मला भाजप नेत्यांची वाजवायला सगळ्यात जास्त आवडलं असतं पण…, दमानियांचं मोठं वक्तव्य
अंजली दमानिया यांनी मराठी -गुजराती वादावर प्रतिक्रिया देताना चौफेर फटकेबाजी केली आहे. त्यांनी मनसेसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध विषयांवर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मराठी आणि गुजराती असा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण लोक समजूतदार आहेत, ते या षडयंत्राला बळी पडणार नाहीत. भाजप सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, पण शिवसेना आणि मनसे यांची मदार ही फक्त मराठी मतांवर आहे, त्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. गुजराती नाटक होत असेल तर यात आंदोलन करण्याची गरज काय ? असा सवाल यावेळी दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येकाला वाटते की इलेक्शन कमिशन हे भाजपसाठी इन्कलाइन आहे, राहुल गांधी काय पुरावे देणार आहेत? याकडे माझे सुद्धा लक्ष लागलेले आहे. पण पहलगामच्या मुद्द्यावरून राहुल गांधींपेक्षा संसदेमध्ये प्रियंका गांधी यांचे भाषण खूप जास्त चांगलं आणि अतिशय मुद्देसूद होतं, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादागिरी वाढलेली आहे, गुंडगिरी वाढलेली आहे, जे बोलले ते योग्य आहे आणि जर अशी दादागिरी वाढत राहिली तर उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार नाहीत, तेव्हा फडणवीस यांची बाजू घ्यायची म्हणून मी म्हणत नाही पण हे सत्य आहे.मला खंत वाटते की भाजपच्या नेत्यांकडे प्रमुख कॅबिनेट नाहीयेत, त्यांची वाजवायला मला सगळ्यात जास्त आवडलं असतं, पण त्यांच्याकडे जास्त चांगली खाती नाहीयेत, चांगली खाती ही अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहेत, त्यामुळे त्यांची प्रकरणं बाहेर काढत आहे.
सध्या मी बऱ्याच लोकांची माहिती काढत आहे, राज्यात वाईट पद्धतीने सरकार चालत आहे. योगेश कदम यांच्याबाबतही प्रचंड माहिती माझ्याकडे आलेली आहे, आता जर ती सगळी माहिती मी बाहेर काढली तर चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे मी न्यायालयीन लढा देणार आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की बऱ्याच जणांना वाटते की फडणवीस यांच्या बोलण्यावरून मी सगळी माहिती काढत आहे, पण असा कुठलाही विषय नाही, यामध्ये सत्य नाही, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
