वानखेडे मैदानातील स्टँडला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचं नाव, कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला रोहित शर्माचं नाव देण्यात आलं आहे. एमसीएने रोहित शर्माच्या सन्मानार्थ असा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर यांच्यासह दिग्गज खेळाडूंची नाव स्टँडला दिली आहेत. यात आता रोहित शर्माच्या नावाची भर पडली आहे.

वानखेडे स्टेडियमवर तीन स्टँडचं नामकरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. तीन स्टँडला दिग्गजांची नावं देण्यात आली. रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचं नाव स्टँडला देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी टीम इंडियाचा कर्णधार रवि शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटनंतर कसोटी फॉरमेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा टीम इंडियात आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहित शर्माच्या क्रिकेटमधील योगदानासाठी हा सन्मान दिला आहे. वानखेडे मैदानात रोहित शर्माने अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
‘रोहित शर्माचं नाव खेळत असताना स्टँडला मिळालं हे खरं तर अभिमानाची बाब आहे. असं पहिल्यांदाच घडलं आहे. रोहित यासाठी खऱ्या अर्थाने पात्र आहे. मला असं वाटतं यामुळे रोहित शर्मा अधिक चांगलं खेळेल आणि अधिक काळ खेळेल. चांगले खेळाडू रिटायर व्हावं असं आपल्याला कधी वाटतच नाही. निश्चितपणे तो अधिक चांगलं खेळेल याचा मला विश्वास आहे.’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच आणखी क्रिकेट मैदान देण्याचा प्रयत्न करू, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अजित वाडेकर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील ऐतिहासिक परदेशातील कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. त्यांनी 1966 ते 1974 दरम्यान 37 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आणि 1958-59 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. ऑगस्ट 2018 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शरद पवार यांनी 2005 ते 2008 या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले होते. तर 2011 मध्ये भारतात वनडे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मी राज्यात क्रीडामंत्री होतो तेव्हा जागा देण्यापासून ते स्टेडियम उभारण्यात अनेकजण सोबत होते.या स्टेडियमला एक इतिहास आहे, असंही सांगण्यास शरद पवार विसरले नाहीत. काही सहकाऱ्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे.सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांचे योगदान नोंदणीय आहे, असं सांगत त्यांच्या नावाचा उल्लेख केला. महाराष्ट्राचे हे वैभव घराघरात पोहोचले, याची जाणीव ठेऊन रोहित शर्माचे नाव स्टँडला दिले. यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी असोसिएशनचे आभार मानले.
