मोठी बातमी! इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद, मध्येच सगळं बंद पाडलं, पोलिसांनी येऊन थेट…काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून इंदुरीकर महाराज हे चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या कीर्तनावरून वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी थेट कीर्तन रोखले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Indurikar Maharaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यातील तामजाम आणि त्या कार्यक्रमासाठी लागलेला खर्च यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडीओही तेव्हा चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. इंदुरीकर महाराज यांनी मात्र मी लग्न यापेक्षा मोठे करणार आहे, असे सांगून टीकाकारांना उत्तर दिले होते. मुलीच्या साखरपुड्यावरून होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी कीर्तन करणे सोडून देणार असल्याचे सांगून भावना व्यक्त केली होती. दरम्यान, हा वाद मागे पडत असतानाच आता इंदुरीकर महाराज यांच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा होत आहे. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन चालू असतानाच तिथे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने एन्ट्री केली. त्यामुळे कीर्तन काही काळासाठी थांबवावे लागले. त्यानंतर तिथे काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार 12 डिसेंबर रोजी पुण्यातील काळेपडळ परिसरात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. हे कीर्तन ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणे शेकडो लोकांनी गर्दी केली होती. मात्र इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनादरम्यान त्या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडला. लोक रस्त्यावर उभे राहून इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकू लागले. दुसरीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हीच बाब लक्षात घेऊन एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने मंचावर जाऊन माईक घेऊन लोकांना आवाहन केले. यावेळी काही काळासाठी इंदुरीकर महाराजांना कीर्तन थांबवावे लागले.
विना परवानगी कार्यक्रम घ्यायचा नाही
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रस्ता बंद करायला तुम्हाला परवानगी कोणी दिली? असा सवाल पोलीस अधिकारी करताना दिसत आहे. सोबतच कीर्तन आता बंद करा. असे फर्मानही या पोलीस अधिकाऱ्याने सोडल्याचे पाहायला मिळत आहे. हडपसरपर्यंत रस्ता जाम झालेला आहे. त्यामुळे रस्ता मोकळा करायला सांगा, अशी विनंतीही पोलीस अधिकारी इंदुरीकर महाराजांना करताना दिसतोय. विना परवानगी कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही, असेही हा पोलीस अधिकारी बजावताना दिसतोय. दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्याने शेवटी हातात माईक घेऊन लोकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केलेले दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. पोलिसांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा करण्यात आला आणि त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पूर्ण झाला.
