Shubama Gill : शुभमन गिल करतो मनमानी ? शार्दूल ठाकूरच्या विधानाने भुवया उंचावल्या
मँचेस्टर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात टीम इंडियाच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने पहिल्या डावात दोन विकेट गमावून 225 धावा केल्या आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा गोलंदाज शार्दूल ठाकूरने आपल्या गोलंदाजीचा बचाव केला आहे.

टीम इंडियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली. यजमान संघाचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दोन विकेट गमावून 225 धावा केल्या. तर भारतीय संघाचा पहिला डाव हा 358 धावांवर आटोपला. त्यामुळे यजमान (इंग्लंड) संघ अजूनही 133 धावांनी मागे आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाहुण्या संघाच्या गोलंदाजांचा पुरेपूर फायदा घेतला आणि जलद धावा केल्या. यादरम्यान शार्दुल ठाकूरने 5 षटकांत 35 धावा दिल्या. मा्तर असं असलं तरी त्याने आपल्या गोलंदाजीचा बचाव केला. त्याने संपूर्ण प्रकरणाचा दोष कर्णधार शुभमन गिलवर टाकला. भारतीय कर्णधार मनमानीपणे वागत आहे का?, असा सवाल सध्या यामुळे निर्माण होत आहे.
काय म्हणाला शार्दूल ठाकूर ?
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीचा बचाव केला. ” बॉलिंग देण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, ते माझ्या हातात नाही. कोणाल, कधी गोलंदाजी द्यायची याचा निर्णय कर्णधार घेत असतो. मी आज 2 ओव्हर्स जास्त टाकू शकलो असतो, पण तो कर्णधाराचा निर्णय आहे. दोन टेस्ट मॅचमध्ये न खेळल्यानंतर लय मिळवणं कठीण असतं, पण मी माझ्या अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो” असं शार्दूल ठाकूरने सांगितलं.
शार्दुल ठाकूरच्या या विधानामुळे कर्णधार शुभमन गिलच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच, लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 4 बळी टिपल्यानंतरही वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी न देणे, हा निर्णयही मोठे प्रश्न उपस्थित करत आहे.
वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी का करायला दिली नाही ?
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 4 बळी घेणाऱ्या टीम इंडियाच्या अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला मँचेस्टर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकण्याची संधी मिळाली नाही, तर दुसरीकडे इंग्लंडचे फलंदाज इतर सर्व गोलंदाजांना झोडपून काढत होते. कर्णधार शुभबन गिलचा हा निर्णयही कोणालाच समजला नाही.
मात्र,या विकेटवर फिरकीपटूंना मदत मिळत आहे हे रवींद्र जडेजाने विकेट घेऊन दाखवून दिले होते. तरीही, शुभमन गिलने सुंदरला गोलंदाजी करायला लावली नाही. ज्यामुळे मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. या पत्रकार परिषदेदरम्यान ऋषभ पंतच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
दुखापत होऊनही ऋषभ पंत फलंदाजीला का आला?
पहिल्याच दिवशी बॉल लागून दुखापत झाल्यानंतरहही, ऋषभ पंत पहिल्या डावात फलंदाजीला आला आणि त्याने 75 चेंडूत 54 धावा केल्या. यावर शार्दुल ठाकूर म्हणाला की ही नेहमीच आमची योजना होती (ऋषभ पंतला फलंदाजीला आणण्यासाठी). वैद्यकीय पथकाने उत्तम काम केले, पण तरीही त्याला खूप वेदना होत होत्या.
तो म्हणाला की तो त्याचा निर्णय असेल. तो आज आला नाही कारण तो रुग्णालयात होता. आम्ही वॉर्म अप करत असताना तो मैदानावर नव्हता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो म्हणाला की पहिल्या डावात आम्ही जे काही धावा काढल्या ते चांगले प्रयत्न होते, पण आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली नाही असे त्याने नमूद केलं.
