‘मी राष्ट्रवादीतच’ म्हणणाऱ्या विजयसिंह मोहितेंविषयी जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

जरा काळ जाऊ द्या, मग भूमिका घ्या, असा विनंतीवजा सल्लाही जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिला.

'मी राष्ट्रवादीतच' म्हणणाऱ्या विजयसिंह मोहितेंविषयी जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

पुणे : अनेक जणांना आमच्या पक्षात यायची इच्छा आहे. जे गेले आहेत त्यांचा विचार करण्याची गरज आहे, मात्र जे गेलेच नाहीत त्यांच्या बाबतीत बेरजेचे राजकारण करावे लागते, अशा शब्दात विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबाबतीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य (Jayant Patil on Vijaysinha Mohite Patil) केलं.

तुम्ही राष्ट्रवादीतच आहात का असा प्रश्न यावेळी मोहिते पाटलांना विचारण्यात आला होता. त्यावर “मी कुठेही गेलेलो नाही. मी अजून राष्ट्रवादीतच आहे. मी याआधी 3 वेळा शरद पवारांना भेटलो आहे” असं विजयसिंह म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन ते भाजपच्या मंचावर गेले होते.

दरम्यान, लोकमान्य टिळक यांनी ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ या अग्रलेखातून विचारलेल्या प्रश्नाचा पुनरुच्चार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर, जरा काळ जाऊ द्या, मग भूमिका घ्या, असा विनंतीवजा सल्ला जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिला.

‘माझा त्यांना विनंतीवजा सल्ला आहे, की त्यांनी फार आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये. सरकार नुकतेच गेले असताना माजी मुख्यमंत्र्यांनी तरी लगेच अशी भूमिका घेऊ नये. जरा काळ जाऊ दे, मग भूमिका घ्या’ असं जयंत पाटील यांनी फडणवीसांना सुचवलं.

शपथविधी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीतून शरद पवार सांगतील ते शपथ घेतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. येत्या 30 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद देऊ नका, हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सल्ल्याचाही जयंत पाटलांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा अर्थ, मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी ‘मातोश्री’बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, असंही जयंत पाटील म्हणाले.

अॅक्सिस बँकेतील सरकारी खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मागच्या सरकारचे कोणतेही निर्णय सरकार विनाकारण फिरवणार नाही, असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.

माढ्याचे खासदार नाईक निंबाळकर यांनी समर्थकांना कालवा समितीतून वगळले असा आरोप केला त्यावर बोलताना ‘त्यात प्रॉब्लेम आहे? त्यांची उपयोगिता दिसली नाही, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्या सांगण्यावरुन वगळले.’ असं स्पष्टीकरण पाटलांनी दिलं. Jayant Patil on Vijaysinha Mohite Patil

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI