KDMC Election : कल्याण–डोंबिवलीत महायुतीतील तणाव उघड, शिंदे गट-अजित पवार गटातील धूसफूस समोर; काय घडलं ?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सचिन पोटे यांनी 'कुटुंब कार्ड' योजना सुरू केली, ज्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विक्रांत शिंदे यांनी तीव्र टीका केली. ही योजना केवळ मतदारांची दिशाभूल करणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जागावाटपावरूनही राष्ट्रवादीची नाराजी असून, यामुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील मतभेद स्पष्ट झाले आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी रज्यातील सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. काही ठिकाणी युती, आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा मनसुबा अनेक पक्षांचा आहे. मात्र याच दरम्यान महायुतीमध्ये अनेक कुरबुरी, धूसफूस असल्याचे दिसत आहे. कल्याण- डोंबिवलीत सत्ताधारी महायुतीतच तणाव असल्याचे उघड झाले असून ‘कुटुंब कार्ड’वरून शिंदे गट व अजित पवार गट आमने–सामने आला आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ‘कुटुंब कार्ड’ या उपक्रमावरून थेट सामना रंगला असून आरोप–प्रत्यारोपांमुळे प्रचाराला चांगलाच ताप आला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन पोटे यांनी ‘कुटुंब कार्ड’ योजना सुरू करत आरोग्य विमा, पाच लाखांची वैद्यकीय मदत व रोजगाराच्या संधींचा दावा केला आहे. मात्र या योजनेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विक्रांत शिंदे यांनी तीव्र टीका केली आहे. “जो जनतेमध्ये पोहोचत नाही तो जनतेचे दुःख–सुख कसे सोडवणार?” असा सवाल विचारत त्यांनी निशाणा साधला. जागावाटपावरूनही राष्ट्रवादीची नाराजी दिसून येत असून या पार्श्वभूमीवर कल्याण–डोंबिवलीतील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
कुटुंब कार्डावरून दोन्ही गटांत धूसफूस
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार विविध योजना व उपक्रम राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पॅनल क्रमांक 12 मधील उमेदवार सचिन पोटे यांनी ‘कुटुंब कार्ड’ ही योजना सुरू केली आहे. या कार्डच्या माध्यमातून आरोग्य विमा, पाच लाखांपर्यंत वैद्यकीय मदत, मोफत शस्त्रक्रिया तसेच शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कर्जत ते कसारा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या शासकीय रुग्णालयांमध्ये या कार्डचा लाभ घेता येईल, असेही पोटे यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर कार्डवरील स्कॅनरद्वारे दहा कंपन्यांशी टाय-अप असून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही योजना उपयुक्त ठरेल आणि कल्याण–डोंबिवलीत पहिल्यांदाच अशी संकल्पना राबवली जात असल्याचे सचिन पोटे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधूंच्या ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि एकनाथ शिंदे यांच्या ‘तुमचं कुटुंब, माझी जबाबदारी’ या भूमिकेतूनच हे कुटुंब कार्ड असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या कुटुंब कार्डवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष आणि पॅनल क्रमांक 12 मधील उमेदवार विक्रांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. “जो उमेदवार निवडणुकीनंतर जनतेमध्ये दिसत नाही, तो जनतेचे दुःख–सुख कसे निवारण करणार? कुटुंब कार्ड हा फक्त एक दिखाऊ प्रकार असून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला. कुटुंबाची खऱ्या अर्थाने काळजी घेतली असती तर अशा कार्डची गरजच पडली नसती, असेही विक्रांत शिंदे म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपावरूनही नाराजी
यासोबतच महायुतीच्या जागावाटपावरूनही विक्रांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीचा धर्म सर्व घटक पक्षांनी पाळायला हवा होता; मात्र जागावाटपात डावलल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यात युती असली तरी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, कल्याण–डोंबिवलीतही 45 हून अधिक जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. पॅनल क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विक्रांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे सचिन पोटे यांच्यात थेट लढत होत असून ‘कुटुंब कार्ड’च्या मुद्द्यावरून ही लढत अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे कल्याण–डोंबिवलीतील निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळल्याचे दिसत आहे.
