Operation Sindoor : किती राफेल पाडली विचारणाऱ्यांना एक सोपा प्रश्न, फक्त त्याचं उत्तर द्या
Operation Sindoor : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सिंगापूर येथे दिलेल्या एका मुलाखतीवरुन देशात वादळ निर्माण झालं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानच्या हल्ल्यात आपलं सुद्धा काही प्रमाणात हवाई नुकसान झालं. आता काँग्रेसचे नेते किती राफेल विमान पाडली? मोदी सरकार देशाची दिशाभूल करत आहे, असे आरोप करत आहे. राजकीय स्वार्थ आणि श्रेयाच्या या लढाईत असे प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांना एक सोपा प्रश्न आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये शांगरी-ला डायलॉग सिक्युरिटी फोरमच्या पार्श्वभूमीवर रॉयटर्स आणि ब्लूमबर्गला एक मुलाखत दिली. त्यावरुन भारतीय राजकारणात मोठं वादळ उठलय. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत-पाकिस्तान संघर्ष तीव्र झालेला असताना भारतीय सैन्य दलांकडून नियमित पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जात होती. याचा माहितीमधला एक भाग CDS अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये थोडा अधिक स्पष्टपणे सांगितला. त्यावरुन लगेच भारतातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लगेच शनिवारी एक्सवर एक पोस्ट केली. “सीडीएसनी मुलाखतीत सिंगापूरमध्ये एक वक्तव्य केलय. त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न विचारणं गरजेच आहे. संसदेच विशेष अधिवेशन तातडीने बोलावलं, तर तिथे हे प्रश्न विचारता येऊ शकतात. मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली आहे. युद्धाचं धुकं आता क्लियर होतय” असं मल्लिकार्जुन खरगे यांनी पोस्टमध्ये म्हटलय. कारगिल समीक्षा समितीच्या धर्तीवर स्वतंत्र एक्सपर्ट समितीकडून संरक्षण तयारीची समीक्षा करण्याची त्यांनी मागणी केली.
जनरल चौहान यांनी सिंगापूर येथे दिलेल्या मुलाखतीत सुरुवातीला हवाई लढाईत नुकसान झाल्याच म्हटलं. किती विमानांच नुकसान झालं, तो आकडा त्यांनी सांगितला नाही. या लढाईत आपली विमान पाडल्याची ती पहिली अधिकृत कबुली होती. पाकिस्तानकडून सहा विमानं पाडल्याचा दावा होतो, तो बरोबर आहे का? असा प्रश्न ब्लूमबर्गने विचारला. त्यावर सीडीएस अनिल चौहान यांनी, ‘हे पूर्णपणे चुकीच’ असल्याच उत्तर दिलं. भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी सीडीएसने हे वक्तव्य केलं. युद्धा दरम्यान किंवा त्यानंतही इंडियन एअर फोर्सने हवाई नुकसान झाल्याची बाब नाकारली नव्हती.
11 मे रोजी एअर मार्शल ए के भारती काय म्हणालेले?
शस्त्रसंधी झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी 11 मे रोजी एअर मार्शल ए के भारती यांना पत्रकार परिषदेत यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. ते एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर आहेत. त्यावेळी भारती यांनी युद्धस्थिती असल्याने भारताने विमान गमावलं का? यावर बोलण्यास नकार दिला होता. “नुकसान हा कुठल्याही युद्धाचा भाग असतो. भारतीय सैन्यदलांनी निश्चित केलेली उद्दिष्टय गाठली आहेत. IAF चे सर्व पायलट्स बेसवर परतले आहेत” असं उत्तर भारती यांनी दिलं होतं. आता सीडीएस चौहान यांनी यावर अधिक प्रकाश टाकत सुरुवातीला हवाई नुकसान झाल्याच मान्य केलं. इतकाच फरक आहे.
