‘…जास्त कशावर प्रेम करते’, स्मृती मंधाना लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच बोलली
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या आयुष्यात मागच्या काही दिवसात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. लग्न जमल्यापासून मोडण्यापर्यंत बरंच काही घडलं. असं असताना स्मृती मंधाना पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.

भारत आणि श्रीलंका वुमन्स संघात टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या संघात स्मृती मंधानाचं नावही आहे. खरं तर आधी ती या मालिकेला मुकणार अशी चर्चा होती. पण त्या सर्व चर्चांना स्मृती मंधानाच्या नावाने पूर्ण विराम लागला आहे. स्मृती मंधानाचं लग्न मोडल्यानंतर पुढे काय करणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. काय बोलणार? कशी व्यक्त होणार? वगैरे वगैरे.. अखेर बुधवारी स्मृती मंधानाने अमेझॉन संभव शिखर परिषदेत हजेरी लावली. यावेळी तिने क्रिकेट विश्वातील आठवणींना वाट करून दिली. स्मृती मंधानाने 2013 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं होतं. आता तिच्या क्रिकेट कारकिर्दीला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. यात वनडे वर्ल्ड विजयातही तिचा मोलाचा वाटा राहिला आहे. असं असताना तिने या परिषदेत क्रिकेटचा प्रवासाचा उलगडा केला. लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधाना पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात समोर आली.
“मला वाटत नाही की मी क्रिकेटपेक्षा जास्त कशावर प्रेम करते. भारताची जर्सी घालणे ही सर्वात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी, तो एक विचार तुम्हाला सर्वकाही रोखण्यास मदत करतो.”, असं स्मृती मंधानाने सांगितलं. “फलंदाजीचे वेड नेहमीच होते. माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते खरोखर समजले नाही, पण माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट हवी होती. ती म्हणजे विश्वविजेता म्हणून ओळखले जावे.”, असंही ती पुढे म्हणाली.
“ही ट्रॉफी आमच्या संघर्षाचे फलित होती. मी एका दशकाहून अधिक काळ खेळले आहे. बऱ्याचदा पदरी निराशा पडली आहे. अंतिम सामन्यापूर्वी आम्ही तो क्षण पुन्हा पुन्हा आठवला. जेव्हा शेवटी पडद्यावर दिसला तेव्हा त्याने खरोखरच आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. तो क्षण प्रत्येक प्रकारे भावनिक होता.”, असंही स्मृती मंधाना पुढे म्हणाली. “आम्हाला त्यांच्यासाठीही जिंकण्याची तीव्र इच्छा होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून असं वाटलं की संपूर्ण महिला क्रिकेटने काहीतरी साध्य केलं आहे. आमच्या आधी आलेल्या प्रत्येकासाठी हा विजय होता.”, असं सांगत स्मृतीने अनुभव शेअर केला.
