सत्तेसाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, घटक पक्षांच्या वाट्याला काय?

भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेवरुन रस्सीखेच सुरु आहे (BJP-Shivsena on CM Post). त्यातच भाजपच्या घटक पक्षांनीही सत्तेत वाटा द्या, अशी हाक दिली आहे. त्यामुळे भाजपसमोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे.

  • ब्रह्मा चट्टे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 20:25 PM, 26 Oct 2019
सत्तेसाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, घटक पक्षांच्या वाट्याला काय?

मुंबई : विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांचे निकालही हाती आले, आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मात्र, त्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेवरुन रस्सीखेच सुरु आहे (BJP-Shivsena on CM Post). त्यातच भाजपच्या घटक पक्षांनीही सत्तेत वाटा द्या, अशी हाक दिली आहे. त्यामुळे भाजपसमोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे (BJP Alliance Parties). एकीकडे शिवसेनेने अडीच वर्ष भाजपचा, तर अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, घटक पक्ष मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आग्रही आहेत (BJP Alliance Parties).

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटली. या युती बरोबरच राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम, रिपब्लिकन पार्टी आठवले गट आदी घटक पक्षांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपचा हात धरला. त्यानंतर निवडणुकीचे निकाल आले आणि सत्ता स्थापन झाली. या सत्तेत भाजपने घटक पक्षांनाही स्थान दिले. रासपचे महादेव जानकर मंत्री झाले, तर स्वाभिमानीचे सदाभाऊ राज्यमंत्री झाले. रिपाईंचे आठवले केंद्रात मंत्री झाले, तर शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आणि अशाप्रकारे घटक पक्षांसह पाच वर्ष भाजपने पूर्ण केली.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या कोट्यातून घटक पक्षांना जागा सोडल्या. पण, त्यांना चिन्ह हे कमळाचंच देण्यात आलं. मोदी लाटेवर स्वार होत उमेदवार जिंकून येण्याची शाश्वती असल्याने राजीखुशीने घटक पक्षांनीही भाजपची ही अट मान्य करत मुख्यमंत्र्यांनी सुचवलेल्या उमेदवारांना आपल्या कोट्यातील उमेदवार बहाल केले. मात्र, निवडणुकीत मोदी लाट चालली नाही, परिणामी घटक पक्षांचे उमेदवार पराभूत झाले.

राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी घटकपक्ष आस लावून बसले आहेत (cabinet expansion). मात्र, जर सेना-भाजपचेच जुळत नसेल, तर घटकपक्षांचा विचार कोण करणार? सध्या भाजप घटक पक्षांना नाराज करु शकत नाही आणि जर समजा भाजपने घटक पक्षांकडे दुर्लक्ष केलं, तरी घटक पक्षांनाही कुठे जाता येणार नाही. कारण घटक पक्षाचे उमेदवार हे वेगळ्या पक्षातील असले, तरी तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचेच सदस्य आहेत. त्यामुळे घटक पक्षांची अवस्था सध्या ‘सांगताही येईना आणि सहनही होईना’ अशी झाली आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने लेखी आश्वासन द्यावं, शिवसेनेची मागणी

माझ्यात क्षमता, कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडेल : शिवेंद्रराजे भोसले

उमेदवार 34, मतं फक्त दोघांनाच, तब्बल 32 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

दिलीप सोपलांना हरवणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपला पाठिंबा