कल्याण-कर्जत महामार्ग पाण्याखाली जाणार? वांगणीतील प्रसिद्ध बिल्डरचा कारनामा व्हायरल

| Updated on: May 13, 2026 | 9:09 PM

वांगणीत बिल्डरने नैसर्गिक ओढ्यावर अवैध काँक्रीट भिंत बांधून प्रवाह बदलला असून, यामुळे महामार्ग आणि शेतीला असलेला धोका व शेतकऱ्यांची होणारी दमदाटी यावर सविस्तर वृत्त.

ठाणे जिल्ह्यातील वांगणी परिसरात एका खासगी बिल्डरने निसर्गाचा समतोल धाब्यावर बसवून स्वतःच्या फायद्यासाठी नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह बदलल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या विकासकाने ओढ्याच्या पात्रातच १०० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारल्याने भविष्यात हा संपूर्ण परिसर जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या मनमानी कारभाराला विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना बिल्डरकडून दमदाटी केली जात असल्याचे समोर आले आहे.

नेमकी परिस्थिती काय?

वांगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण-कर्जत राज्य महामार्गाला लागूनच एका मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रकल्प राबवताना विकासकाने ओढ्याच्या नैसर्गिक वहिवाटीत अडथळा निर्माण केला आहे. ओढ्याचे पात्र अरुंद करून तिथे काँक्रीटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येणारे पाणी वाहून जाण्यास जागाच उरलेली नाही.

महामार्ग आणि शेतीवर टांगती तलवार

कल्याण-कर्जत हा अत्यंत वर्दळीचा राज्य महामार्ग आहे. ओढा अरुंद झाल्याने पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येईल आणि महामार्ग पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच या ओढ्यालगत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींत हे पाणी शिरणार आहे. यामुळे वर्षभराची मेहनत आणि पिकांचे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओढ्याच्या पुढच्या भागात एका बंधाऱ्यासारखी भिंत बांधून पाण्याचा मार्गच वळवण्यात आला आहे, जे पूर्णपणे निसर्ग नियमांच्या विरोधात आहे.

प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेकडे लक्ष

काही दिवसांपूर्वीच तहसीलदार अमित पुरी यांनी वांगणीतील अनधिकृत चाळ माफिया आणि बांधकामांवर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, एका बड्या विकासकाने थेट नैसर्गिक स्त्रोतावरच अतिक्रमण केल्याने महसूल विभाग आता कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “बिल्डरने ही भिंत त्वरित हटवून ओढा पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थ एकनाथ भोईर यांनी दिला आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षांत वांगणी आणि परिसरात अनधिकृत बांधकामांनी डोके वर काढले असतानाच, आता थेट नैसर्गिक स्त्रोतावर घाला घातला गेल्याने संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ओढ्याला येणारा पूर आणि पाण्याचा बदललेला मार्ग यामुळे भविष्यात होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे सामान्य नागरिकांच्या छोट्या बांधकामांवर हातोडा चालवणारे प्रशासन, या बड्या विकासकाच्या दादागिरीसमोर झुकणार की जनहितासाठी ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Published on: May 13, 2026 09:12 AM
Follow Us