‘मनसे’त मेगाभरती, हर्षवर्धन जाधव आणि पंकजा मुंडेंच्या मामाचा पुनर्प्रवेश

हर्षवर्धन जाधवांसह प्रकाश महाजन, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सहकारी सुहास दशरथे, शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी मनसेची वाट धरली.

'मनसे'त मेगाभरती, हर्षवर्धन जाधव आणि पंकजा मुंडेंच्या मामाचा पुनर्प्रवेश

मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर मेगाभरती (Harshwardhan Jadhav Enters MNS) झाली.

औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेत प्रवेश केला. तर शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेची वाट धरली आहे.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. जाधव हे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

नुकतंच त्यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता.

हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावरच आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला 5 कोटींची ऑफर दिली, राज ठाकरे हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरे निष्क्रिय आहेत असे अनेक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले आहेत. आता तर हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचे सासरे रावसाहेब दानवेंवरच गंभीर आरोप केले. माझ्या बायकोला हाताशी धरुन रावसाहेब दानवे माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.

प्रकाश महाजन कोण आहेत?

प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे ज्येष्ठ बंधू. महाजन बंधूंच्या वादानंतर ते विशेषत्वाने प्रकाशझोतात आले. प्रकाश महाजन हे सध्या राजकारणात सक्रिय नसले, तरी मनसेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पक्षासाठी काम केलं होतं. 2009 मध्ये त्यांना मनसेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोन वर्षांत म्हणजे 2011 मध्ये त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. पंकजा मुंडे यांच्या राजकीय अस्थिरतेच्या काळातही ‘प्रकाशमामा’ पंकजा मुंडेंच्या मनस्थितीबद्दल बोलत आले होते.

राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं, तर त्यांच्यासारखा मोठा हिंदुत्ववादी नेता नसेल, ते जी भूमिका घेतील ही स्वागतार्ह असेल, अशा भावना प्रकाश महाजन यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे बोलून दाखवल्या होत्या. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे’ अशी इच्छा प्रकाश महाजन यांनी भेटीनंतर बोलून दाखवली होती.

सुहास दशरथे कोण आहेत?

सुहास दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दशरथे हे शिवसेनेत कार्यरत होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात.

Harshwardhan Jadhav Enters MNS

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI