बिहार निवडणुकीमुळे निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत झाला, नेमकं काय म्हणाले मोदी?
बिहार निवडणूक प्रचाराच्या वेळी सातत्यानं विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थिती करण्यात येत होती, त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

बिहार निवडणुकीच्या प्रचारावेळी विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात येत होती, विरोधकांकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले, दरम्यान आज बिहार निवडणुकीचा निकाल लागला आहे, बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, त्यानंतर आता जनतेशी संवाद साधताना या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहार निवडणुकीमुळे जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास आणखी मजबूत झाल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रचंड मतदान होतंय. वंचित आणि शोषितांनी अधिक मतदान करणं हे निवडणूक आयोगाचं मोठं यश आहे, असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी?
गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रचंड मतदान होतंय. वंचित आणि शोषितांनी अधिक मतदान करणं हे निवडणूक आयोगाचं मोठं यश आहे. हे तेच बिहार आहे, पूर्वी माओवादी दहशतवाद मोठा होता. त्या ठिकाणी नक्षलवादी प्रभावित परिसरात ३ वाजता मतदान संपायचं. इतर ठिकाणी व्यवस्थित व्हायचं. पण या निवडणुकीत बिहारमध्ये कोणत्याही भितीशिवाय लोकांनी उत्सवासारखं मतदान केलं. बिहारमध्ये जंगलराज असताना काय काय होत होतं हे तुम्ही पाहिलं आहे. खुलेआम निवडणूक केंद्रावर हिंसाचार व्हायचे. मतपेटी पळवली जायची. आज त्याच बिहारमध्ये विक्रमी मतदान होत आहे. शांततेत मतदान होत आहे. प्रत्येकाने आपल्या पसंतीने मतदान केलं आहे. रिपोलींगचे आकडेही या बदलाची साक्ष देत आहे. पूर्वी बिहारमध्ये अशी एकही निवडणूक नसायची की रिपोलिंग होत नसायची. २००५ पूर्वी शेकडो ठिकाणी रिपोलिंग व्हायची. १९९५ मध्ये दीड हजार ठिकाणी रिपोलिंग झाली. २००० मध्येही तिच परिस्थिती होती. पण जंगलराज गेल्यानंतर परिस्थिती सुधारली.
आता दोन टप्प्यात मतदान झाल्यावरही कुठेही रिपोल करण्याची वेळ आली नाही. यावेळी शांततेत मतदान झालं. त्यासाठी निवडणूक आयोग आणि निवडणुकीशी संबंधित सर्व कर्मचारी, सुरक्षा दल, बिहारचे जागरूक मतदार यांचे मी आभार मानतो. देशाला तुमचा अभिमान आहे. हे मी अभिमानाने सांगतो, बिहारच्या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केलीय, आता देशाचा मतदार खास करून तरुण मतदार मतदान यादीच्या शुद्धीकरणाला अधिक गंभीरपणे घेत आहे. बिहारच्या तरुणांनीही मतदार यादी शुद्धीकरणाला चांगला सपोर्ट केला. असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.
