असदुद्दीन ओवैसींनी काढली पाकची इज्जत, दिलं ‘हे’ ओपन चॅलेंज; खास ट्विटची चर्चा!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हापासून संघर्षाला तोंड फुटलंय तेव्हापासून असद्दुदीन ओवैसी हेदेखील रोखठोक भूमिका घेताना दिसत आहेत.

Asaduddin Owaisi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हापासून संघर्षाला तोंड फुटलंय तेव्हापासून असद्दुदीन ओवैसी हेदेखील रोखठोक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी वेळोवेळी पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आहे. पहलगामवर दहशसतवादी हल्ला झाल्यानंतर ओवैसी यांनी त्या घटनेचा जाहीर निषेधही केला होता. दरम्यान, आता ओवैसी यांनी पाकिस्तानाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यांनी पाकिस्तानची थेट इज्जतच काढली आहे.
पाकच्या पंतप्रधानांना केला खोचक सवाल
असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये चीनचाही उल्लेख केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचेही त्यांनी थेट नाव घेतले आहे. “शाहबाज सरीफ आणि असीम मुनीर चीनकडून भाड्याने घेतलेले लढाऊ विमान रहीम यार खान हवाई तळावर उतरवू शकतात का?” असा खोचक सवाल ओवैसी यांनी केला आहे.
चीनचं नाव का घेतलं?
भारताने 10 मे रोजी पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली होती. भारताने आपल्या या कारवाईत पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. यात पंजाब प्रांतातील रहीम यार खान या हवाई तळाचाही समावेश होता. पाकिस्तानने भारतावर हल्ले केले होते. या हल्ल्यांत पाकने चीनने पुरवलेल्या शस्त्रांचा वापर केला होता. मात्र भारतीय लष्कराने आपलं शौर्य दाखवत चीनच्या शस्त्रांना तसेच पाकिस्तानी लष्कराला धूळ चारली होती. याच बाबीकडे लक्ष वेधत ओवैसी यांनी चीनचा उल्लेख करत पाकिस्तानला डिवचलं आहे. भारताने उद्ध्वस्त केलेल्या रहीम यार खान या हवाई तळावर पाकिस्तान भाड्याने घेतलेली चीनी विमानं उतरवू शकेल का? असं खोचक प्रश्न ओवैसी यांनी केलाय.
मुस्लीम बांधवांना केले होते आवाहन
दरम्यान, याआधीही ओवैसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान, पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली होती. भारताने पाकिस्तानला जशास तशा भाषेत चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असंही ओवैसी यांनी म्हटलं होतं. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी या घटनेचा निषेध केला होता. त्यांनी समस्त मुस्लीम बांधवांना नमाज पठणाला जाताना दंडावर काळी फीत बांधून जावे आणि या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला देशभरातील मुस्लीम बांधवांनी प्रतिसाद दिला होता.
