महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचा जाहीर लिलाव करा; यापुढे निवडणुका नकोच, शिंदेसेनेच्या नेत्याची अजब मागणी, मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र
Public Auction the posts of Mayor: हिवाळी अधिवेशनाचा बिगूल वाजणार आहे. पण त्यापूर्वीच शिंदे सेनेच्या एका नेत्याने मोठी अजब मागणी सरकारकडे केली आहे. महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचा जाहीर लिलाव करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Eknath Shinde Shivsena Leader: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनचा बिगूल वाजणार आहे. नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या निडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणाने अनेकांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मित्र शत्रू झाले तर शत्रू मित्र झाल्याचे दिसून आले. शिंदे सेना आणि भाजपमधील वाद तर विकोपाला गेल्याचे दिसून आले. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याने अजब मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. यापुढे निवडणुका न घेताच जाहीर लिलाव करून महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचा जाहीर लिलाव करण्याची मागणी या नेत्याने केली आहे.
निवडणुका नको, पदांचा जाहीर लिलाव करा
राज्यात यापुढे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याऐवजी महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पदांचा जाहीर लिलाव काढावा, अशी अजब मागणी सांगलीतील शिवसेना शिंदे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. आष्टा नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक असणारे वीर कुदळे(Veer Kudale) यांनी ही मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या मागणीने चर्चेला उधाण आले आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची ओरड होत असतानाच कुदळे यांच्या उपरोधिक टोल्याची चर्चा होत आहे.
गुंड, गुन्हेगारांना संधी द्या
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याविषयीचे विधेयक सादर करून ते मंजूर करावे. यापदांसाठी वंचित असणाऱ्या गुंड, गुन्हेगारांना संधी द्यावी, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. त्यांनी या मागणीचे निवदेन निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींनाही पाठवले आहे. वीर कुदळे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आष्टा नगरपरिषदेची निवडणूक लढवली आहे. निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून मतदारांना करण्यात आलेल्या पैसे वाटपावरून ही अनोखी मागणी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