पाकिस्तानात खोलवर अचूक हल्ले
इंडियन एअर फोर्सने प्रत्युत्तर म्हणून 10 मे च्या रात्री पाकिस्तानात खोलवर अचूक हल्ले केले. त्यामध्ये पाकिस्तानच्या हवाई संपत्तीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांचे एअरबेस उद्धवस्त झाले. महत्त्वाच म्हणजे इंडियन एअर फोर्सने या सगळ्याचे पुरावे देखील दाखवले. “भारताच्या कारवाईत पाकिस्तान एअर फोर्सची काही विमानं नष्ट झाली” असं एअर मार्शल भारती यांनी सांगितलं.
नुकसान का झालं? हे जास्त महत्त्वाचं
“नुकसान का झालं? आणि त्यानंतर भारताने काय केलं, हे जास्त महत्त्वाच आहे” असं सीडीएस अनिल चौहान म्हणाले. “आम्ही रणनिती दुरुस्त केली आणि पुन्हा मोठ्या संख्येने गेलो. पाकिस्तानात खोलवर घुसून अचूकतेने प्रहार केला. त्यांची हवाई सुरक्षा भेदली” असं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान म्हणाले. “10 मे रोजी इंडियन एअर फोर्सने सर्वप्रकारची विमानं उडवली. त्यात सर्व प्रकारचा दारुगोळा होता” असं अनिल चौहान रॉयटर्सशी बोलताना म्हणाले. रावळपिंडीमधला नूर खान एअर बेस तर भारताने पूर्णपणे उद्धवस्त करुन टाकला.
तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राफेलवरुन काय प्रश्न विचारला?
CDS अनिल चौहान यांची मुलाखत होण्याआधी, भारतात विरोधी पक्ष खासकरुन काँग्रेस राफेलच्या नुकसानीवरुन प्रश्न विचारत होते. तेलंगणचे मुख्यमंत्री काँग्रेस नेते रेवंत रेड्डी म्हणाले की, “पीएम मोदी यांनी 140 कोटी भारतीयांना सांगावं की, ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानी सैन्याने किती राफेल विमानं पाडली?” पंतप्रधान मोदी बलूचिस्तानाला पाकिस्तानपासून वेगळं करण्यात आणि पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले असा आरोपही रेवंत रेड्डी यांनी केला होता.
पाकिस्तानी एअरफोर्स अजून पाच वर्ष मागे गेली
CDS अनिल चौहान यांनी हवाई नुकसानीची कबुली देताच लगेच विरोधी पक्षांनी खासकरुन काँग्रेसने सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केलेत. पण आपल्या राजकारणापायी आपण देशाला अडचणीत आणतोय, पाकिस्तानला एक आयता मुद्दा देतोय, हे सुद्धा या राजकारण्यांना कळत नाहीय. खरंतर ऑपरेशन सिंदूर हा भारताचा एक मोठा रणनितीक आणि कूटनितीक विजय आहे. या लढाईत पाकिस्तानच कधी नव्हे, इतकं नुकसान झालय. पाकिस्तानी एअरफोर्स अजून पाच वर्ष मागे गेली आहे. खरतर हे मुद्दे या देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी जगासमोर मांडले पाहिजेत. पण देशहितापेक्षा राजकीय स्वार्थ, श्रेयाची लढाई मोठी आहे, हेच यातून दिसून येतय.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुद्धा याला कसं अपवाद ठरु शकतं?
लष्करी संघर्ष, युद्ध म्हटलं की, जिवीतहानी, वित्तहानी आलीच. या दोन्ही गोष्टी कोणालाच टाळता येत नाहीत. म्हणून युद्ध रोखण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. युद्धात भले, तुम्ही शत्रूच सर्वाधिक नुकसान करा, पण तुमच्या बाजूला सुद्धा काही प्रमाणात हानी होतेच. रशिया-युक्रेन युद्ध याचं उत्तम उदहारण आहे. बलाढ्य रशियाने युक्रेनवर अनेकदार जोरदार यशस्वी हल्ले चढवले. त्यांचा भूभाग पादाक्रांत केला. पण रविवारी युक्रेनने सुद्धा एक जोरदार पलटवार केला. त्यात एकाचवेळी रशियाच्या 40 फायटर जेट्सच मोठ नुकसान झालं. त्यामुळे तुम्ही कितीही बलाढ्य असलात, तरी नुकसान टाळता येत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुद्धा याला कसं अपवाद ठरु शकतं. उलट पाकिस्तान विरुद्धच्या चार दिवसाच्या लष्करी संघर्षात आपण आपल्या बाजूला जास्त जिवीतहानी होऊ दिली नाही, हे जास्त महत्त्वाच आहे. पाकिस्तानचे 100 दहशतवादी मारले, त्यांचे 35 ते 40 सैनिक ठार झाले. आपल्या दृष्टीने या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. पण राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर असला की या गोष्टी दिसत नाहीत.
