‘इंग्लंडने कसोटी मालिकेत भारताला नमवलं’, मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच दिला निकाल
चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारतीय संघ पराभवाच्या दरीत ढकलला गेला आहे. पहिल्या डावात इंग्लंडने आघाडी घेण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक धावांसह भारताचा पराभव निश्चित होत आहे, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाची पिछेहाट झाली आहे. भारतीय गोलंदाजांना विकेट मिळणं कठीण झालं आहे. त्यातही इंग्लंडने चार विकेट गमवून मजबूत आघाडी घेण्याच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघ गमवणार हे जवळपास निश्चित होताना दिसत आहे. त्यात जो रूटची बॅट चांगलीच तळपली असून आणखी एक शतक ठोकलं आहे. त्यामुळे त्याचं मैदानात असणं भारतासाठी डोकेदुखी आहे. त्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंड आघाडी घेईपर्यंत भारतीय गोलंदाजी पूर्णपणे फेल गेली असंच म्हणावं लागेल. भारताचा चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तर पाच सामन्यांच्या कसोटी मालिका इंग्लंड जिंकेल. कारण आतापर्यंतच्या तीन सामन्यात इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकला की मालिका खिशात जाणार आहे. असं असताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच विजयाचं भाकीत वर्तवलं आहे.
केविन पीटरसनने एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, ‘इंग्लंडने तिसऱ्या दिवशी फलंदाजी केली तर भारत ही मालिका पराभूत होईल.’ केविन पीटरसनने भारताची कामगिरी पाहून हे भाकीत वर्तवलं आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 358 धावा केल्या आहेत. हे आव्हान इंग्लंडने 4 गडी गमवून पूर्ण केलं आहे. तसेच 400 हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 150 हून अधिक धावांची आघाडी घेतली तर हे आव्हान पूर्ण करतानाच नाकी नऊ येतील.
England bat all of today, series over – England win.
— Kevin Pietersen🦏 (@KP24) July 25, 2025
मँचेस्टर कसोटी भारताची रणनिती पूर्णपणे फेल गेली आहे. भारताने या सामन्यातही कुलदीप यादवला संधी दिली नाही. फलंदाजांच्या भरवशावर भारताचं सामना जिंकण्याचं स्वप्न काही पूर्ण होताना दिसत नाही. कारण भारतीय फलंदाज या सामन्यात हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत. त्यात शेपटच्या फलंदाजांकडून अपेक्षा न केलेलीच बरी अशी स्थिती आहे. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असूनही 20-30 धावा होत नाहीत. त्यापेक्षा एक अतिरिक्त गोलंदाज खेळवला असता तर बरं झालं असतं असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.
