Ujjwala Thite: पोलीस संरक्षणात अर्ज दाखल; आता उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, अनगर नगरपंचायत निवडणुकीत खळबळ
Angar Nagar Panchayat: सोलापुरातील अनगर नगरपंचायतीमध्ये काँटे की टक्कर होणार अशी शक्यता मावळली आहे. पोलीस बंदोबस्तात उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज बाद झाला आहे. काय आहे अपडेट?

Angar Nagarpanchayat Election 2025: सोलापुरातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने खळबळ उडाली. थिटेंच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने अर्ज बाद झाल्याचे कारण पुढे येत आहे. उज्ज्वला थिटे यांनी भाजपच्या राजन पाटील यांच्यावर आरोप करत पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याची राज्यात एकच चर्चा झाली होती. तर आता थिंटे यांनी प्रशासनाने दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.
नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज
अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाची स्वाक्षरी नसल्याने आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर हा थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला.
तर मुलाला सोबत घेऊन आपण अर्ज दाखल केला. अर्जावर मुलाची सूचक म्हणून स्वाक्षरी होती. पोलीस संरक्षणात आपण हा अर्ज दाखल केला. हा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार हे आपल्याला माहिती होते. त्याचा आज प्रत्यय आल्याचे थिटे यांनी प्रतिक्रिया दिली.
हा अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला
अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज बाद झालेला नसून तो करण्यात आलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केवळ दहशत नव्हे तर आर्थिक देवाणघेवाण करुन हा अर्ज बाद केला.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांना सस्पेंड करावे अशी मागणी सोलापूर अजितदादा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली. त्याचबरोबर आम्ही आज याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
राजन पाटील यांच्यावर आरोप
अजित पवारांना चॅलेंज देणारे पाटील हे 302 मधील आरोपी आहेत. त्यांनी काल दंड थोपटत चॅलेंज दिले. मात्र त्यांच्यावर पवार कुटुंबाने 40 वर्ष उपकार केले. पवार कुटुंबाच्या छत्र छायेखाली 40 वर्षे तुम्ही राहिलात. मात्र राजन पाटील आणि त्यांचे कुटुंब जामिनावर बाहेर आहे. दुसरीकडे यांनी यंत्रणा मॅनेज केली आहे. कारण 302 च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झाले मात्र त्याविरोधात हायकोर्टात आज दाखल केला आहे मात्र अद्याप ती केस बोर्डावर आली नाही. त्यामुळे हे राजन पाटील हायकोर्ट मॅनेज करतात मग नगरपंचायत निवडणूक मॅनेज करणे अवघड नाही, असा गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केला आहे.
राजन पाटील यांच्या समर्थकांचा जल्लोष
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या काही वर्षांपासून अनगरमध्ये एकहाती कारभार आहे. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचे समजल्यावर रात्री राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
