‘आम्ही पुन्हा येऊ’, ISRO चा दुर्दम्य आत्मविश्वास, 101 वे मिशन फसले, रॉकेट तिसर्या टप्प्यावरच अडकले
ISRO Mission : पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी इस्त्रोचे महत्त्वाचे मिशन फसले. 101 व्या मिशनमध्ये इस्त्रोला अपयश आले. असे असले तरी इस्त्रोने आम्ही पुन्हा येऊ असा दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केला आहे. काय आहे हे मिशन, कोणती आली तांत्रिक अडचण?

PSLV-C61 ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थाला (ISRO) एक अपयश आले. पण त्यामुळे या संस्थेचा आत्मविश्वास तसूभरही कमी झाला नाही. इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी आम्ही पुन्हा परत येऊ असा संदेश दिला आहे. इस्त्रोने पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपग्रह 09 सोडण्यासाठी PSLV-C61 रॉकेट लाँच केले होते. दोन टप्प्यापर्यंत इस्त्रोने यशस्वी मजल मारली. पण तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणीने या मिशनला धक्का बसला. तांत्रिक अडचणीमुळे मिशन फेल झाले.
101 वे मिशन अर्धवट
पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी इस्त्रोने एक उपग्रह पाठवला होता. हा उपग्रह घेऊन जात असलेले रॉकेट दुसऱ्या टप्प्यापर्यंत सामान्यपणे कार्यरत होते. तिसऱ्या टप्प्यात नेमकी तांत्रिक अडचण आली. निर्धारीत कक्षेपर्यंत उपग्रह पोहचवण्यात रॉकेटला जमले नाही. या मोहिमेला अपयश आल्याने 101 वे मिशन अर्धवट राहिले. तांत्रिक अडचण कशामुळे आली, त्यामागील कारण काय, याविषयीचे विश्लेषण करण्यात येणार असल्याचे इस्त्रो प्रमुख नारायणन यांनी सांगितले.
ही मोहिम कशासाठी?
विविध क्षेत्रातील युझर्सला अचूक आणि नियमित डेटा मिळावा यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी हा उपग्रह पाठवण्यात आला होता. पृ्थ्वीच्या सूर्य समकालिक कक्षेत तो स्थापित करण्यात येणार होता. रॉकेट दुसऱ्या टप्प्यापर्यंत सामान्यपणे कार्यरत होते. तिसऱ्या टप्प्यात त्याला अपयश आले. हा उपग्रह दहशतवादी कारवाया, घुसखोरी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करणार होता.
EOS-09 चे वजन 1700 किलो
EOS-09 हा 1,696.24 किलोग्रॅम वजनाचा होता. जर हे मिशन यशस्वी झाले असते तर तो अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट ग्रूपमध्ये सहभागी झाला असता. हे मिशन यशस्वी झाले असते तर हा उपग्रह पुढे पाच वर्षांसाठी कार्यरत राहिला असता. PSLV त्याच्या 63 व्या मिशन अंतर्गत अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट-ईओएस घेऊन गेला होता. ईव्हीएस-09 हा कुठल्याही हवामानात पृथ्वीवरील हायक्वालिटी फोटो घेण्यात सक्षम आहे. या उपग्रहाद्वारे सलग 24 तास फोटो काढण्याच्या सुविधेमुळे, कृषी, शहराचे नियोजन आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याचा उपयोग झाला असता.
