मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार, मिश्रा नावाच्या व्यक्तीनं केला मोठा गेम? प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटानं खळबळ
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मनसेनं कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीनंतर आता आपलाच महापौर असावा, यासाठी राज्यातील सर्वच पक्षांकडून संख्याबळाच्या जुळवाजुळवीचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी तर आधी विरोधात लढले पण आता महापौर पदासाठी पाठिंबा दिला अशी देखील काही पक्षांची अवस्था आहे. कल्याण, डोंबिवली महापालिकेत मनसेनं मोठा निर्णय घेतला आहे, मनसेकडून शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्यात आला आहे, यावरून आता पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दरार निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युती केली होती. तर दुसरीकडे ठाकरे बंधूच्या युतीला भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या युतीनं मोठं आव्हान दिलं, मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं.
दरम्यान आज महापालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर झाली आहे, त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे, त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रतिक्रिया देताना आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. मिश्रा नावाचा व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या नंबर 1 आणि नंबर 2 च्या व्यक्तीला भेटला, आमच्या फारूक अहमद यांना याबाबत माहिती कळाली, दोन्ही भावांच्या युतीमध्ये मोठी दरार पडली आहे. शादी एकसे प्यार दुसरेसे, असं त्यांचं सगळं चाललं आहे, असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान तुम्हाला अकोल्यात भाजपची ऑफर आहे का? असा प्रश्नही यावेळी प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता, यावर एका वाक्यात उत्तर देऊन त्यांनी विषय संपवला आहे. आरएसएस रजिस्टर करा, मग सर्व प्रश्न मिटतात, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली, त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सगळे भेटायला आले, त्यांना मी म्हटलं तुम्ही आधी तुमच्यात चर्चा करा, तुमचं जुळतं का ते आधी बघा, सुरुवातील एकमेकांना विश्वासात घ्या, भाजप विरोधात आपल्याला जायचं असेल तर एकमेकांना विश्वासात घ्या, मात्र गोड बातमी द्या, सर्वांना उद्या दुपारी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. बैठकीत पद वाटपावरून कुणालाच शब्द दिला नाही, अकोल्यात कुणाचाही महापौर होऊ शकतो, उद्यापर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं यावेळी आंबेडकर यांनी म्हटंलं आहे.
