Kedar Jadhav Retirement: केदार जाधवची निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावर ट्विट करत म्हणाला….
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या गोटातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडरने निवृत्तीची घोषणा केली आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 3 सामने पार पडले. तिसऱ्याच सामन्यात क्रिकेट चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. नामिबियाने ओमानवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. स्पर्धेतील चौथ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 5 जून रोजी आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडरने निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर पुणेकर केदार जाधव याने सोशल मीडियावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
केदार जाधव याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 साली न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर केदार जाधव याला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे केदार निवृत्ती जाहीर करणार असल्याची शक्यता होती. अखेर केदारने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला रामराम ठोकत पूर्णविराम लावला आहे. केदारने क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमधून निवृत्त असल्याचं म्हटलंय.
धोनी स्टाईलमध्ये निवृत्ती जाहीर
केदार जाधव महेंद्रसिंह धोनीच्या फार जवळचा अर्थात लाडका खेळाडू होता. केदारने निवृत्ती जाहीर करण्यातही धोनीचीच स्टाईल वापरली आहे. केदारने ट्विटमध्ये म्हटलंय की,”माझ्या क्रिकेट कारकीर्दीदरम्यान समर्थन आणि प्रेम दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला दुपारी 3 नंतर निवृत्त समजा”. केदारने एक व्हीडिओ पोस्ट केलाय.य केदारने या व्हीडिओत टी 20, वनडे आणि आयपीएलमधील फोटो पाहायला मिळत आहेत. केदार या फोटोंमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसोबत पाहायला मिळत आहे. ‘जिंदगी के सफर मे’, हे गाणं व्हीडिओच्या बॅकग्राउंडला आहे.
महेंद्रसिंह धोनीने “तुमच्या समर्थन आणि प्रेमसाठी फार फार धन्यवाद. संध्याकाळी 5 वाजून 29 मिनिटांनी मला मला निवृत्त समजा.”, असं धोनीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला होता. तेव्हा धोनीने क्रिकेट करिअरमधील अविस्मरणीय फोटो शेअर केले होते. धोनीने शेअर केलेल्या व्हीडिओला बॅकग्राउंडला “मै पल दो पल का शायर हू” हे गाणं होतं.
केदार जाधवचा क्रिकेटला रामराम
Thank you all For your love and support throughout my Career from 1500 hrs Consider me as retired from all forms of cricket
— IamKedar (@JadhavKedar) June 3, 2024
केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
केदार जाधवने 2014 साली श्रीलंका विरुद्ध वनडे मॅचमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. केदारने टीम इंडियाचं 73 वनडेमध्ये प्रतिनिधित्व केलं. केदारने या 73 सामन्यांमध्ये 101.60 च्या स्ट्राईक रेट आणि 42.09 सरासरीने 1 हजार 389 धावा केल्या. तसेच 27 विकेट्सही घेतल्या. तसेच 9 टी 20 सामन्यांमध्ये 122 धावा केल्या.
