सर्वांना विष पाजा, मगच…धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून करुणा मुंडे आक्रमक; अजितदादांना इशारा!
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करू, असे संकेत दिल्यानंतर करुणा मुंडे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

Karuna Munde On Dhananjay Munde :धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देताना अजित पवार यांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. अजित पवार हे लोकप्रतिनिधी आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे तुम्हाला दु:ख दिसत नाही. महादेव मुंडे, झरीन शेख, काका गर्जे अशी अनेक प्रकरणं आहेत. शासन, प्रशासनाला हाताशी धरून या लोकांनी बीडमध्ये काळा बाजार करून ठेवला आहे, अशी घणाघाती टीका करुणा मुंडे यांनी केलीय. तसेच तुमच्याकडे चांगले लोक नसतील तर तुमचा पक्ष बंद करून टाका, असा सल्लाही करुणा मुंडे यांनी अजित पवार यांना दिला.
तुम्ही सगळ्यांना विष पाजा आणि…
करुणा मुंडे टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. यावेळी बोलताना पालकमंत्री असतानाही तुम्हाला बीडच्या जनतेचे, करुणा मुंडे यांचे, ज्ञानेश्वरी मुंडे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे दु:ख दिसत नसेल तर तुम्ही सगळ्यांना विष पाजा आणि त्यानंतरच धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्या, असा हल्लाबोल करुणा मुंडे यांनी केला.
संपूर्ण जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार
अजित पवार यांच्याकडे सत्य ऐकण्याची शक्ती नाही. तुम्ही धनंजय मुंडे यांनी यांना मंत्रिपद दिलं तर मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार आहे, असा इशाराच करुणा मुंडे यांनी अजित पवार यांना दिला.
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करू
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही धनंजय मुंडे यांना सहआरोपी करू. त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला घेऊन आम्ही अजित पवार यांच्या घरासमोर बसणार आहोत. आम्ही मनमानी चालू देणार नाही, असा पवित्रा करुणा मुंडे यांनी घेतला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांची आणखी एका प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यातही क्लीनचीट मिळाली तर आम्ही मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याबाबत विचार करू, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अजित पवार यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याची घाई केली जात आहे, असाही हल्लाबोल विरोधकांनी केला होता.
