मनसेच्या अविनाश जाधवांनी केली.
-
“महाराष्ट्राला लागलेली दलिंद्री ठाकरे बंधु पुसून काढल्याशिवाय राहणार नाहीत”
“महाराष्ट्राला लागलेली दलिंद्री ही उद्धव आणि राज ठाकरे पुसून काढल्याशिवाय राहणार नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र स्टेजवर पाहण्यासाठी आमचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे डोळे तरसले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते गाडी, रेल्वे, एसटीने मुंबईकडे निघाले आहेत,” असं शरद कोळी म्हणाले.
-
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची एकनाथ शिंदे, रामदास कदमांवर टीका
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी एकनाथ शिंदे, रामदास कदमांवर टीका केली आहे. “एकनाथ शिंदे, तुम्ही आता गुजरातचे आधार कार्ड, रेशनकार्ड काढा आणि गुजरातमध्ये राहायला जा. तुमचं इथे काम नाही. अरे, तुझं नाव रामदास आणि वागणं, नीतिमत्ता रावणासारखी आहे,” अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी केली.
-
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यासाठी वरळी डोममध्ये जय्यत तयारी
वरळी डोममध्ये ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. वरळी डोममध्ये सात ते आठ हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. हॉलमध्ये तसंच हॉलच्या बाहेर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
-
आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण- अनिल परब
“आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी मनाची एकजूट बांधली, आज पुन्हा एकदा ठाकरे बंधु या विषयावर एकत्र आले आहेत. हिंदी सक्तीबद्दल सरकारने जी जबरदस्ती चालवली होती, त्याला हाणून पाडलं, त्याचाच आज विजयी उत्सव आहे. प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे,” असं अनिल परब म्हणाले.
-
“ठाकरे बंधु काय संदेश देणार, याकडे सर्वांचं लक्ष”
“या विजयी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येणार आहेत. लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. ठाकरे बंधु काय संदेश देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली.
-
“मराठी बोलता येत नाही म्हणून नव्हे तर जाणीवपूर्वक मराठीचा अपमान केला म्हणून मारलं”
“मराठी बोलत नव्हता, म्हणून मारलं नाही. तर जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अपमान करत होता, म्हणून रेस्टॉरंट मालकाला मारलं. जो मराठी भाषेचा अपमान करणार, त्याच्यावर एकतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नाहीतर आम्ही करणार. मराठी भाषेचा अपमान आणि आग्रह या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,” असं संदीप देशपांडे म्हणाले. मीरा-भाईंदर याठिकाणी एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी कानाखाली मारली होती.
-
कसं आहे विजयी मेळाव्याचं व्यासपीठ?
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत.
-
मनसे कार्यकर्ते पारंपारिक पोशाखात, कोळी बँडसह मेळाव्याच्या ठिकाणी रवाना
मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी आणि मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते पारंपारिक पोशाखात आणि कोळी बँडसह ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कांदिवलीहून ट्रेनने निघत आहेत. हे सर्वजण कांदिवली ते महालक्ष्मी स्टेशनपर्यंत ट्रेनने प्रवास करतील. त्यानंतर महालक्ष्मी स्टेशनला उतरून, चालत मेळाव्याच्या ठिकाणी जाणार आहेत.
-
‘महाशय, उगाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करू नका’, राऊतांचं फडणवीसांना उत्तर
‘महाशय, उगाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करू नका. जरा या विषयावर त्यांचं काय म्हणणं होतं ते समजून घ्या. नाहीतर एक शिकवणी लावा,’ असं ट्विट करत संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवासांना टोला लगावला आहे.
-
राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात
सकाळी 11.30 वाजता ठाकरे बंधू वरळी डोमला पोहोचणार आहेत. वरळी डोममध्ये मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंचे जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत.
-
राज ठाकरेंनंतर होणार उद्धव ठाकरेंचं भाषण- सूत्र
विजयी मेळाव्यात आधी राज ठाकरे बोलणार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे बोलणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या मेळाव्यात सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शेकापचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि प्रकाश रेड्डी यांचंही भाषण होणार असल्याचं कळतंय.
