रायगडमध्ये नाराजी नाट्य; अजितदादांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांची दांडी, पालकमंत्री पदावरून शीतयुद्ध
Ajit Pawar DPDC Raigad : महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले रूसवे-फुगवे संपले नाहीत तर आता प्रकर्षाने समोर आले आहेत. आज रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

पालकमंत्री पदावरून महायुतीत तणाव वाढला आहे. हे रुसवे-फुगवे काढण्यात अजूनही नेतृत्वाला यश आले नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. रायगड येथील डीपीडीसीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी दांडी मारल्याने खदखद पुन्हा दिसून आली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक बोलावली होती. पण राष्ट्रवादी आणि प्रशासकीय अधिकारी वगळता शिंदे गटाने त्याकडे पाठ फिरवली.
रायगडमध्ये शिंदे गटाचा थेट मॅसेज
रायगडचे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू होती. हे पद आदिती तटकरे यांच्याकडे गेल्याने एकच गोंधळ उडाला. शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांनी त्यांची तीव्र नाराजीच नाही तर हरकत नोंदवली. शिंदे गोटातून अजित पवार गट आणि सुनील तटकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले. या वादावर पडदा टाकण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. त्यातूनच त्यांची नाराजी आज पुन्हा स्पष्ट झाली.
DPDC बैठकीला दांडी
रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची डीपीडीसीची बैठक झाली. ही बैठक ऑनलाईन होती. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पण या बैठकीला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा एक आमदार, मंत्री हजर नव्हता. शिंदे गटाने या बैठकीला अनुपस्थित राहत थेट नाराजीचा मॅसेज दिला आहे. जिल्ह्यातील कामे, त्यासाठीचा निधी, खर्च याचे नियोजन या बैठकीत झाले. पण या बैठकीलाच शिंदे गटाने दांडी मारली.
आम्हाला तर कल्पनाच नाही
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना, शिंदे गटाला या बैठकीची कोणती कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया दिली. जिल्हा प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या दाव्याने अजून गोंधळ वाढला आहे. तर याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे थोरवे यांनी सांगितले. तर दुसरीकडे अजितदादा कार्यालयाने हा दावा खोडला आहे. भरतशेठ गोगावले यांना निमंत्रण दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
