लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?, ‘या’ दिवशी मिळणार ओवाळणी, अजितदादांची मोठी घोषणा काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील महिला अर्ज करत आहेत. या योजनेची राज्यात प्रचंड चर्चा आहे. विशेष म्हणजे या योजनेचे पैसे आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो महिलांना दर महिन्याला आता 1500 रुपये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. यानंतर राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालये इथे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरताना कागदपत्रांमध्येदेखील शिथिलता दिली आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत जन सन्मान रॅलीच्या जाहीर सभेत राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? याबाबत मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता लवकरच राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी आहे. या योजनेच्या नावाशी मिळत्याजुळत्या अशा वेळेतच महिलांना आता या योजनेचा पहिला लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच रक्षाबंधन सणाच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून या योजनेच्या माध्यमातील पहिला आणि दुसऱ्या महिन्याचे मिळून पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या माहितीनुसार, राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. याच दिवशी राज्यभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“महिलांकरीता ‘लाडकी बहिण योजना’ आणली. त्यावेळी माझ्यावर टीका झाली. मात्र मी त्यांना फार महत्त्व दिले नाही. माझ्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या सर्व लोकांचे सहकार्य आहे याची खात्री होती. त्यामुळे ही योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकतो हा विश्वास मला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत. तीन सिलेंडर मोफत देणार आहे. माझी महिला सक्षम व्हावी, आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीने आणली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे. निवडून नाही दिले तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले. तसेच “आता हौसे – नौसे – गौसे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका”, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
अजित पवारांचा शेतकऱ्यांना शब्द
माझ्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहे. शेतकऱ्यांनो आता चांगले धान्य पिकवा. एक रुपयात पीकविमाही देत आहोत. एकरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला दिले आहेत. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा काळजी करू नका, असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. विकास आणि गरीबीचा विचार करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही विचार केला. त्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिले आहे, असंदेखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
