AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दंगल कव्हर करताना… अमरावती हिंसाचार : वस्तुस्थिती आणि परिणाम सांगणारा गजानन उमाटे यांचा थरारक अनुभव, नक्की वाचा

तेवढ्यात एकाने माझ्या दिशेनं दगड भिरकवला… पुढे दुसऱ्याने काठी मारायला उचलली. तेवढ्यात डोळ्यांसमोर परिवार आणि मुलांचा चेहरा आला. डोळ्यात अश्रू दाटून आले. गर्दीला ओळख नसते. ती काहीही करु शकते. मॅाब काहीही होऊ शकला असता. पुढे बुम माईक दाखवत त्यांचा राग शांत करण्यात आम्ही यशस्वी झालो. दंगा सुरु झाला त्या पहिल्या 10 मिनीटातला हा कटू अनुभव होता. पण हिम्मत करत त्याच चिथावलेल्या मॅाबसोबत हिंसाचाराचं लाईव्ह रिपोर्टिग करत पुढे पावलं टाकत गेलो.

दंगल कव्हर करताना... अमरावती हिंसाचार : वस्तुस्थिती आणि परिणाम सांगणारा गजानन उमाटे यांचा थरारक अनुभव, नक्की वाचा
अमरावती दंगलीतील गजानन उमाटे यांचा थरारक अनुभव
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 4:45 PM
Share

नागपूर : सकाळची 9:45 ची वेळ असावी. अमरावती शहरातील राजकमल चौकात गर्दी जमायला लागली. पावलोपावली गर्दी वाढत होती. एकीकडे शांततेत घोषणाबाजी सुरु, तर दुसरीकडे 400 ते 500 तरुणांचा मॅाब वेगळ्या दिशेनं निघाला. परिस्थिती हाताबाहेर जात होती. तरुणांच्या या मॅाबने तोडफोड सुरु केली. हातात दगडं, काठ्या आणि तोडो फोडोची भाषा. हातात बुम माईक आणि सोबत कॅमेरामनला घेऊन आम्ही चिथावलेल्या त्या मॅाब सोबत हिंसाचाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करत निघालो. एका मानसिक विकृत तरुणाने रुग्णालयावर गडद भिरकावला, नर्स ओरडत बाहेर आली. मी रिपोर्टिग करतानाच ओरडू लागलो, अरे ते हॅास्पिटल आहे… तेवढ्यात एकाने माझ्या दिशेनं दगड भिरकवला. पुढे दुसऱ्याने काठी मारायला उचलली. तेवढ्यात डोळ्यांसमोर परिवार आणि मुलांचा चेहरा आला. डोळ्यात अश्रू दाटून आले. गर्दीला ओळख नसते. ती काहीही करु शकते. मॅाब काहीही होऊ शकला असता. पुढे बुम माईक दाखवत त्यांचा राग शांत करण्यात आम्ही यशस्वी झालो. दंगा सुरु झाला त्या पहिल्या 10 मिनीटातला हा कटू अनुभव होता. पण हिम्मत करत त्याच चिथावलेल्या मॅाबसोबत हिंसाचाराचं लाईव्ह रिपोर्टिग करत पुढे पावलं टाकत गेलो. (Gajanan Umate’s thrilling experience of live reporting of Amravati violence)

एक दिवस आधी शरद पवार यांचा गडचीरोली, चंद्रपूर दौरा कव्हर करुन नागपूरला पोहोचलो होतो. पहाटे लवकर उठून अमरावतीला निघालो. वाटलं परिस्थिती नियंत्रणात आहे. दुपारपर्यंत नागपुरात परत येता येईल. पण अमरावतीत त्या दिवशी जे घडलं त्या प्रसंगाच्या रिपोर्टिंगचा अनुभवंही तेवढाच थरारक होता. कारण राजकमल चौकातून निघालेला तरुणांचा मॉब पुढे हजारोंपेक्षा जास्त होता. चिथावलेला मॅाब पुढे जात होता. परिस्थिती पोलीसांच्या हाताबाहेर होती. ‘टीव्ही 9 मराठी’चा एकमेव कॅमेरा आणि मी त्या मॅाबसोबत रिपोर्टिंग करत पुढे जात होतो.

