…तोपर्यंत पापाचा घडा भरला होता, लष्कराने सांगितलं पाकिस्तानला पाणी कसं पाजलं? एअरफोर्सचा प्लॅन काय होता?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजून मिटलेला नाही. आज म्हणजेच 12 मे रोजी या दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजून मिटलेला नाही. आज म्हणजेच 12 मे रोजी या दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याआधीही भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबाबत सांगितलं होतं. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराने पाकिस्तानी वायूसेनेला कसं पाणी पाजलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखण्यासाठी भारताने विशेष योजना आखली होती, अशी माहिती भारताचे डीजीएमओ तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली.
…तोपर्यंत दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला होता
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली, असा मोठा दवा केला. “आमची लढाई ही दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात होती. त्यामुळे आम्ही 7 मे रोजी फक्त दहशतवाद्यांवर हल्ला केला. पण दुर्दैव म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांना साथ दिली. गेल्या बऱ्याच वर्षांपासून लष्कर तसेच सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात आले. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांची कारवायांची पद्धत बदलली आहे. आजकाल दहशतवाद्यांकडून सामान्य आणि निरापराध लोकांना लक्ष्य केलं जातंय. 2024 साली जम्मू भागात शिवखोरी मंदिरात दर्शनसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंवर हल्ला करण्यात आला आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पहलगाम येथील पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. पहलगामपर्यंत या पापाचा घडा भरला होता,” असं राजीव घई यांनी सांगितलं.
..म्हणून पाकिस्तानचे हवाई हल्ले अयशस्वी ठरले
तसेच, “पहलगाम हल्ल्यानंतर जे झालं त्याबाबत आम्ही तुम्हाला अगोदरच माहिती दिली आहे. दहशतवाद्यांवर आपण केलेले हल्ले हे आंतररराष्ट्रीय सीमेत न जाता केले होते. पाकिस्तानदेखील सीमेच्या पलिकडून हल्ले करू शकतो, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळेच हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी आम्ही पहिल्यापासूनच तयार होतो. काऊंटर मॅन्ड एरिएल सिस्ट्मस, इलेक्ट्रॉनिक वारफेअरची साधनं, एअर डिफेन्स वेपन्स यांचा आम्ही विशेष ताळमेळ घातला होता. त्यामुळेच पाकिस्तानी वायूदलाने जेव्हा जेव्हा 9 आणि 10 मे च्या रात्री हल्ले केले ते विफल ठरले,” असंही डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं.
भारताने नेमकी काय योजना आखली होती?
पाकिस्तानी हल्ल्यांना अयशस्वी ठरवण्यासाठी भारतीय लष्कराने नेमके काय नियोजन केले होते, याबाबतही राजीव घई यांनी सांगितले आहे. “जेव्हा जेव्हा पाकिस्तानने 9 आणि 10 मे रोजी आपल्या हवाई क्षेत्रात तसेच लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन्समध्ये हल्ले केले ते आपल्या मजबूत एअर डिफेन्स ग्रिडसमोर अपयशी ठरले. या ग्रिडमध्ये एकूण चार स्तर होते. रडार, काऊंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम्स, शोल्डर फायर वेपन्स, व्हिटेंज एअर डिफेन्स वेपन्स त्यानंतर शेवटी लष्कराचे अत्याधुनिक एअर डिफेन्स वेपन सिस्टिमस तत्पर होते. त्यामुळेच आमची मल्टि टियर डिफेन्स पार करून पाकिस्तान भारताचे हवाई क्षेत्र तसेच लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन्स टार्गेट करू शकण्याची शक्यता धुसर होती, असं राजीव घई यांनी सांगितलं.
