निवडणुकीसाठी कामाला लागा, अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश, बैठकीत काय सांगितलं?
आगमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी तयारीला सुरुवात केली आहे, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेसह पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रावादीचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महायुतीतच लढवल्या जाणार असल्याचं महायुतीमधील काही नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे याबाबत महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, त्यातच आता मुंबईमध्ये पार पडलेल्या विजयी मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
नुकतीच राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या कामाला लागा, निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल, आपण आपली प्रत्येक प्रभागात तयारी करा. पुण्यात आपल्याकडे संख्याबळ चांगलं आहे, प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा सदस्य नोंदणी करा, मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन, ऑगस्ट महिन्यात मी सगळा आढावा घेणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे त्यांनी नवीन शहराध्यक्षांना कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
दुसरीकडे भाजपनं देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेक महायुतीचाच महापौर होईल, उत्तर मुंबईमधून कमीत कमी 38 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे. आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते पियुष गोयल यांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतच होतील असं म्हटलं आहे.