‘दंगेखोरांना हिंसाचाराचं चित्रिकरण आवडलं नव्हतं’

हातात दगडं, काठ्या आणि हजारोंचा मॅाब. यांच्यामध्ये हिंसाचाराचं लाईव्ह रिपोर्टिंग सुरु होतं. मनात भिती होती कारण कुणालाही हिंसाचार करतानाचे व्हिडीओ चित्रिकरण करणं आवडत नव्हतं. पण आम्ही हिमतीनं आमचं कर्तव्य पार पाडलं. मॅाबला नियंत्रणात आणण्यासाठी तीन-चार पोलीस कर्मचारी पुढे होते. बऱ्याचदा दंगेखोर पोलिसांच्या अंगावर धाऊन गेले. तिथे आमची कोण परवा करणार होतं? दगडफेक करत मॅाब गांधी पुतळ्यापासून पुढे गेला. गर्दी पांगवण्यासाठी पोलीसांनी काही ठिकाणी बॅरिकेट्स लावले होते. गर्दीपुढे त्याचा काही फायदा झाला नाही. इतवारा मार्केट परिसरात जाण्यापूर्वीच पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि हिंसाचार करणारे इतरत्र धावायला लागले.

Amravati Riots

अमरावती हिंसाचार

दंगेखोरांना प्रश्न आवडत नाहीत

अमरावतीचा तो हिंसाचार कव्हर करतानाच माणूस म्हणून काही तरुणांना “आपने पत्थर क्यो लिया? दगड, काठी का घेतली? तोडफोड करण्याचं कारण?” हे प्रश्न विचारण्याचं रहावलं नाही. दंगा कव्हर करताना अमरावती शहर पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि त्यांची टीम दंगेखोरांना पांगवत होती. पळापळ होताना बऱ्याचदा श्वास भरुन येत होता. ‘टीव्ही 9 मराठी’वर हे लाईव्ह रिपोर्टिंग बघताना अनेकांना ते जाणवलं, त्यांचे मॅसेज आणि फोन आले. चालता चालता पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची मुलाखत घेतली. परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. थोडा दिलासा वाटला. लाईव्ह कव्हर करताना ॲाफीसमधून ‘टीव्ही 9 मराठी’चे संपादक उमेश कुमावत सर, इनपूट हेड मोहन देशमुख यांचे सतत फोन येत होते, काळजी घे, सांभाळून कर आणि सोबत मार्गदर्शन करत होते. यामुळे त्या परिस्थितीतंही धिर वाटला. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार असाईनमेंट डेस्कवरुन होणाऱ्या वेगवान हालचाली, त्यात लाईव्ह रिपोर्टिंगला गती देत होत्या.

एक टिअरगॅस अगदी माझ्या समोर पडला…

50 ते 54 मिनीटांच्या हिंसाचाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करुन मी अमरावतीच्या त्या राजकमल चौकात पोहोचलो. अवघा चौक गर्दीने भरला होता. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केलेत. परिसरातील फोर्स वाढवण्यात आली. पण त्याचा काहीही फायदा होत नव्हता. शेजारच्या दुकानांना आग लावण्यात आली. पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला. पोलfसांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. लाठीचार्ज करुनंही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती. शेवटी पोलिसांना गर्दीवर पाण्याचा मारा करावा लागला. अश्रू धुराच्या नळकांड्या (टिअर गॅस) फेकले. गर्दीत रिपोर्टिंग करताना एक टिअरगॅस अगदी माझ्या समोर पडला. जखमी होता होता थोडक्यात वाचलो. पण धुरामुळे डोळ्यांची आग व्हायला लागली. पण फिल्ड सोडायची नाही असा निर्धार केला होता. तो कायम ठेवला. (Gajanan Umate’s thrilling experience of live reporting of Amravati violence)

Amravati Riots 2

अमरावती हिंसाचार

तुमची हिंसा झाली पण हातावर पोट असणाऱ्यांचं काय?