In the wake of the remarks made by the Chief of Defence Staff (CDS) in Singapore in an interview, there are some very important questions which need to be asked.
These can only be asked if a Special Session of the Parliament is immediately convened.
The Modi Govt has misled the…
— Mallikarjun Kharge (@kharge) May 31, 2025
सरकारपेक्षा पण हा एअरफोर्सचा अधिकार
पाकिस्तानने किती विमानं पाडली ही माहिती विरोधी पक्षांना हवी आहे. मूळात ही माहिती द्यायची की नाही हा अधिकार सरकारपेक्षा पण एअरफोर्सचा आहे. कारण हा सगळा युद्धाच्या रणनितीचा भाग आहे. पाकिस्तानने त्या रात्री कुठल्या बाजूने कसा हल्ला केला? त्याला एअरफोर्सने कसं उत्तर दिलं? त्यासाठी कुठली विमानं वापरली? मूळात पाकिस्तानकडे जी F-16 विमानं आहेत, त्यामध्ये BVR म्हणजे नजरेपलीकडची लक्ष्यक्षेद करणारी क्षेपणास्त्र आहेत. भारताकडे सुद्धा राफेल, सुखोई MKI-30 मध्ये अशी क्षेपणास्त्र आहेत. दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांमध्ये 100 ते 200 किलोमीटर अंतरावरुन हल्ला करण्याची क्षमता आहे. म्हणजे दोन्ही देशांच्या फायटर जेट्समध्ये समोरासमोरच्या डॉगफाईटचा प्रश्नच येत नाही. अशा लढाईच्यावेळी कुठल्या रणनितीचा वापर केला गेला? त्यात काय बदल केला? हा सगळा गोपनीयतेचा भाग येतो.
मग, अशी माहिती उघड करायची का?
मग, अशी माहिती उघड करायची का? याचा विचार ही नेतेमंडळी करणार आहेत का? फक्त भारताच्या फायटर जेट्सच नुकसान झालं का? पाकिस्तानची F-16, जे-10 विमानं पाडली नाहीत का? त्यांची सुद्धा विमानं पाडली. पण पाकिस्तानी सैन्यामध्ये खरं बोलण्याची हिम्मत नाही. उलट हरलेल्या लढाईच ते विजयी सेलिब्रेशन करत आहेत. त्यांच्या जनतेला खोटी माहिती देत आहेत. उलट आपल्या सैन्यदलांनी पुराव्यानिशी या सर्व गोष्टी मांडल्या. पाकिस्तानी एअरबेसेसच काय अवस्था झाली, त्याचे फोटो आपण पाहिले, तरी आपल्या नेत्यांना विश्वास नाही बसत? भारतात लोकशाही आहे, म्हणून आपल्या सैन्याने जे खरं आहे ते सांगितलं. कारगिलच्या लढाईत ज्या देशाने आपल्या सैनिकांचे मृतदेह परत घेतले नाहीत, त्या पाकिस्तानी सैन्याची मानसिकता किती थर्ड क्लास आहे ते दिसलं. उलट आपल्या सैन्यदलांनी जी खरी माहिती आहे, ती वस्तुस्थिती सांगितली. आता कुठल्या माहितीचा अट्टहास आपण धरायचा हे नेतेमंडळींना समजलं पाहिजे. कारण राजकारणाच्या नादात आपण आपल्या शत्रूला लाभ पोहोचवतोय याचं भान बाळगलं पाहिजे.
