IND vs PAK : दु:ख, वेदना, असह्यता… ‘त्या’ एका वाक्यातून समोर आलं पाकिस्तानी कर्णधाराचं नैराश्य; विराटबद्दल काय म्हणाला?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने पाकिस्तानवर रोमांचक सामन्यात विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या शतकामुळे हा विजय शक्य झाला. पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला 242 धावांचे आव्हान दिले होते, पण भारताने हे लक्ष्य सहजपणे गाठले. पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिजवान यांनी भारताच्या विजयाचे कौतुक केले, परंतु स्वतःच्या संघाच्या पराभवावर निराशा व्यक्त केली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी काल एक ब्लॉकबस्टर सामना पार पडला. भारताने या रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. भारताने पाकिस्तानचा पराभव करताच दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. पाकिस्तान संघाने टॉस जिंकून भारताला 242 धावांचं टार्गेट दिलं होतं. पाकिस्तानी संघाला ऑलआऊट केल्यानंतर भारताने हे टारगेट लिलया पार पाडलं होतं. विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवून सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. तर पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीतून चंबूगबाळे घेऊन मायदेशी परतावं लागणार आहे. भारताचा हा विजय मात्र पाकिस्तानी संघाचा कर्णधार मोहम्मद रिजवानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं नैराश्य बरंच काही सांगून जात होतं.
भारत जिंकला, पाकिस्तान हरल्यानंतर पाकचा कर्णधार मोहम्मद रिजवानचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सामन्यानंतर त्याने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. त्यातून त्याची वेदना, दु:ख आणि असह्यता दिसून येत होती. सर्व काही संपलं. आता आमच्या संघासाठी काही राहिलं नाही. आमच्या संघाचं अभियान एकप्रकारे संपुष्टात आलं आहे, असं मोहम्मद रिजवानने म्हटलंय. एवढेच नव्हे तर त्याने भारताचा शतकवीर विराट कोहलीचं तोंडभरून कौतुकही गेलं. कोहलीचा फिटनेस आणि त्याची शिस्त वाखाणण्यासारखी आहे, असं रिजवान म्हणाला.
आमची मोहीम जवळपास संपुष्टात आली आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आम्हाला आता दुसऱ्या सामन्यांच्या निकालावर निर्भर राहावं लागेल. एकच मॅच बाकी आहे. एक कर्णधार म्हणून मला अशी परिस्थिती बिलकूल पसंत नाहीये. आमची ताकद आमच्यासोबत असली पाहिजे, असं रिजवान म्हणाला. 51 वं शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीमुळेच भारताचा विजय शक्य झाल्याचंही त्याने नमूद केलं. भारताच्या विजायचं श्रेय फक्त आणि फक्त विराटचं असल्याचंही त्याने आवर्जुन सांगितलं.
विराटला पाहून थक्क झालो
विराटची एवढी मेहनत पाहून मी थक्क झालोय. विराट फॉर्ममध्ये नाहीये असं संपूर्ण जग सांगत होतं. पण इतक्या मोठ्या सामन्यात विराटने आरामशीर धावा कुटल्या. त्याची फिटनेस आणि शिस्त वाखाणण्यासारखीच आहे. आम्ही त्याला आऊट करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यात यश आलं नाही. आम्ही या निकालामुळे निराश झालोय. आम्ही खेळताना सर्वच पातळीवर चुका केल्या आहेत. आम्ही मधल्या ओव्हरमध्ये धावा घेऊ शकलो नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.
टॉस जिंकला, फायदा झाला नाही
आम्ही टॉस जिंकला होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही. आम्हाला वाटलं या पिचवर 280 चा स्कोअर चांगला राहील. मधल्या ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आमचे गडी टिपले. मी आणि सऊद शकीलने वेळ घेतला. कारण आम्हाला डीपपर्यंत जायचं होतं. पण खराब शॉट सिलेक्शनने आमच्यावर दबाव आला. त्यामुळेच आम्ही 240मध्ये गुंडाळल्या गेलो, असंही त्याने सांगितलं.
विराट आणि गिलने…
जेव्हा कधी तुम्ही पराभूत होता, याचा अर्थ तुमची सर्व पातळीवरची कामगिरी सुमार झाली आहे. आम्ही भारतावर दबाव आणण्याच्या तयारीत होतो. पण आम्ही तसं करू शकलो नाही. अबरारने आम्हाला विकेट दिले. पण दुसरीकडे त्यांनी गेंदबाजांना धुतले. विराट आणि शुभमन गिलने आमच्याकडून मॅच हिरावून घेतली. आता आम्हाला क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे, असंही त्याने म्हटलं.
