‘तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवली, आज तुमचं मुसळ तर उघडं पडत नाही ना?’, ठाकरे सरकारला भाजपचा सवाल

'तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवली, आज तुमचं मुसळ तर उघडं पडत नाही ना?', ठाकरे सरकारला भाजपचा सवाल
भाजप आमदार आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

राज्यातील अनेक प्रमुख शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर परप्रांतिय मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. यावरुन भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावलाय.

सागर जोशी

|

Apr 13, 2021 | 3:32 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 ते 13 दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता आहे. तसे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आलेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतिय कामगार पुन्हा एकदा आपल्या गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक प्रमुख शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर परप्रांतिय मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. यावरुन भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावलाय. (Ashish Shelar criticizes Thackeray government over Crowd of workers at railway stations)

महाविकास आघाडी सरकारला टोला

“एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता.. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुषार” सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!” अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय.

‘आज तुमचं मुसळ तर उघडं पडत नाही ना?’

“मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत..रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार. तेव्हा मा.मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत. मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?, असा खोचक सवालही शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारलाय.

मुश्रीफांचं परप्रांतिय मजुरांना आवाहन

हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावी परतत असलेल्या परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्रातच थांबण्याचे आवाहन केले. राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती

एकीकडे लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर गावी परतत असले तरी नागपुरातील काही कामगारांनी महाराष्ट्रातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी सध्या हे मजूर भटकंती करत आहेत. या मजुरांनी मंगळवारी प्रतापनगर भागात गर्दी केली होती. सध्या लॉकडाऊनच्या शक्यतेने मजुरांना फार काम मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या मजुरांना वणवण करावी लागत आहे.

संबंधित बातम्या :

‘महाराष्ट्रात 12-13 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये, सरकार तुमची काळजी घेईल’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांनाही फटका; 7 दिवसात 279 पोलिसांना कोरोनाची लागण

Ashish Shelar criticizes Thackeray government over Crowd of workers at railway stations

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें