Ayodhya verdict | अयोध्या निकाल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

सर्वोच्च न्यायालय बहुप्रतिक्षित अयोद्ध्या प्रकरणावर (Supreme Court Verdict on Ayodhya Case) शनिवारी (9 नोव्हेंबर) आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे.

Ayodhya verdict | अयोध्या निकाल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय बहुप्रतिक्षित अयोध्या प्रकरणावर (Supreme Court Verdict on Ayodhya Case) आज शनिवारी (9 नोव्हेंबर) आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे. त्यामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेबद्दल खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मागील काळात या मुद्द्यावर दैनंदिन सुनावणी घेत सर्व पक्षांच्या बाजू ऐकल्या. त्यानंतर हा निर्णय (Supreme Court Verdict on Ayodhya Case) येत आहे.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी आधी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होत होती. मात्र, नंतर या प्रकरणाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आली. या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचं नेतृत्त्व सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे आहे. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. या खंडपीठात आधी न्यायमूर्ती यू. यू. ललित यांचाही समावेश होता. मात्र, ललित यांच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर न्यायमूर्ती ललित यांनी स्वतः या सुनावणीतून माघार घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात 40 दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर 16 ऑक्टोबरला निकाल राखीव ठेवला होता. हा निकाल आज (9 नोव्हेंबर) सुनावण्यात येणार आहे. सातत्याने इतक्या दिवस सुनावणी झालेलं हे  देशातील दुसरं प्रकरण आहे. याआधी केशवनंद भारती प्रकरणात अशाचप्रकारे सलग 68 दिवस सुनावणी घेण्यात आली होती.

अलहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये या जमीन विवाद प्रकरणी आपला निर्णय दिला होता. त्यात अयोध्येतील या 2.77 एकर विवादीत जमिनीचे सुन्नी वफ्फ बोर्ड, निरमोही आखाडा आणि राम लल्ला या तीन याचिकाकर्त्यांमध्ये समान प्रमाणात विभाजन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर या निकालाला आव्हान देणाऱ्या 14 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी पूर्ण करत सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देणार आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणाची सुनावणी करताना याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अनेक ऐतिहासिक दस्तावेज, गॅझेट, ब्रिटीश काळातील जमिनीचे कागदपत्र आणि प्रवासवर्णन अशा गोष्टी सादर करत आपआपले दावे केले. यात भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालांचाही संदर्भ घेण्यात आला.

काय आहे अयोध्या जमीन वाद?

अयोध्या प्रकरण हे मुख्यतः जमीन वाद आहे. बाबरी मशीद- राम जन्मभूमीचा वाद हा अनेक वर्ष जुना आहे. शिवाय हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच तणावाचा मुद्दा राहिलेला आहे. अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बनवण्याची मागणी आहे. या जागेवर रामाचं मंदिर तोडून बाबरी मशिद बांधण्यात आली असा हिंदूंचा दावा आहे.

हिंदूंच्या मते, 1530 मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकीने मंदिराच्या जागी मशिद बांधली. त्यामुळेच 90 च्या दशकात राम जन्मभूमी प्रकरणाने देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली होती.

संबंधित बातम्या

अयोध्या प्रकरण: 16 मिनिटे सुप्रीम कोर्टात खडाजंगी  

अयोध्या प्रकरण : पहिल्याच सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची माघार

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, देशाचं लक्ष  

शिवसेना, बाबरी आणि 1992 चा रक्तरंजित इतिहास  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *