भगवान भोलेनाथला श्रावण महिना अधिक प्रिय का? जाणून घ्या यामागच्या आख्यायिका

श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरच्या पूजेला अधिक महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या सोमवारांना 'श्रावण सोमवार' असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया आणि विशेषत: अविवाहित मुली भगवान शिव शंकरसाठी उपवास ठेवतात.

भगवान भोलेनाथला श्रावण महिना अधिक प्रिय का? जाणून घ्या यामागच्या आख्यायिका
शंकराला बेलपत्र अर्पण करताना या गोष्टी ठेवा लक्षात

मुंबई : श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना. हा महिना इंग्रजी कॅलेंडरमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात येतो. यावर्षी हा श्रावण महिना 25 जुलैपासून 22 ऑगस्ट 2021 पर्यंत असेल. याला ‘वर्षा ऋतू’ असेही म्हणतात. कारण या काळात भरपूर पाऊस पडतो. या महिन्यात अनेक महत्वाचे सण साजरे केले जातात, ज्यात रक्षाबंधन, नागपंचमी इत्यादी प्रमुख सणांचा समावेश आहे. श्रावण पौर्णिमा दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा, मध्य भारतात कजरी पौर्णिमा, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपना म्हणून साजरी केली जाते. सणांची विविधता ही भारताची ओळख आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरच्या पूजेला अधिक महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या सोमवारांना ‘श्रावण सोमवार’ असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया आणि विशेषत: अविवाहित मुली भगवान शिव शंकरसाठी उपवास ठेवतात. (Why is the month of Shravan more dear to Lord Bholenath, know the legend behind this)

महादेवाला प्रिय श्रावण

श्रावण महिन्याबद्दल एक आख्यायिका आहे. ‘जेव्हा सनत कुमारांनी भगवान शिव शंकरांना श्रावण महिन्यावर आपले इतके प्रेम का, असा प्रश्न केला, तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, देवी सतीने आपल्या पिता दक्षच्या घरामध्ये योगशक्तीने तिचे शरीर अर्पण केले होते. त्याआधी देवी सतीने प्रत्येक जन्मात महादेवाला पती म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले होते. आपल्या दुसऱ्या जन्मामध्ये देवी सती हिमाचल आणि राणी मैनाच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. तिचे नाव पार्वती. पार्वतीने युवावस्थेतील श्रावण महिन्यात कुठलाही आहार न घेता कठोर उपवास पाळला आणि शिवशंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याशी लग्न केले. तेव्हापासून श्रावण महीना महादेव शिव शंकर यांच्यासाठी खास ठरला.

भगवान शिवशंकर यांना श्रावण महिना अधिक प्रिय असण्याचे आणखी एक कारण म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर आले होते आणि आपल्या सासरच्या घरी गेले. तेथे त्यांचे अर्घ्य आणि जलाभिषेक यांनी स्वागत करण्यात आले. श्रद्धेनुसार भगवान शिवशंकर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सासरच्या घरी जायचे. त्यामुळे भूतलावरील लोकांना भगवान शिवशंकरांचा कृपाशिर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो.

भगवान शंकरांनी स्वत: विष पिऊन जगाचे रक्षण केले

पौराणिक कथांमध्ये असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात महासागर मंथन केले गेले होते. सागर मंथन केल्यानंतर जे विष बाहेर निघाले, भगवान शंकरांनी आपल्या घशात घेऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले. पण विष प्यायल्यानंतर महादेव शिवशंकरांचा गळा निळा झाला. म्हणूनच त्यांचे नाव ‘नीळकंठ महादेव’ असे ठेवले गेले. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी-देवतांनी त्यांना पाणी अर्पण केले. म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळेच श्रावण महिन्यात भोलेनाथला पाणी दिल्यास विशेष फळप्राप्ती होते. शिवपुराणात असे सांगितले आहे की भगवान शिव स्वत: जल आहेत. म्हणूनच पाण्याच्या साहाय्याने त्यांची उपासना केल्यास त्यातून चांगले फळ मिळते, यात शंका नाही.

शास्त्रात असे सांगितले आहे की भगवान विष्णू श्रावण महिन्यात योग निद्रामध्ये जातात. म्हणून सर्व भाविक आणि संतांसाठी हा वेळ अत्यंत मौलिक आहे. हा चार महिन्यांचा वैदिक यज्ञ आहे, जो पौराणिक व्रताचा एक प्रकार आहे. याला ‘चौमासा’देखील म्हणतात. भगवान शिवशंकर हे विश्व चालवण्याची जबाबदारी स्वीकारतात. म्हणून भगवान शिव श्रावणातील मुख्य देवता बनतात.

भगवान शिवशंकरांची पूजा

श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आपल्या कुटूंबियांसह पूजा करावी. या महिन्यात भगवान शिवच्या ‘रुद्राभिषेक’ला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दररोज ‘रुद्राभिषेक’ करता येतो. इतर महिन्यात शिववासातील मुहूर्त पाहूनच रुद्राभिषेक करावा लागतो. भगवान शिवशंकरांच्या रुद्राभिषेकामध्ये पाणी, दूध, दही, शुद्ध तूप, मध, साखर, गंगा पाणी आणि उसाचा रस इत्यादीने स्नान केले जाते. अभिषेक केल्यावर भगवान शिव बेलपत्र, शमीपात्र, कुशा इत्यादींनी प्रसन्न होतात. शेवटी भांग, धतुरा आणि श्रीफळ भोलेनाथ शिवशंकरांना अर्पण केले जाते.

बेलपत्राचे महत्त्व

शिवलिंगावर बेलपत्र आणि शमीपात्र अर्पण करण्याच्या वर्णनाचा पुराणातही उल्लेख आहे. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पित केले जाते. असे म्हणतात की शिवलिंगावर ‘आक’चे पुष्प अर्पण केल्यास सोन्याचे दान केल्यासारखेच फळ मिळते. भगवान शिवला संतुष्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना ‘बेलपत्र’ अर्पण करणे. बेलपात्राच्या मागे एक आख्यायिका देखील आहे. या आख्यायिकेनुसार, भिल्ल नावाचा एक दरोडेखोर होता. तो दरोडेखोर आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना लुटत असे. श्रावण महिन्यात एकदा हा लुटारू तेथून जाणाऱ्यांना लुटण्याच्या उद्देशाने जंगलात गेला आणि एका झाडावर चढून बसला. दिवस-रात्र झाल्यावरही त्याला कुणालाही लुटायला मिळाले नाही. ज्या झाडावर हा दरोडेखोर लपला होता, ते बेलाचे झाड होते. संपूर्ण दिवस-रात्र वाया गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्या अस्वस्थतेतून त्याने बेलाची पाने खाली फेकण्यास सुरुवात केली. ती पाने नकळत शिवलिंगावर पडत होती. शिवलिंगावर सतत बेलाची पाने गळून पडल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले व ते अचानक दरोडेखोरासमोर प्रसन्न झाले आणि लुटारूला वरदान मागण्यास सांगितले. त्या दिवसापासून बेलाच्या पानांचे महत्त्व वाढले. (Why is the month of Shravan more dear to Lord Bholenath, know the legend behind this)

इतर बातम्या

मारुती, टाटा आणि रेनॉच्या ‘या’ तीन गाड्यांना मध्यमवर्गीय कुटुंबांची पसंती

पुण्यातील अटल भूजल योजनेच्या कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या; पालकमंत्री अजित पवारांच्या सूचना

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI