NZ vs WI, 3rd Test : कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर, वेस्ट इंडिज पूर्णपणे बॅकफूटवर
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा मालिकेतील निर्णायक सामना असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या सामन्यातील पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला.

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 9 गडी राखून विजय मिळवला. आता तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवशीचा संपूर्ण खेळ न्यूझीलंडच्या नावावर राहिला. कारण वेस्ट इंडिजला फक्त एक विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 90 षटकं खेळली आणि 1 गडी गमवून 334 धावा केल्या. या सामन्यात पहिल्या विकेटसाठी वेस्ट इंडिजला 323 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. टॉम लाथम आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 323 धावांची भागीदारी केली. टॉम लाथमने 246 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि 1 षटकार मारत 137 धावा केल्या. रोचच्या गोलंदाजीवर रोस्टन चेसने त्याचा झेल पकडला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 1 गडी गमवून 334 धावा केल्या आहेत. डेवॉन कॉनवेने द्विशतकी खेळीकडे वाटचाल केली आहे. त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 279 चेंडूंचा सामना केला आणि 25 चौकारांच्या मदतीने नाबाद 178 धावा केल्या. तकर जेकब डफीने 16 चेंडूत 1 चौकार मारत नाबाद 9 धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचे गोलंदाज पुरते हतबल दिसले. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ न्यूझीलंडच्या नावावर राहिला. आता दुसऱ्या दिवशी या धावसंख्येत आणखी भर पडेल यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यात पुनरागमन करणं खुपच कठीण जाईल.
भागीदारी ही न्यूझीलंडची कसोटीतील दुसरी सर्वोच्च ओपनिंग भागीदारी आहे. 1972 मध्ये जॉर्जटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ग्लेन टर्नर आणि टेरी जार्विस यांनी 387 धावांची भागीदारी केली होती. न्यूझीलंडने कसोटीत 300 धावांपेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्याची ही आठवी वेळ आहे. कर्णधार टॉम लाथम डेवॉन कॉनवेबाबत म्हणाला की, ‘मला खात्री आहे की तो आज रात्री बरा होईल आणि उद्याची तयारी करण्यासाठी तो जे काही करू शकेल ते करेल. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये आपण डेवॉन कॉनवेला पाहिले आहे. मला वाटते की तो ज्या पद्धतीने खेळला आहे, कधीकधी वरच्या फळीत खेळणं आव्हानात्मक असू शकते. ऑफसाईडमधून ते शॉट्स, जेव्हा तो कट शॉट्स आणि कव्हर ड्राइव्ह खेळतो तेव्हा आपल्याला कळते की गोष्टी सुरू आहेत. तो उद्याही खेळत राहील याची खात्री आहे.’
