राहुल नार्वेकरांना निलंबित करा, गुन्हा दाखल करा, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाला 'गुलाम' म्हणत निवडणुका रद्द करण्याचे आव्हान दिले आहे.

महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. असे असतानाच मुंबईत आज शिवसेना भवनातून ठाकरे आणि मनसे युतीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत या तिन्ही शक्तींनी आपला जाहीरनामा जनतेसमोर ठेवला. मात्र याच वेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला. राज्यातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. राहुल नार्वेकर हे केवळ नावापुरते अध्यक्ष राहिले आहेत. ते सभागृहात सभापती असतात, पण बाहेर ते सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून वागत आहेत. अध्यक्ष हे निष्पक्षपाती असतात, त्यांनी कोणत्याही पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नये असा अलिखित दंडक आहे. मात्र, नार्वेकरांनी याला छेद दिला असून ते उमेदवारांना संरक्षण काढून घेण्याची दमदाटी करत आहेत. अशा अध्यक्षांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. निवडणूक आयोगाचे हे केवळ नाटक सुरू आहे. त्यांनी निकाल राखून ठेवला असला तरी ते शेवटी सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचाच निकाल देतील. जर हिंमत असेल तर आयोगाने तिथल्या निवडणुका रद्द कराव्यात, अन्यथा तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हे सिद्ध होईल. जेन-झी (Gen Z) मतदारांचा हक्क हिरावून घेतला जात असून, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून निवडणुका बिनविरोध करण्याचा घाट घातला जात आहे, असाही घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक अधिकाऱ्यांचे (RO) फोन रेकॉर्ड्स का जाहीर केले जात नाहीत? सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे तेही डिलीट केले आहेत का? कोर्टात जाऊन तरी आता काय होणार, विश्वास ठेवायचा तरी कोणावर? अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने आधीच राजकीय वातावरण तापले आहे. आज प्रसिद्ध झालेल्या संयुक्त वचननाम्यात मुंबईकरांना मूलभूत सोयी-सुविधा, पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. २९ महापालिकांच्या रणधुमाळीत ही युती सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोललं जात आहे.
