Delhi Blast : वाहनांची वर्दळ अन् क्षणात विस्फोट! लाल किल्ल्याजवळ असा झाला ब्लास्ट, हादरवणारं नवं CCTV फुटेज समोर
दिल्लीतील भीषण स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भयानक दृश्य त्यात कैद झालं आहे. या स्फोटात अनेक निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत अतिशय प्रसिद्ध अशा लाल किल्ल्याजवळ, वर्दळीच्या रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास कारमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये 10 निरपराध नागरिकांनी जीव गमावला तर 20 जण जखमी झालेत. या ब्लास्टसंदर्बात आत्तापर्यंत अनेक खुलासे झाले असून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे आता या ब्लास्टचं CCTV फुटेजही समोर आलं आहे. संध्याकाळी गर्दीच्या वेळेस रस्त्यावर गाड्यांची रांग संथगतीने पुढे सरकत असताना त्यातीलच एका कारमध्ये अचानक विस्फोट झाला आणि धमाक्याने सगळंच हादरलं. त्यामध्ये त्या कारसह आजूबाजूच्या अनेक गाड्या उद्ध्वस्त झाल्या आणि कित्येक लोक होरपळले. व्हिडिओमध्ये रेड सिग्नलवर वाहनांची गर्दी दिसत असून तेव्हाच अचानक i-20 कारमध्ये स्फोट झाला, स्पष्टपणे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याचंच CCTV फुटेज समोर आलं आहे.
या स्फोटाच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये जैशचा संशयित दहशतवादी उमरच्या गाडीत स्फोट होताना दिसत आहे. लाल किल्ला आणि चांदणी चौक येथेही सीसीटीव्हीची निगराणी सुरू असते. त्यात हा स्फोटाचा क्षण अगदी स्पष्टपणे कैद झालाय. लाल किल्ला चौक सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असून त्यात स्फोटाचा क्षणही टिपला गेला.
स्फोटाचा धमाका आणि पळापळ कैद
संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांच्या सुमारास कारमध्ये हा स्फोट झाला. तेव्हा रस्त्यावर बरीच गर्दी होती, त्या कारच्या आसपास अनेक गाड्या होत्या, ज्या रस्त्यावरून अत्यंत संथपणे पुढे चालल्या होत्या. तोच क्षण सीसीटीव्हीमध्ये दिसतोय. सीसीटीव्हीच्या चारही विंडोमध्ये रस्त्यावरच्या गाड्या, वर्दळ नीट दिसत आहे. गाड्यांचे आवज येत असतानाच अचानक कारमध्ये स्फोट झाला आणि सीसीटीव्ही बंद पडला. तर स्फोटानंतर लोकांमध्ये झालेला गोंधळ, पळापळही दुसऱ्या दृश्यात टिपला गेली आहे.
सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. देशभरातील अनेक एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आतापर्यंत जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली आहे आणि देशाच्या अनेक भागात सतत छापे टाकले जात आहेत. स्फोट झाला त्या ठिकाणाहून फॉरेन्सिक टीमने असंख्य पुरावे गोळा केले आहेत. यामध्ये स्फोट झालेल्या i20 कारचे काही भाग, टायर, चेसिस, सीएनजी सिलेंडर, बोनेटचे भाग आणि इतर भाग समाविष्ट आहेत. या सर्व पुराव्यांची आज तपासणी केली जाईल.