Best Captain: रोहित शर्मा, विराट कोहली की MS धोनी, टीम इंडियाचा बेस्ट वनडे कॅप्टन कोण? वाचा आकडेवारी
रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. या तिघांचा वनडे कर्णधारपदाचा विक्रम जाणून घेऊयात.

भारताला आता नवीन वनडे कर्णधार मिळाला आहे. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गिल 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे. 2027 च्या वनडे वर्ल्डकपची तयारी म्हणून गिलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारताचे अलिकडील कर्णधार होते, या तिघांची कामगिरी कशी होती ते सविस्तर जाणून घेऊयात.
रोहित शर्मा हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे, खासकरून वनडे आणि टी 20 मध्ये त्यांने चमकदार कामगिरी केलेली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता, तसेच संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले होते. रोहितचा वनडे कर्णधार म्हणून रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊयात.
रोहित शर्माची वनडे कर्णधारपदाची कारकीर्द
रोहित शर्माला डिसेंबर 2021 मध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 56 वनडे सामने खेळले, त्यापैकी 42 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला, तर फक्त 12 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. एक सामना बरोबरीत सुटला आणि एक रद्द झाला होता. कर्णधार म्हणून रोहितने 75 टक्के वनडे सामने जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
विराट कोहलीची कर्णधारपदाची कारकीर्द?
विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. एमएस धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर 2017 मध्ये विराट कोहलीकडे वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 95 वनडे सामने खेळले, ज्यात 65 सामन्यांमध्ये संघाचा विजय झाला तर 27 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजयाचा टक्का 68.42 इतका आहे.
MS धोनीची वनडे कर्णधारपदाची कारकीर्द
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने 3 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2007 मध्ये धोनी टीम इंडियाचा वनडे कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण 200 सामने खेळले, त्यापैकी 110 सामने जिंकले आणि 74 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. यातील 5 सामने बरोबरीत सुटले आणि 11 सामने रद्द झाले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 55 टक्के होती.
दरम्यान, विजयाच्या टक्केवारीनुसार, रोहित शर्माचे आकडे हे धोनी आणि विराटपेक्षा सरस आहेत. तर धोनीने भारताला वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावून दिलेले आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2019 च्या वनडे वर्ल्डकपची सेमीफायनल गाठली होती.
