ENG vs IND : शुबमननंतर आकाश दीपचा धमाका, इंग्लंडला 3 झटके, दुसऱ्या दिवशी भारताचा दबदबा, यजमान 510 धावांनी पिछाडीवर
England vs India 2nd Test Day 2 Highlights : भारताच्या फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही इंग्लला झटपट 3 झटके दिले. भारताने यासह दुसऱ्या दिवसाचा गोड शेवट केला.

टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसरा दिवस आपल्या नावावर केला आहे. भारताने कर्णधार शुबमन गिल याने केलेल्या ऐतिहासिक द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आकाश दीप याने सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 77 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंड 510 धावांनी पिछाडीवर आहे. तर अनुभवी जो रुट आणि हॅरी ब्रूक ही जोडी नाबाद परतली आहे.
इंग्लंडला 2 बॉलमध्ये 2 झटके
भारताला ऑलआऊट केल्यांनतर इंग्लंडकडून बेन डकेट आणि झॅक क्रॉली ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी संयमी सुरुवात केली. मात्र जे काही होतं ते दुसऱ्या ओव्हरपर्यंतच. आकाश दीप तिसरी ओव्हर टाकायला आला आणि चित्रच बदललं. आकाशने तिसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर बेन डकेट याला शुबमनच्या हाती कॅच आऊट केलं. डकेटला भोपळाही फोडता आला नाही.
डकेटनंतर ओली पोप मैदानात आला. आकाशने ओलीला पहिल्याच बॉलवर आऊट केलं आणि इंग्लंडला सलग दुसरा झटका दिला. त्यानंतर मोहम्मद सिराज याने झॅक क्रॉलीला 19 धावांवर आऊट केलं. त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रूक या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत सावध बॅटिंग केली आणि एकही विकेट गमावली नाही. रुट 37 चेंडूत 18 धावांवर नाबाद आहे. तर हॅरी ब्रूक याने 53 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या आहेत.
भारताचा पहिला डाव
दरम्यान भारताने पहिल्या डावात 151 षटकांमध्ये सर्वबाद 587 धावा केल्या. भारतासाठी कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक आणि ऐतिहासिक 269 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीत 3 षटकार आणि 30 चौकार ठोकले. शुबमनचं हे कर्णधार आणि फलंदाज म्हणून पहिलंवहिलं द्विशतक ठरलं.
इंग्लंड 510 धावांनी पिछाडीवर
Stumps on Day 2 in Edgbaston!
End of a tremendous day with the bat and ball for #TeamIndia 🙌
England 77/3 in the first innings, trail by 510 runs
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/GBKmE34pgM
— BCCI (@BCCI) July 3, 2025
सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी
शुबमन व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल याने 107 बॉलमध्ये 87 रन्स केल्या. ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही अप्रतिम खेळी केली. जडेजाने 89 धावा केल्या. जडेजाने या दरम्यान सहाव्या विकेटसाठी कर्णधार शुबमनसह 203 धावांची द्विशतकी आणि विक्रमी भागीदारी केली. तर वॉशिंग्टन सुंदर याने 42 धावांचं योगदान दिलं.तर शेपटीच्या फलंदाजांनी एकेरी धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यासह भारताचा डावा आटोपला. इंग्लंडसाठी शोएब बशीर याने 3 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस वोक्स आणि जोश टंग जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स आणि जो रुट या त्रिकुटाने 1-1 विकेट मिळवली.
