शुबमन गिलने प्रशिक्षकाचं काही ऐकलं नाही, शेवटी नको तो दिवस पाहण्याची आली वेळ Video
पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी पावसाचा खंड वारंवार पडत आहे. तसेच भारताच्या विकेटही पडत आहे. कर्णधार शुबमन गिलची विकेट पाहून तर क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. त्यामुळे संघ अडचणीत आला आहे.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी सुरुवातीला दिसत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सावध फलंदाजी करणं गरजेचं होतं. त्यात पावसामुळे खंड पडत असल्याने गोलंदाजांना मदत होत आहे. पहिल्या सत्रात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल बाद होत तंबूत परतले. कर्णधार शुबमन गिल दोन विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला. साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिलकडून अपेक्षा होती. दोघं तग धरून खेळत होते. दुसऱ्या सत्रापर्यंत त्यांनी गोलंदाजांचा चांगला सामना केला. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. शुबमन गिल स्वत:च्या चुकीमुळे फुकटची विकेट देऊन आला. खरं तर अशा पद्धतीने कसोटीत बाद होणे गुन्हा आहे. मात्र शुबमन गिलने प्रशिक्षकाच्या सूचनेकडे कानाडोळा केला आणि स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली. तसेच संघाला अडचणीत आणले.
पावसाच्या व्यत्ययानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर सामना सुरु झाला तेव्हा भारतीय संघ चांगल्या स्थितीत होता. पण शुबमन गिल नको ती चूक करून बसला. खरं तर कसोटी क्रिकेटमध्ये अशी चूक करणं अक्षम्य गुन्हा मानला जातो. वेगवान गोलंदाज गस एटकिंसनच्या गोलंदाजीवर कर्णधार गिलने फ्रंटफूटवर डिफेंड केला. हा चेंडू शॉर्ट कव्हरला गेला. गिलने वेगाने धाव घेऊ इच्छित होता. पण साई सुदर्शन यासाठी तयार नव्हता. एटकिंसन वेगाने चेंडूवर धावत गेला आणि चेंडू स्ट्राईकला असलेल्या स्टंपच्या दिशेने फेकला. गिल पुन्हा क्रिजमध्ये येण्याआधीच स्टंप उडाल्या होत्या. गिल 21 धावा करून बाद झाला आणि साई सुदर्शनसोबतची 45 धावांची भागीदारी मोडली.
React. Pick-up. Strike.
Clinical from Gus Atkinson 👌 pic.twitter.com/aM3RbgBvjp
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांना आधीच धाव घेण्याबाबत इशारा मिळाला होता. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने या दोघांना कानपिचक्या दिल्या होत्या. मँचेस्टर कसोटीत समालोचन करणाऱ्या आशिष नेहरा याने आयपीएलमध्येही असेच बाद झाल्याचं सांगितलं. त्यावेळेस मी त्यांना अशा पद्धतीने आत्महत्या करू नका असा सल्ला देत असे. पण यावेळी शुबमन गिला हा सल्ला विसरला आणि टीम इंडियाला अडचणीत आणले.
