Pune Land Scam : पुण्यातील जमीन घोटाळा; 1 टक्के पार्टनरशीप असलेले दिग्विजय पाटील नेमके कोण? पार्थ पवारांशी काय कनेक्शन?
Who is Digvijay Patil : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्याप्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनीत एक टक्का पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोण आहेत पाटील, कोणत्या जिल्ह्याशी आणि कोणत्या राजकीय कुटुंबाशी आहे त्यांचे कनेक्शन?

Parth Pawar Pune News : कोरेगाव पार्क येथे 1800 कोटी बाजारभावाची शासकीय जमीन 300 कोटींना खरेदी केल्याचे प्रकरण सध्या तापलेले आहे. या व्यवहारापोटी अवघे 500 रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. विरोधकांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर फडणवीस सरकारवर जळजळीत टीका केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले पार्थ पवार आणि त्यांचे सहकारी दिग्विजय पाटील हे नेमके कोण?
तिघांवर गुन्हा दाखल
या जमीन व्यवहार प्रकरणात 5 कोटी 89 लाख 31 हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, शीतल तेजवाणी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे. पवारांच्या कंपनीत दिग्विजय यांचा एक टक्के वाटा आहे. तर पार्थ पवारांकडे 99 टक्के हिस्सा आहे. पण पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न झाल्याने त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दिग्विजय पाटीलांचे धाराशिव कनेक्शन
दिग्विजय पाटील यांचे वडील अमरसिंह पाटील यांचे तेर गावातील मित्र महादेव खटावकर यांनी या कुटुंबाविषयी माहिती दिली. त्यानुसार, दिग्विजय पाटील हे माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांचे सावत्र बंधू अमरसिंह पाटील यांचा मुलगा आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे.
तेर गावामध्ये दिग्विजय पाटील यांची जवळपास 100 एकर जमीन आहे आणि घर सुद्धा आहे. गेली 25 वर्षापासून अमरसिंह पाटील यांचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहे. दिग्विजय पाटील यांचे वडील अमरसिंह पाटील यांचे मित्र महादेव खटावकर यांनी सांगितले की ते पूर्वी दिवाळी वा इतर सणाला 4-5 दिवस येऊन गावात, तेरमध्ये राहत होते. अमरसिंह पाटील हे तेरचे सरपंच राहिलेले आहे. त्यांनी जिल्हा परिषद सुद्धा लढवल्याची माहिती खटावकर यांनी दिली.
दिग्विजयचे शिक्षण किती?
अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ-बहिण आहेत. मात्र, अमरसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांच्यात कौटुंबिक सौहार्द नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये कोणतेही आर्थिक संबंध किंवा संयुक्त उद्योग नव्हते. अमरसिंह पाटील हे तेर गावात राहून शेतीचा व्यवसाय पाहायचे. ते कधीच सक्रिय राजकारणात सहभागी झाले नाहीत. सुनेत्रा पवार यांचा अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर अमरसिंह पाटील व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली.
पुढे अमरसिंह पाटील हे काही काळ बारामती आणि पुणे परिसरात स्थायिक झाले. 2018 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी व आई पुण्यात स्थायिक झाल्या. दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे — म्हणजेच अजित पवार यांच्या घरी — वाढला. त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील बिबेवाडी येथे झाले, तर पुढील शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बी.ए. पदवीपर्यंत पूर्ण केले.
विरोधकांचा हल्लाबोल
दरम्यान याप्रकरणात उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी नैतिकतेच्या आधारावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणाची अजित पवार यांनाच माहिती नसल्याबाबत सर्वांनीच टीका केली आहे. तर अजितदादांनी आपला या प्रकरणासी दुरान्वये संबंध नसल्याचे सांगत हात वर केले आहेत.
