Mamta Banerjee : पक्ष आणि पक्ष चिन्ह हिरावलं जाणार, ममता बॅनर्जींचा उद्धव ठाकरे होणार ? पश्चिम बंगालमध्ये मोठ्या भूकंपाचे संकेत
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींना वगळून नवीन टीएमसी स्थापन करण्याच्या चर्चांना जोर आला आहे. दोन आमदारांना पक्षातून काढल्याने ही चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणेच टीएमसीमध्ये फूट पाडण्याचा 'महाराष्ट्र मॉडेल' वापरला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यापासून राजकीय वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. सततच्या राजीनाम्यांमुळे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला (TMC) सुद्धा सतत धक्के बसले आहेत. आता, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना वगळून एक नवीन तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांना राज्यातील राजकीय वर्तुळात जोर चढला आहे. सही प्रकरणी पक्षाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल (व्हिसलब्लोअर बनल्याबद्दल) टीएमसीच्या 2 आमदारांना (ऋतब्रता बंदोपाध्याय आणि संदीपान साहा) पक्षातून काढून टाकण्यात आल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं.
पक्षाने दोन आमदारांना पक्षातून काढून टाकल्यानंतर, आता बंगालमध्ये ‘महाराष्ट्र मॉडेल’ची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. 2022 साली महाराष्ट्रात शिवसेनेत जशी फूट पडली होती, तशीच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची योजना आखली जात आहे का? असा सवालही अनेकांच्या मनात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
50 आमदार करणार बंड ?
विधानसभा निवडणुकांपासून बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. आता, दोन आमदारांच्या हकालपट्टीमुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. सुमारे 50 आमदार तृणमूल काँग्रेस सोडून जाऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच काही खासदारही बंड करण्याचा विचार करत असून, त्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू असल्याचा दावाही केला जात आहे.
पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या घरी बोलावण्यात आलेल्या बैठकीला बरेच आमदार अनुपस्थित होते. तर काहींनी प्रमुख नेतृत्वाविरोधात उघडपणे भूमिका मांडली. तसेच पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपावरून काहींना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.
भाजपाकडून घाबरवण्याचा प्रयत्न – ममतांचा आरोप
मात्र पक्षांतर्गत अशांततेसाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच पक्षातील एका गटाला तसेच भाजपला जबाबदार ठरवत आरोप केले आहेत. धमक्या आणि लाचखोरीच्या माध्यमातून भाजप हा, तृणमूलच्या आमदारांना आणि खासदारांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ममता यांनी केला. भाजप पोलिसांचा गैरवापर करत असून त्यांच्या पक्षातील काही नेते देशद्रोह्यांसारखे वागत आहेत, असंही ममता यांनी म्हटलंय.
भाजप सरकारवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी यांनी एका फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये असा दावा केला की, ” पोलीस आपल्याला धमकावत असल्याची तक्रार 4 आमदार माझ्याकडे घेऊन आले. सभेला उपस्थित राहिल्यास त्यांना शस्त्र कायद्यान्वये अटक केली जाईल, अशीही धमकी देण्यात आली. ही कसली लोकशाही? या राज्यात दडपशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.” अशी घणाघाती टीका ममता यांनी केली.
याआधी गेल्या शनिवारी सकाळी, तृणमूलच्या 80 आमदारांपैकी किमान 60 आमदार कालीघाट येथील बैठकीला गैरहजर होते. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच वेळी काही आमदार रथिन घोष यांच्या घरी जमले होते. ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्यांमध्ये रथिन यांचाही समावेश होता. “माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही.” असं त्यांनी सांगितल्याचं समोर आलं होतं.
