सुपर 8 फेरीपूर्वी सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य, जर 1 नंबर आहे तर…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतचे सामने पाहिले तर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. अमेरिकेतील खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं खरंच खूपच कठीण गेलं. कमी धावसंख्या करूनही काही संघांना विजय मिळवता आला नाही. आता सुपर 8 फेरीतील सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. त्यामुळे या सामन्यात रंगत पाहायला मिळू शकते.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. टीम इंडियाला अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. भारताचे सामने बारबाडोस, सेंट लूसिया आणि अँटिगुआमध्ये होणार आहे. या खेळपट्ट्या अमेरिकेच्या तुलनेत फलंदाजीला पूरक आहेत. त्यामुळे या मैदानात मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता वाढली आहे. असं असताना टी20 फॉर्मेटमध्ये नंबर 1 वर असलेल्या सूर्यकुमार यचादवचं एक वक्तव्य समोर आलं आहे. “परिस्थितीनुसार फलंदाजीत बदल करावा लागतो. तरच तशा खेळपट्ट्यांवरही धावा करू शकाल.”, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं. सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने सराव करत चांगलाच घाम गाळला. या प्रॅक्टिस सेशननंतर सूर्यकुमार यादवने आपलं मन मोकळं केलं.
“जर मागच्या एक किंवा दोन वर्षांपासून सलग एक नंबरवर आहेत. तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत खेळता आलं पाहीजे. संघाची गरज पाहून खेळायलं हवं. यामुळे तुम्ही एक चांगले फलंदाज असल्याचं दिसून येतं. मी असंच काहीसं करण्याचा प्रयत्न करत आहे. विकेटवर वेग नसेल तर धावा करणं कठीण होतं. जेव्हा तुमच्या खेळण्याची पद्धत माहिती असते तेव्हा तुम्हाला डोकं शांत ठेवून फलंदाजी करावी लागते. तरच मोठी खेळी करणं सोपं होतं.”, असं सूर्यकुमार यादव याने सांगितलं.
सूर्यकुमार यादवने सांगितलं की, “न्यूयॉर्कमध्ये खेळणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. कारण ती खेळपट्टी पूर्णपणे फ्रेश होती आणि पहिल्यांदाच वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. वेस्ट इंडिजमध्ये वारंवार स्पर्धा होत असतात. त्यामुळे इथल्या खेळपट्ट्या चांगल्या आहेत.” दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने फिरकीपटूंना सामोरं जाण्याबाबतही सांगितलं. “स्वीप आणि रिव्हर्स स्वीप माझी ताकद आहे. मी सरावतही त्यावरच जोर दिला. कारण तसंच मला सामन्यात खेळायचं आहे.”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव फक्त 2 धावा करू शकला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही काही खास करू शकला नाही. पाचव्या स्थानावर उतरला होता. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र 8 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 7 धावा करून बाद झाला. हारिस रऊफच्या गोलंदाजीवर मोहम्मद आमिरने त्याचा झेल घेतला. अमेरिकेविरुद्ध सूर्याची बॅट चांगलीच तळपली. 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तसेच संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची साथ दिली.