-
आज दोन्ही पांडुरंग एकत्र दिसणार आहेत- वसंत मोरे
“उद्या आषाढी एकादशी आहे. उद्या पांडुरंग सगळ्यांना भेटणार आहे. मला तर आज दोन्ही पांडुरंग एकत्र दिसणार आहेत. भविष्यातही हे दोन्ही पांडुरंग एकत्रच असावेत, यासाठी मी प्रार्थनासुद्धा केली आहे. मी पांडुरंगाला साकडं घातलंय”, असंही वसंत मोरे म्हणाले.
-
आमच्यासाठी आजच दसरा-दिवाळी- वसंत मोरे
“गेल्या 18-20 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आम्ही रात्री 500 किलोमीटरचा प्रवास करून एवढ्यासाठी आलोय. जशी तुम्हा सर्वांना उत्कंठा आहे, तशी आम्हालाही आहे. आज प्रत्येकाची पावलं मुंबईच्या दिशेने निघाली आहेत. आमच्यासाठी आजच दसरा आणि दिवाळी आहे,” अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली.
-
शिंदेंच्या ‘जय गुजरात’ उल्लेखामुळे ठाकरे गटासाठी आयती संधी
शिवसेना आणि मनसेच्या जल्लोष मेळाव्याच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात जय गुजरातचा उल्लेख केल्याने शिवसेना ठाकरे गटासाठी आयतीच संधी मिळाली आहे. याबाबत विजयी मेळाव्यात काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
-
वरळी डोमच्या बाहेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची कमान
वरळी डोमच्या बाहेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची कमान लावण्यात आली आहे. ‘आवाज मराठीचा’ असा आशय या कमानीवर लावण्यात आला आहे. यावर एका बाजूला राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे.
-
हा राजकीय मेळावा नाही, ही मराठी माणसाची एकजूट- संदीप देशपांडे
“हा राजकीय मेळावा नाही, ही मराठी माणसाची एकजूट आहे. मराठी माणसाची एकजूट साजरी करायला आपण सगळे इथे जमलोय. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आपण याकडे राजकीय चष्म्यातून बघू नये,” असं संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलंय.
-
महाराष्ट्रात मराठीत चालणार आणि मराठीचाच आवाज होणार- संदीप देशपांडे
“महाराष्ट्रात मराठीत चालणार आणि मराठीचाच आवाज होणार. हे कोण लुख्खे, पुख्खे केडिया आहेत. यांची लायकी काय आहे, हे शिकवणार का? जर मराठी भाषेचा अपमान केला, तर कानाखालीच पडणार. एकतर मुख्यमंत्र्यांनी याविरोधात कारवाई करावी, नाहीतर आम्ही करू. मला वाटतं जाणीवपूर्वक यांना पुढे बोलावलं जातंय. यांचा बोलवता धनी वेगळा आहे,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली.
-
मुंबईत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे बॅनर्स
महायुती सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावलेले बॅनर्स विशेष चर्चेत आले आहेत. या मेळाव्याला शरद पवार आणि काँग्रेसच्या वतीनेही पाठिंबा असल्याचं बॅनर्सवरून दिसून येत आहे. ‘मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा,’ असा बॅनरवर मजकूर आहे. मुलुंड टोलनाक्यावर असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही ठाकरे बंधु एकत्र येणार याची उत्सुकता आहे. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र विजयी मेळावा घेणार आहेत. हा विजयी मेळावा आज (5 जुलै) एन. एस. सी. आय. डोम वरळी इथं होणार आहे. या मेळाव्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजीदेखील झाली.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने त्याविरोधात पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाला. मोर्चा रद्द झाल्यानंतर विजयी मेळावा घेण्याचं उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं. याबाबत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना फोन करून या मेळाव्यात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. याची माहिती स्वत: राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. हा विजयी मेळावा असला तरी त्यात कोणतंही पक्षीय लेबल लावायचं नाही, हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे, असं ते म्हणाले. या विजयी मेळाव्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jul 05,2025 7:41 AM