“रिपोर्टिंग करु नका, चित्रिकरण करु नका, काल कुठे गेले होते, तुम्ही अमुक धर्माचे आहेत… विरोधी आहात का, आरे यांना बघा” असं म्हणत बऱ्याचदा हिंसक कारवाया करणाऱ्यांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचं भाव ठेवत कधी एक पाऊल थांबलो तर कधी धिराने तिथली परिस्थिती महाराष्ट्रासमोर दाखवत राहिलो. राजकमल चौकाच्या शेजारी आतल्या गल्लीत एक छोटासा ठेला आहे, ते छोटसं कपड्याचं दुकान कुठल्या धर्माचा व्यक्ती चालवत होता माहित नाही. ते मी विचारलंही नाही. दंगेखोरांनी ठेला फोडला. त्या छोट्याशा ठेल्यातील कपडे रस्त्यावर फेकले होते. दंगा शांत झाल्यावर तो व्यक्ती अस्ताव्यस्त झालेलं आपलं साहित्य गोळा करत बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. ते मलाही बघवत नव्हतं. पण अमरावतीत दोन्ही दिवसांच्या हिंसाचारात निष्पाप लोकांचं मोठं नुकसान झालं. या हिंसाचारात जी दुकानं फोडली त्यात काम करणारे, त्यावर आपलं पोट भरणारे कदाचित हिंदू आणि मुस्लिमही असतील. ज्या रुग्णालयावर दगड फेकले तिथे आत धर्म विचारुन कधीच उपचार होत नाही. दगड भिरकावणाऱ्या त्या मॅाबपैकी अनेकांचे नातेवाईक त्या रुग्णालयात उपचार घेत असावेत किंवा फोडलेल्या दुकानाशी त्यांचा कधी ना कधी संबंध आला असावा. पण काही वेळासाठी माथी फिरली आणि दोन सख्खे शेजारी वैरी झाले.

Amravati Riots 4

अमरावती हिंसाचार

अजूनही अमरावती द्वेषाच्या आगीत जळत होती…

आम्हीही माणसं आहोत. या हिंसाचाराचं लाईव्ह रिपोर्टिंग करताना डोळे भरुन येणारा हा घटनाक्रम आम्ही बघत होतो. सकाळी साडे सात वाजता अमरावती शहरात आलो. रात्री पर्यंत रिपोर्टिंग करत होतो. अमरावतीत कडकडीत बंद, खायचं सोडा, गळ्याला कोरड पडल्यावर प्यायला पाणीही मिळत नव्हतं. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर ड्रायव्हर काकांनी कार शेजारी आणली, घरुन डबा नेण्याच्या सवयीचा आज मोठा आधार झाला. एक एक चपाती आणि पाण्याचा घोट घेत पोटाची आग भागवली. पण अजूनंही अमरावती द्वेषाच्या आगीत जळत होती.

अमरावतीच्या हिंसाचाराची प्रत्येक बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ने दाखवली. राज्याच्या गृहमंत्र्यांपासून तर अनेक मोठ्या नेत्यांनी आणि अवघ्या महाराष्ट्राने अमरावतीचा तो थरार आणि हिंसाचार पाहिला. 15 वर्षांच्या टीव्ही पत्रकारितेत देशभरात अनेक घटनांचं रिपोर्टिंग केलं, पण अमरावतीचा दंगा जीव मुठीत घेऊन कव्हर करावा लागला. हा कायम स्मरणात राहणारा थरारक अनुभव ठरला.

इतर बातम्या :

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन

अमरावती हिंसाचारः माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा, दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

Gajanan Umate’s thrilling experience of live reporting of Amravati violence

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.