Maharashtra News LIVE : छत्तीसगडच्या अबूजमाड जंगलात सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
Maharashtra LIVE Updates in Marathi : महाराष्ट्र, राजकारण, देश, विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या, त्यांचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिवसभर वाचायला मिळतील. फॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग...

आगामी महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून नेत्यांच्या शहर दौऱ्यात वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून ते शहरातील विविध मंडळांना आज भेट देणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने बेशिस्त वाहनचालकावर एका वर्षात सुमारे 27.76 लाख ई-चलन जारी करत 470 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. लासलगाव पोलीसांनी मोठी कारवाई करत भरवस फाटा येथे स्विफ्ट डिझायर कार मधून गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी दोन जणांना अटक. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, क्रीडा, राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
‘ओबीसीतून मराठा आरक्षण देणं हा भांडण लावण्याचा प्रकार’- प्रकाश आंबेडकर
ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय जबरदस्तीचा असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. हा भांडणं लावण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. हाकेंच्या ओबीसी मोर्च्यात आंबेडकरांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली.
-
वाशिममध्ये सायकलस्वार 16 वर्षीय मुलीला ट्रॅव्हल्सने उडवलं
वाशिममध्ये सायकलस्वार 16 वर्षीय मुलीला ट्रॅव्हिल्सने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघाताचं दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालं आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
-
-
छत्तीसगडच्या अबूजमाड जंगलात सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
छत्तीसगडच्या अबूजमाड जंगलात सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सीआरपीएल, डीआरजी पोलिसांचं ऑपरेशन सुरु आहे. यात 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. बिजापूर, दंतेवाडा जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात ही चकमक सुरु आहे.
-
जीआरमध्ये दुरुस्ती करा, 1881 आणि 1901 चा उल्लेख करा- जरांगे पाटील
मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नव्या जीआरमध्ये दुरूस्ती करा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. जीआरमध्ये 1881 आणि 1901 चा उल्लेख करा, असं त्यांनी सांगितलं आहे. तर जीआरमध्ये दुरूस्ती करता येईल असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे.
-
ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी राजीनामा दिला
घर खरेदीवर कमी कर भरल्याच्या नैतिक चौकशीनंतर ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी राजीनामा दिला आहे.
-
-
पीटर नवारो यांनी केलेले खोटे आणि दिशाभूल करणारे विधान आम्ही नाकारतो: परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही व्हाईट हाऊसचे अधिकारी पीटर नवारो यांचे खोटे आणि दिशाभूल करणारे विधान पाहिले आहे आणि आम्ही ते स्पष्टपणे नाकारतो.
-
शेतकरी आत्महत्येवर भाषण करत असताना कार्यकर्त्याने वाजवल्या टाळ्या, बच्चू कडू भडकले
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे आज शेतकरी हक्क यात्रेसाठी गोंदियात आले होते. गोंदियाच्या ठाणा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान बच्चू कडू परभणी येथील सचिन जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या अत्यंत संवेदन विषयावर भाष्य करत असताना स्टेजवर बसलेल्या एका कार्यकर्त्याने टाळ्या वाजवल्या. यावर बच्चू कडू चांगलेच भडकले आणि टाळ्या वाजवतो हरामखोर, नालायका थोबाडीत मारू का ? असे विधान केलं.
-
ठाणे महानगरपालिकेवर भगवा डौलाने फडकणार – अशोक वैती
ठाण्यातील काजूवाडी परिसरात काजूवाडीचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश मंडळाने यंदा बद्रिनाथ मंदिराचा देखावा साकारलेला आहे. तसेच गणरायाची मूर्ती कागदी लगाद्यापासून बनवत पर्यावरण पूरक असा संदेश देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात ठाणे महापालिकेवर भगवा डौलदार पद्धतीने शिवसेनेचा फडकणार असं भाकीत अशोक वैती यांनी केलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ठाण्यातील महापौर बसवणार अस साकडं गणरायाकडे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी घातल आहे.
-
सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांचं केलेलं कौतुक बाहेरून आहे की आतमधून हे तपासलं पाहिजे – बच्चू कडू
मराठा आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली कामगिरी केली योग्य पद्धतीने हाताळले असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांचा कौतुक करण्यात आलं होतं. याबाबत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘चांगली कामगिरी केली तर कौतुक व्हायला पाहिजे मात्र हे कौतुक आत मधून होतं की बाहेरून हे देखील तपासलं पाहिजे’.
-
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईची गिरगाव चौपाटी सज्ज
गिरगाव चौपाटीवर विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा गिरगाव चौपाटीवरील गणपती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला आहे.
-
करमाळ्यात डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ आंदोलन
करमाळयात डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानीला प्रार्थना करत फोटोला दुग्धभिषेक अनोखे आंदोलन झाले आहे. डीवायएसपी अंजना कृष्णा यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने गांधीगिरीपध्दतीने अनोखे आंदोलन केले आहे.
-
वर्ध्यात सहा चंदन तस्करांनी अटक
वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव शिवारात जंगलातील चंदन तोडून तस्करी करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. वन परिक्षेत्र समुद्रपुर यांनी ही कारवाई केली आहे. वनविभागाला पोलीस तसेच गावकऱ्यांचे सहकार्य केले आहे.
-
ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन
ठाणे येथील पांचपाखाडीत पुरातन मंदिराचा देखावा साकारला आहे. अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन येथे घडत आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे.
-
मातोश्रीच्या अंगणात उदय सामंत यांच्या पायाखाली लावले फटाके
विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी उदय सामंत यांचा दौरा आयोजित केला होता. या दौर्यात उदय सामंत गणपती मंडळाला भेट देत असताना अचानक डोक्यावरून आणि जमिनीवर खालून फटाके लावण्यात आले. सामंत यांना बाॅडीगार्डने सुरक्षा देत तेथून बाहेर काढले
-
जळगावमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
जळगावातील व्यावसायिकाची ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४५ लाखांमध्ये ऑनलाइन फसवणूक. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.
-
महानगर संघर्ष समितीच्या वतीने अभिनव आंदोलन
गणपती विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तसेच या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करा खड्डे बुजवा यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
-
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात खामगांव पोलिसात तक्रार
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जी आर फाडल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शासन निर्णय फाडण्याने शासनाच्या आदेशाचा अपमान झाला आहे असे म्हणत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
वसई विरार नालासोपारा येथे पाऊस
वसई विरार नालासोपारा येथे आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा पूर्व सकल भागातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. आभाळ काळेकुट्ट झाले असून, दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
-
जीआर निघाल्यावर अभ्यासक निघू लागले – मनोज जरांगे पाटील
“जीआर निघाल्यावर अभ्यासक निघू लागले. आम्ही आरक्षण टप्याटप्यात मिळवलं. सरकारी नोंदीनुसार आरक्षण मिळणार. कोर्टात जावा, काहीही होत नाही. आमचा हक्क आम्ही मिळवला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज
मुंबई पोलिसांना अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेसेज. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर प्राप्त झाला धमकीचा मेसेज. या संदेशात 34 वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, 400 किलो आरडीएक्समुळे 1 कोटी लोक मृत्युमुखी पडतील असे म्हटले आहे.
-
पवार कुटुंब सत्तेच्या बाहेर कधीच राहत नाही – लक्ष्मण हाके
“पवार कुटुंब सत्तेच्या बाहेर कधीच राहत नाही. जाब विचारण्यासाठी आज मी बारामतीत येतोय. ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार. पवार कुटुंब सत्तेच्या बाहेर कधीच राहत नाही. जीआरमध्ये काय आहे हे पवार, सुळे आणि अजितदादा यांना कळू नये” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
-
मराठीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, सर्व शाळांच्या व्यवहारात मराठी अनिवार्य करण्याची मागणी
राज्यात हिंदी सक्तीचच्या विरोधात काही दिवसापूर्वीच ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेत सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते… आता मराठीच्या मुद्द्यावरून काँग्रेस देखील मैदानात उतरली असून सर्व सरकारी ,खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची मागणी ठाणे काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे… त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून आता सरकारला शह देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे…
-
गेल्या काही दिवसापासून रिप रिप पडणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात लावली हजेरी
गेल्या काही दिवसापासून रिप रिप पडणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात हजेरी लावली आहे.. पावसामुळे कामावर जाणाऱ्या ठाणेकरांची तारांबळ उडाली.. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून हवेत गारवा जाणवत आहे… महामार्गाची वाहतूक संत गतीने धावत आहे… Csmt कडे जाणारी मध्य रेल्वे दहा ते बारा मिनिटं उशिराने धावत आहे…
-
मागण्या करणारे आणि मागण्या मान्य करणारे समाधानी – संजय राऊत
मागण्या करणारे आणि मागण्या मान्य करणारे समाधानी… मग आता कशाला चर्चा करुन महाराष्ट्राचं वातावरण बिघडवताय… जरांगे म्हणतात, शिंदे भला माणूस; ते बिचारे आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा – संजय राऊत
सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट… मराठा समाज समाधानी आहे… मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा… ओबीसी समाजाच्याही मागण्या मान्य… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
लालबागाच्या राजाच्या विसर्जनसाठी विशेष व्यवस्था
दरवर्षी विसर्जनसाठी वापरला जाणार तराफा यंदा वापरला जाणार नसून यंदा मोटराइज्ड तराफा वापरला जाणार आहेत. गुजरातमधून हा तराफा यंदा बनवून घेण्यात आला असून तो ३६० अंशात फिरतो तसेच विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहुबाजूला असणाऱ्या स्पिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडतानाही वापरायला मिळणार आहेत.
-
माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरूम उपसा केल्याचे प्रकरण
या प्रकरणी अवैध गौण खनिज उत्खनन करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून झापले होते. त्यानंतर मात्र कुर्डू गावातील संबंधित व्यतिविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत
-
पुर्णा नदीचे पात्र ओसंडून वाहत आहे
विदर्भात होत असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. यामुळे हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली. हातनुर धरणाचे 10 दरवाजे उघडले आहेत.
-
अमरावती जिल्ह्यातील दर्याबाद येथील 30 वर्षीय युवकाने पेढी नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना
युवक सोमेश्वर शेगोकार याने अमरावतीहून गावाकडे जाताना घेतली उडी. दुचाकीवर बहीण व जावई सोबत वाद झाल्याने युवकाने उचलले टोकाचे पाऊल. वलगाव येथील नव्या पुलावरून घेतली नदीत उडी. पुलावर सुरक्षा कठडे व पथदिवे नसल्याने अपघाताचा धोका
-
नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला
नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला, आता गंगापूर धरणातून 2030 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर सह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच असून गंगापूर सह दारणा,वालदेवी,कश्यपी भाम,भावली सह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
-
आगामी निवडणुकीसाठी मालेगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर
आगामी निवडणुकीसाठी मालेगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून 21 प्रभागांतून 84 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नवीन प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार, 2017 प्रमाणेच प्रभाग रचना, फारसा बदल नाही. प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे निवडणुकीचे रणशिंग फुंकले
-
नागपूरमध्ये पैशांच्या वादातून गुन्हेगारांचा राडा
नागपूरमध्ये पैशांच्या वादातून गुन्हेगारांनी राडा घातला असून शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. गुन्हेगारांनी 20 हून अधिक वाहनं फोडली. पोलिसांनी 17 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती, दहशत आहे.
-
देशासाठी फायटर क्लब सुरु करण्यासाठी फोडलं तलाठी कार्यालय, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
देशासाठी फायटर क्लब सुरु करण्यासाठी फोडलं तलाठी कार्यालय..मंत्रालयातील शिपायाचा डोंबिवलीत धक्कादायक कारनामा आहे. 380 रुपये देऊन कुलूप तोडलं आणि नवं कुलूपही लावलं. ऑनलाईन पेमेंटवरून पोलिसांचा सुगावा; विक्रम प्रधानला ठोकल्या बेड्या.
Published On - Sep 05,2025 8:13 AM
