पाकिस्तानी खेळाडूंचा कावेबाजपणा! शिक्षा होऊ नये यासाठी घेतलं धोनीचं नाव, नेमकं काय झालं ते जाणून घ्या
आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला वादाची किनार लाभली. पाकिस्तानी क्रिकेटपटू साहिबजादा फरहानने अर्धशतकी खेळीनंतर मैदानात एके 47 सेलीब्रेशन केलं. यानंतर वादाला फोडणी मिळाली. त्यामुळे आयसीसीच्या सुनावणीला सामोरं जावं लागलं. तेव्हा नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पण या सामन्यात साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकलं आणि गनशॉट सेलीब्रेशन केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर फरहानने केलेलं सेलीब्रेशन भारतीयांच्या जिव्हारी लागलं.यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली. दुसरीकडे, हारिस रऊफने विमान पडल्याचा कृती दाखवत डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे बीसीसीआयने साहिबजादा फरहान आणि हारिस रऊफ यांची आयसीसीकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर दोन्ही खेळाडू आयसीसीच्या समितीसमोर उपस्थित राहिले. यावेळी या दोन्ही खेळाडूंनी शिक्षेपासून वाचण्यासाठी विराट कोहली आणि एमएस धोनीच्या नावाचा उल्लेख केला. फरहानने सुनावणी दरम्यान सांगितलं की, हे खासगी सेलीब्रेशन होतं. हे पठाण संस्कृतीचा भाग आहे. लग्नाच्या कार्यक्रमात आनंद व्यक्त करण्यासाठी असं करणं सामान्य बाब आहे. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता.
मिडिया रिपोर्टनुसार, साहिबजादा फरहानने सांगितलं की, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहलीने असा आनंद साजरा करताना गन जेस्चरचा वापर केला आहे. असं असलं तरी साहिबजादा फरहानला आयसीसीकडून शिक्षा सुनावली जाऊ शकते. सामना फीमधील रक्कमेवर दंड ठोठावला जाऊ शकतो. पण बंदीची शक्यता खूपच कमी आहे. हारिस रऊफने देखील या सामन्यात 6-0 असा इशारा केला होता. तसेच लढाऊ विमानांवर विनोद केला होता. हे प्रकरण देखील राजकारणाशी जोडलं जात होतं. आयसीसीच्या सुनावमीत रऊन स्पष्ट केलं की 6-0 चा भारताशी काही संबंध नाही. इतकंच काय तर भारताशी कसं जोडता? असा प्रश्नही विचारला. आयसीसी अधिकाऱ्यांना त्याचं म्हणणं पटलं आहे. त्यामुळे त्याला शिक्षा होणं कठीण आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा सामना होणार आहे. तिसऱ्यांदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ या सामन्यातही नो हँडशेक ही भूमिका कायम ठेवणार आहे. साखळी आणि सुपर 4 फेरीत भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर प्रकरण चिघळलं. इतकंच काय तर वेगवेगळ्या वादांना फोडणी मिळाली. या बाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रार केली होती. पण ही तक्रार निष्फळ ठरली. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ इशारा देऊन सोडले. भारतीय कर्णधाराने आपण दोषी नसल्याचे सांगितले आणि त्याचे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित नसल्याचे सांगितले.
