“विरोधी पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बरेच भविष्यकार तयार झाले”; पोपटपंची म्हणून भाजपने ठाकरे गटाला डिवचले

कुणाल जायकर

कुणाल जायकर | Edited By: महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jan 22, 2023 | 8:17 PM

विरोधी पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बरेच भविष्यकार तयार झाले आहेत. या सरकारबद्दल महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे ते रोज भविष्यवाणी करत आहेत.

विरोधी पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बरेच भविष्यकार तयार झाले; पोपटपंची म्हणून भाजपने ठाकरे गटाला डिवचले

अहमदनगरः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच काँग्रेसच्या सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरुन काँग्रेसकडून तांबे पितापुत्रावर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली. त्यावरूनच राज्यातील राजकारण तापले असून त्यांच्या अपक्ष उमेदवारीबद्दल बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरत यांना टोला लगावला आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला का नाही हे त्यांना माहिती आहे असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

याविषयी बोलताना ते म्हणाले की, सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय आता काँग्रेसने केला आहे की, त्यांच्या मामांनी त्यांच्यावर अन्याय केला हे आता त्यांनी खुलासा करावा असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा उपस्थित राहणे महत्त्वाचे होते मात्र त्यांना उपस्थित न राहण्याची दुर्बुद्धी कुणी दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर शिवसेनेने भाजप बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार निवडून आणल्यानंतर गद्दारी करून महाभकास आघाडी केली होती. त्यामुळे गद्दारी कोणी कोणाबरोबर केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

विरोधी पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बरेच भविष्यकार तयार झाले आहेत. या सरकारबद्दल महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे ते रोज भविष्यवाणी करत आहेत.

पूर्वी रस्त्याच्या कडेला बसून पोपटाला घेऊन बसणारे आणि चिठ्ठीद्वारे भविष्य काढायचे. आता महाविकास आघाडीचे नेते पोपटपंची नेते झालेले आहेत.

त्यांना माझा सल्ला आहे की आता हे बंद करा तुम्हाला कोणीही दाना टाकणार नाही अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते तुम्ही जितक्या वेळा भविष्यवाणी करणार आहात तितका कालावधी सरकारचा वाढणार आहे असा जोरदार टोला त्यांनी मविआमधील नेत्यांना लगावला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI