लढणार, पाडणार, जिरवणार, जरांगे पाटलांची त्रिसुत्री ठरली; पण टार्गेटवर कोण?
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे, तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याला निवडून आणा असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की, चार दिवसांत आम्ही सगळे उमेदवार डिक्लेअर करू कोणत्या मतदारसंघात लढायचं? एससी, एसटीला कुठे पाठिंबा द्यायचा? हे आम्ही ठरवणार आहोत. जिथे आम्ही निवडणूक लढणार नाहीत तिथे कोणाला पाठिंबा द्यायचा हे आम्ही आगोदर बॉण्ड घेऊन ठरवणार आहोत.
आमचं ठरलं आहे, यावेळी आम्ही लढणार आहोत, पाडणार आहोत आणि जिरवणार पण आहोत. राज्यातल्या कोणीच आम्हाला चर्चा केल्याशिवाय बॉण्ड द्यायचा नाही. एससी, एसटी कोणत्याही पक्षाचा असो ज्यांना आमची मागणी मान्य आहे त्यांनी बॉण्ड द्यायचा. जर बॉण्ड आला नाही तर आम्ही अपक्ष उमेदवार उभा करू. जर ओबीसी उमेदवाराला आमच्या मागण्या मान्य असतील आणि त्याने बॉण्ड दिला तर आम्ही त्याला देखील पाठिंबा देऊन निवडून आणू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आम्ही काल बोलताना म्हटलो की सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, पण सगळ्यांनी अर्ज भरू नका, दोन तीन उमेदवार निवडा आणि त्यांनी अर्ज भरा. ज्या दिवशी एकाच नाव डिक्लेअर होईल त्यावेळेस बाकीच्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे. जर उमेदवारी मागे घेतली नाही तर तो पैसे घेऊन आमच्याविरोधात उभा राहिला असं आम्ही समजू असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतल्यामुळे निवडणुकीत मोठी चूरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इतर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.