रक्ताचं पाणी करुन जमवलेला संसार महापुराने नेला, झोपडीतली प्रियांका नवऱ्याला म्हणते, ‘चिंता नाय करायची, लढायचं!’

सिंधदुर्गातल्या एका गरोदर विवाहितेची ही कहाणी, जिला ती किती महिन्यांची गरोदर आहे, तिचं वय किती आहे, हे सुद्धा माहीत नाही. या पुराने तिचं जीवन उध्वस्त केलंय...

रक्ताचं पाणी करुन जमवलेला संसार महापुराने नेला, झोपडीतली प्रियांका नवऱ्याला म्हणते, 'चिंता नाय करायची, लढायचं!'
सिंधदुर्गातल्या प्रियांका नावाच्या गरोदर विवाहितेची ही कहाणी, जिला ती किती महिन्यांची गरोदर आहे, तिचं वय किती आहे, हे सुद्धा माहीत नाही. या पुराने तिचं जीवन उध्वस्त केलंय...
महेश सावंत

| Edited By: Akshay Adhav

Jul 27, 2021 | 7:14 PM

सिंधुदुर्ग :  मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने अनेकांचे संसार उध्वस्त केले. कुणाचं डोक्यावरचं छत्र हरवलं तर कुणाचा अख्खा संसारच वाहून गेला तर कोण पोरका झाला…. अशीच एका गरोदर विवाहितेची ही कहाणी, जिला ती किती महिन्यांची गरोदर आहे, तिचं वय किती आहे, हे सुद्धा माहीत नाही. या पुराने तिचं जीवन उध्वस्त केलंय… तिचा पूर्ण संसार वाहून गेलाय. तरी देखील ती ताठ कण्याने उभी आहे, आपल्या दोन चिमुकल्यांसाठी आणि येणाऱ्या बाळासाठी….! तिची कथा आहे अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी म्हणजेच, ‘फक्त लढ म्हणासारखी…!’

सगळा संसार वाहून गेला….

22 तारखेच्या पुराने अनेकांचे संसार उघड्यावर आणले. त्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे आले. पण समाजातील मागास जातींतील पिडीतांचे दुःख कुणाला उमजलेच नाही. अशीच ही दुर्दैवी आदिवासी प्रियांका निकम कणवकवलीच्या आदिवासी पाड्यात राहणारी… लहान वयातच लग्न झालं. नवरा एका अपत्याला जन्म देऊन पसार झाला. तानुल्याला फिरवून फिरवून प्रियांकाचा दमछाक झाला. त्यातच अपत्याचा मृत्यू झाला. पुन्हा एकदा तीचं लग्न लावून दिलं. पुन्हा नवीन स्वप्नांसह संसार सुरु झाला. दोन मुलं झाली. काबाडकष्ट करुन प्रियांका आणि तिचा नवरा आनंदात दोन मुलांसह राहत होते. आता ती पुन्हा गरोदर आहे आणि अशातच 22 तारखेला निसर्गाने दगा दिला, आणि त्या पुरात कसाबसा जमवलेला अख्खा संसारच वाहून गेला. अचानक झोपडीत पाणी शिरताच चिमुकल्या मुलांना घेऊन ती गरोदर माता धावत राहिली. नवरा कामावर गेलेला.

जगण्याचा वाईट संघर्ष

प्रियांकाला तिचं वय किती हे सुद्धा माहित नाही. एवढंच नव्हे तर ती किती महिन्यांची गरोदर आहे, हे सुद्धा सांगता येत नाही. शेजारील महिलेने सांगितल्यावर तीन महिने झाले, असं तिने सांगितलं. या आदिवासी लोकांसाठी काम करणाऱ्या अखंड लोकमंच या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाड्यात पाणी भरल्याचे समजताच धाव घेतली आणि या लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं.

वाईट काळातही लोकांचं वागणं चांगलं नाही

तीन झोपड्यात सात कुटुंबांचा संसार सुरु होता एकूण माणसे होती 22…. झोपडीत पाणी शिरलं… भांडी, अंथरूण, कपडे, अन्न धान्य, सगळं सगळं वाहून गेलं. प्रियांकासह सर्वच लोकांना सुरक्षित स्थळी ठेवणं गरजेचं होतं. काही संस्थांनी आपल्या जागेत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर या संस्थेच्या अध्यक्षांनी जे स्वतः नामांकित चित्रकार आहेत त्यांनी आपल्या स्टुडिओत यांना निवारा दिला. दोन दिवस स्टुडिओत ठेवल्यानंतर आता त्यांना तिथून 10/12 किमी च्या अंतरावर त्यांच्याच एका कार्यकर्तीच्या घरी ठेवण्यात आलं आहे. त्या घरात सध्या प्रियांका व इतर लोक एकत्र राहत आहेत.

पाठीवरची हात ठेऊन फक्त लढ म्हणा…!

प्रियांकाला आपली व्यथा नीट मांडता येत नसली तरी तिचा आत्मविश्वास दांडगा आहे. या दुर्घटनेनंतर लगेचच तिने नवऱ्याला कामावर जायला सांगितलं. मी घराचं काय ते बघते…. असं ती म्हणाली. प्रियांका व तिचे इतर शेजारी रोज 10 ते 12 किमीचं अंतर पार करतात आणि झोपड्याची हळूहळू स्वच्छता करतात. नवरा कामाला जातो.

त्यांना आपल्या दुःखाचं भांडवल करता येत नाही!

प्रियांकाचं दुःख सुशिक्षित समाजाला शुल्लक वाटतं. कारण लोकांच्या मते झोपडीत काय असणार वाहून जायला….पण तीळ तीळ करुन जमवलेला संसार असा अचानक वाहून गेला तर काळीज तुटणारच ना. पण या समाजाला त्याच काहीच नाही. म्हणूनच तर प्रियांकाचं आणि तिच्या समाजातल्या अनेकांचे अश्रू पुसायला कोणी सीएम् आले नाही ना कोणी केंद्रीय मंत्री… कोणी पालकमंत्री नाही ना कोणी आमदार खासदार आले….कारण या लोकांना आपल्या दुःखाचं भांडवल करता येत नाही, एवढीच त्यांची चूक…!

(Maharashtra flood Sindhudurg Priyanka Everything was carried away)

संबंधित बातम्या :

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Raigad Satara landslide live : महाड, पोलादपूर आणि साताऱ्यात दरडी कोसळल्या, आतापर्यंत 71 मृत्यू

Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें