14 वर्षानंतर दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी भारत दौऱ्यावर, सचिन-विराटसोबत खेळणार क्रिकेट सामना
Lionel Messi's India Visit 2025: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे. हा तीन दिवसीय दौरा 13 ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे. मेस्सी मुंबई, कोलकाता आणि दिल्लीला भेट देणार आहे. तसेच सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत वानखेडेवर क्रिकेट सामना खेळेल.

भारतात क्रिकेटची लोकप्रियता इतकी घट रुजली आहे की इतर खेळांचं फार काही महत्त्व नाही. पण असं असलं तरी भारतात इतर खेळाप्रती खूपच क्रेझ असल्याचं दिसून आलं आहे. खासकरून फुटबॉल वर्ल्डकप आला की भारतीयांच्या अंगात वारं येतं. मग जिथे तिथे फुटबॉलच्या चर्चा रंगतात. दुर्दैवाने भारतीय संघ आशिया झोनमधून वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांना आता 2030 पर्यंत पुन्हा वाट पाहावी लागणार आहे. असं अससाना अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांनी भारतात येणार आहे. 13 ते 15 डिसेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर असून तीन ठिकाणी भेट देणार आहे. इतकंच काय तर या दौऱ्यादरम्यान, मेस्सी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबत वानखेडे स्टेडियमवर सामना खेळणार असल्याचं वृत्त आहे.
रिपोर्ट्सनुसार, लिओनेल मेस्सी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 7-ए-साईड क्रिकेट सामना खेळेल. मेस्सी 14 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात सहभागी होईल. एका प्रसिद्ध इव्हेंट एजन्सीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला 14 डिसेंबर रोजी मैदान राखीव ठेवण्याची विनंती केल्याचे कळते. त्यानंतर मेस्सी कोलकात्याला भेट देईल आणि ईडन गार्डन्समध्ये त्यांचा सत्कार केला जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोलकाता भेटीदरम्यान मेस्सी मुलांसाठी फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन करतील. मेस्सीच्या सन्मानार्थ ‘GOAT CUP’ स्पर्धा देखील आयोजित केली जाईल.
“मेस्सी 14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर असेल. तो माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट सामना देखील खेळण्याची शक्यता आहे. सर्वकाही अंतिम झाल्यानंतर आयोजक संपूर्ण वेळापत्रक तयार करतील,” असे एमसीएच्या एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. लिओनेल मेस्सीने यापूर्वी 2011 मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी त्याने कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. आता 14 वर्षांनंतर तो पुन्हा भारत दौऱ्यावर येत आहे. दरम्यान, मेस्सीने पुढच्या वर्षी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
